Monday, 14 June 2021

दी ट्रेझर आॕफ द सिएरा माड्रे

दी ट्रेझर आॕफ द सिएरा माड्रे
---------------
अफाट! अचाट!! अद्भूत मूव्ही!!!

१९४८ साली, म्हंजे तब्बल ७३ वर्षांपूर्वी जाॕन ह्यूस्टनने बनवलेला हा मूव्ही पाहताना आपण आजही थरारुन जातो! ह्यातली एक्केक फ्रेम आणि तिन्ही प्रमुख कलाकारांचा अभिनय...छे..छे...अभिनय कसला? वाॕल्टर ह्यूस्टन, हंफ्री बोगार्ट आणि टिम हाॕल्ट - तिघं तर अस्सल त्या मेक्सिकोच्या उजाड डोंगरांमधे सोन्याच्या शोधात भटकणारे झपाटलेले खर्रेखुर्रे वेडेपीरच जणू!!

उत्तम दिग्दर्शन, अफाट अॕक्टींग, अजोड कॕमेरा आणि पूरक पार्श्वसंगीताच्या अप्रतिम मेळामुळे आपण पहिल्या फ्रेमपासून मूव्ही संपेपर्यंतचे दोन तास बसल्या जागेवरनं हलत नाही इतका हा मूव्ही खिळवून ठेवतो. तीन भिन्न स्वभावरेखांची माणसं! फ्रेड डाॕब्स (हंफ्रे बोगार्ट) हा खुनशी प्रवृत्तीचा, भडक माथ्याचा, सतत संशय घेणारा आणि कोणत्याही थराला जाणारा. त्याउलट त्याचा साथीदार बाॕब कर्टीन (टिम हाॕल्ट) हा शांत, संयमी आणि त्यामानाने सरळ स्वभावाचा. तर त्यांना भेटलेला हाॕवर्ड (वाॕल्टर ह्यूस्टन) हा चतुर, बेरक्या आणि काही पावसाळे जास्त पाहिल्याने व्यवहारचतुर बुजूर्ग!

३ आॕस्कर्स आणि ३ गोल्डन ग्लोब अवाॕर्ड्स जिंकलेला, हा जाॕन ह्यूस्टनचा महत्वाचा मूव्ही!! आपल्या वडिलांना वाॕल्टर ह्यूस्टनना त्याने एक यादगार रोल ह्यात दिलाय ..अर्थात वाॕल्टर ह्यांनी ती भूमिका जगत आॕस्कर मिळवलंच!...सिनेमाची टायटल्स येत असताना बॕकग्राऊंडला वाजत राहणा-या म्युझीकनेच आपली उत्कंठा वाढायला लागते...काहीतरी अचाट बघायला मिळणार हे ते म्युझिक कानात घुसवत राहातं!...

सिनेमामधला काळ आहे १९२० च्या दशकातला! सिनेमाची सुरुवात होते तेव्हा कफल्लक अमेरिकन फ्रेड डाॕब्ज मेक्सिकोमधे रस्त्यावर भटकत अमेरिकन दिसणा-या कुठल्याही माणसांसमोर अक्षरशः हात पसरत "Can you help a fellow American down on his luck? ...फेलो अमेरिकनला जेवणासाठी मदत करा" म्हणत कसेबसं मिळतील त्या पैशांवर दोन वेळचं पोटात ढकलतोय...रोजंदारीवर काम करणा-या एका माणसाकडून आधी फसवला जाऊन मग त्याला धोपटून काढत त्याचं उट्टं काढताना डाॕब्जची कर्टिनशी दोस्ती होते. तोही कफल्लकच! दोघं एकदिवस म्हाता-या हाॕवर्डचं सिएरा मॕड्राच्या डोंगरातल्या सोन्याविषयीचं बोलणं ऐकतात आणि तिघांची पार्टनरशिप ठरुन तिघं सोनं मिळवण्यासाठी जातात. ते निघतात त्या आगगाडीवर डाकूंचा हल्ला होतो. (तो सीन चित्तथरारक आणि शोलेच्या सुरुवातीच्या रेल्वेच्या डाकूंबरोबरच्या सीनची आठवण करुन देणारा!)...

ते तिघं मजलदरमजल करत त्या उजाड, खडकाळ डोंगरात पोहोचतात आणि मग ख-या अर्थानं नाट्य सुरु होतं ते निसर्गाशी झगडून सोनं मिळवण्यापेक्षाही, परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या स्वभावातनं डोकावणा-या मानवी भावनांमधला संघर्ष! डाॕब्ज हा माथेफिरु प्रवृत्तीचा..त्याला आपल्या दोन्ही साथीदारांवर सतत संशय...कर्टीनला बिचा-याला मिळेल तितकं सोनं घेऊन पुन्हा शहरात परतण्यात स्वारस्य...तर बुजूर्ग हाॕवर्ड दोघांना सांभाळून घेतोय...

