Thursday, 17 June 2021

माझी डार्लिंग : इंग्रिड

माझी डार्लिंग!
----------------
ते देजा वू आसतं ना ज्यामुळे आपण काही ठिकाणी असताना बोलली गेलेली वाक्यं "अरेच्चा, हे तर आपण ऐकलंय! यानंतर तो/ती असंअसं बोलले होते"..किंवा आधी कधीही न गेलेल्या ठिकाणी गेल्यावर आधी कधीतरी (कुठल्या जन्मांत) आपण तिथे होतो; ते पाह्यलंय असा भास होतो".. वगैरे? इंग्रीडला बघताना मला तसंच काहीतरी फिलींग येतं..म्हंजे आम्ही आधी भेटलोय..काहीतरी गाठ पडल्ये. सहवास लाभलाय वगैरे...नक्कीच!!...पण माझ्याच गेल्या जन्मांत?...की कुठल्या?...की पॕरलल वर्ल्डमधे?...काय की....

कुणीसं म्हटलं होतं  "सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो" म्हणून! म्हणजे बहुदा उत्तम अभिनय करणारे दिसायला फार सुंदर असतात असं नाही किंवा देखणा चेहरा असणाऱ्यांना उत्तम अभिनय जमतोच असं नाही! पण याला सणसणीत अपवाद म्हणजे माझी लाडकी इंग्रीड बर्गमन!! दिसायला अत्यंत गोड, देखणी आणि आपल्या जबरदस्त ऍक्टिंगने वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारी युरोप-अमेरिकेची अभिनयसम्राज्ञी! हॉलिवूडमध्ये काम करत असताना तिने सात वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स मिळवून त्यांपैकी तीन वेळा ऑस्कर जिंकलं तर आठ वेळा गोल्डन ग्लोबची नॉमिनेशन्स मिळवून त्यांपैकी चार वेळा गोल्डन ग्लोब जिंकलं! शिवाय एक बाफ्टा अवॉर्ड आणि इतर तब्बल २१ पुरस्कार मिळवले होते. १९४३ ते १९८२ अशी जवळपास चाळीस वर्षं तिने हिचकॉक, रॉबेर्तो रोझेलिनी, इंगमर बर्गमन, जॉर्ज क्युकरसारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर कामं करून गाजवली आणि प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आणि तेही लग्न होऊन मूल झाल्यावर सिनेमे करत असताना!! 

लहानपणापासून तिला मनोमन पक्कं ठाऊक होतं मोठेपणी ती कोण होणार ते!! आणि बहुदा म्हणूनच वडिलांचा फोटोस्टुडियो रिकामा मिळाला रे मिळाला की, तिथे जाऊन ती नाटकाचे डायलॉग्ज म्हणत बसायची! दुर्दैवाने टीनएजमध्ये जाईपर्यंत तिने आईवडील दोघांना गमावलं. पण पुढे प्रचंड मेहनत करत स्कॉलरशिप मिळवून तिने नाट्यभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःमधली अफलातूनअभिनेत्री घडवली. पुढच्या काही वर्षांतच युरोपपासून हॉलीवूडपर्यंत तिच्या नावाचा डंका वाजत गेला. पिंगट केसांची, निळ्या डोळ्यांची आणि नाकाचा शेंडा किंचित अपरा असणारी इंग्रीड दिसायला सुंदर होती. तिच्या चेहेर्यात एक विलक्षण कशीश होती. मला तिच्याकडे बघताना, एक अद्भुत किरणोत्सर्गी गोडवाच जणू तिच्या चेहऱ्यातून बाहेर फेकला जातोय असंच वाटत राहातं! 

तिचा 'इंटरमेझ्झो' हा स्वीडिश सिनेमा तुफान गाजला आणि तो पाहून डेव्हिड सेल्झनिकने तिला करारबद्ध केलं आणि त्याच कथेच्या इंग्लिश सिनेमात काम करण्यासाठी हॉलीवूडमधे नेलं. सुरुवातीला 'रेज इन हेवन' आणि 'ऍडम हॅड फॉर सन्स'सारखे सिनेमे केल्यावर तिला 'कॅसाब्लँका' मिळाला ज्याने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली. जगातले सर्वोत्तम दहा रोमँटिक सिनेमे निवडायचे म्हटले तर जगभरचे समीक्षक आणि सिनेरसिक आपापल्या पसंतीच्या  हजारो लिस्ट्स बनवतील, पण त्या सगळ्या लिस्ट्समध्ये 'कॅसब्लँका' पहिल्या पाचमध्ये असणारच, इतकं त्या सिनेमाचं गारुड आज ७६ वर्षांनंतरही कायम आहे!! अनेक विलक्षण गोड क्षणांनी भारून टाकणारं आणि रिक आणि इल्साच्या आगळ्या प्रेमाची कथा मांडणारं ‘कॅसाब्लांका’चं भूत एकदा का आपल्या मानगुटीवर बसलं की आयुष्यभर उतरत नाही!! या सिनेमाचा USP म्हणजे अतोनात गोड असणारी आणि दिसणारी इंग्रिड!!... बऱ्याच वर्षांनी अचानकच समोर आलेला प्रियकर रिक ब्लेन आणि क्रांतिकारक नवरा व्हिक्टर लाझलो अशा दोघांच्या प्रेमाच्या द्विधावस्थेत सापडलेली "ईल्सा लुन्ड", इंग्रीडने ज्या कमालीच्या तरल आणि संवेदनेशील एक्स्प्रेशन्सने रंगवल्ये ते पाहताना, आपल्या हातात फक्त तिच्या प्रेमात पडणं एव्हढंच काय ते उरतं!..कॅसब्लॅंकातले तिच्या आणि हंफ्री बोगार्टच्या तोंडचे कित्येक डायलॉग्ज अजरामर झालेत. रिकच्या कॅफेत आल्यावर जुन्या पियानोवादक दोस्ताला, सॅमला पाहून ती जुनी आठवण जागवत त्याला ते पूर्वीचं गाणं म्हणण्याचा लाडिक आग्रह ती करते,'प्ले इट सॅम..प्ले इट. ऍज टाईम गोज बाय... फॉर ओल्ड टाइम्स सेक!' सॅम गायला सुरुवात करतो ते ऐकून आपल्या जुन्या जखमांवरची खपली काढणारं गाणं कोण म्हणतंय ते पाहायला तावातावाने तिथे आलेला रिक आपल्या हरवलेल्या प्रेयसीला, ईल्साला तिथे पाहून हादरतो..त्यांची नजरानजर..त्याक्षणी दोघांना आतून काय वाटतं त्याची आपण कल्पना करु शकतो...आपल्याला जीव लावून अचानक गायब झालेली लाडकी...आत्ता?...इथे?...माझ्या क्लब मध्ये?...कुठे गायब होती इतकी वर्षं? - समोर रिकला पाहिल्यावर ईल्साचाही चेहरा झरझर बदलत जाऊन डोळे डबडबून येतात...हा सीन आणि पुढे फ्लॕशबॕकमधून उलगडणारे पॅरिसमधले दोघांचे प्