तिघांना अखेर सोनं मिळतं..खेचरांच्या पाठीवर आपापली पोती रचून त्यांचा प्रवास सुरु होतो आणि मग एकापाठोपाठ एक संकटांना तोंड द्यायला लागतं...आणि इथनं ख-या अर्थानं मानवी स्वभावाचे कंगोरे आपल्यासमोर उलगडायला सुरुवात होते..

दरम्यान त्यांच्याजवळ मदत मागायला आलेल्या तिथल्या मेक्सिकन इंडियन लोकांबरोबर डाॕक्टर (!) हाॕवर्ड जाऊन त्यांच्या लहान मुलाला वाचवतो आणि त्याबादल्यात त्याला जबरदस्तीच त्यांचा पाहुणचार स्विकारण्यासाठी त्यांच्या वस्तीत राहावं लागतं...इकडे डाॕब्ज आणि कर्टिन आपल्या खेचरांबरोबरच हाॕवर्डची सोन्याच्या वाळूची पोती लादलेली खेचरं घेऊन पुढे निघतात...आणि कुटील डाॕब्जच्या मनात हाॕवर्डचं सोनंदेखील लंपास करुन सटकण्याची लालसा निर्माण होते...सरळ स्वभावाचा कर्टिन त्याला विरोध करतो!..झालं...संशयी डाॕब्जला वाटतं कर्टिनचीही नजर हाॕवर्डच्या सोन्याच्या हिश्शावर आहे आणि एवढंच नाही तर तो आपल्यालाही मारुन सर्व सोनं एकटाच लंपास करु इच्छितोय...

या संशयाने वेडापिसा झालेला आणि सगळ्या सोन्याची हाव सुटलेला डाॕब्ज अंधाराचा फायदा घेऊन कर्टिनवर हल्ला करतो...ते रात्र घालवणार असतात त्या ठिकाणाहून थोडं दूर नेऊन त्याला गोळ्या घालतो...

कर्टिनला गोळ्या घालून आल्यावर त्या रात्रीच्या अंधारात मात्र त्याचं संशयी मन उचल खातं..."मी बरोबर गोळ्या झाडल्या नं?..कर्टिन नक्की मेला असेल नं? मी नक्की ठार केलाय त्याला की...? तो स्वतःशीच भ्रमिष्टासारखा बडबडत सुटतो -"Conscience. What a thing. If you believe you got a conscience it'll pester you to death. But if you don't believe you got one, what could it do t'ya? Makes me sick, all this talking and fussing about nonsense. .".. बोगार्टचा कमाल अभिनय!!!

डाॕब्ज तिथनं निघतो...एकटाच...तिघांच्याही वाटचं सोनं लादलेली खेचरं घेऊन...पण पुढे काय वाढून ठेवलेलं असतं?...कर्टिन खरोखरच ठार झालेला असतो का? हाॕवर्डचं काय होतं? त्या सिएरा मॕड्राच्या सोन्याचं काय होतं?..मानवातला सैतान जिंकतो?..की मानवातली सुष्ट प्रवृत्ती?..की नियतीच्या मनात वेगळीच खेळी असते?..

जसं हाॕवर्ड एकदा म्हणून जातो -"Ah, as long as there's no find, the noble brotherhood will last but when the piles of gold begin to grow... that's when the trouble starts. ...I know what gold does to men's souls..."

या सिनेमाचा क्लायमॕक्स जबरदस्तच!...हा सिनेमा चुकवू नये असाच!..वाॕल्टर ह्यूस्टनच्या आॕस्कर विजेत्या अभिनयासाठी!..अमेरिकेच्या लाडक्या अभिनेत्याच्या- हंफ्रे बोगार्टच्या जबरदस्त अदाकारीसाठी!..जाॕन ह्यूस्टनच्या अफाट दिग्दर्शनासाठी...हा मानवी स्वभावातलं पशुत्वं, अधिकाधिक मिळवण्यासाठीची हाव...स्वभावातला संघर्ष आणि विधिलिखिताचे फेरे...बघण्यासाठी चुकवू नका हा मूव्ही! १९४८ सालचा "द ट्रेझर आॕफ सिएरा माड्रे"...

No comments:

Post a Comment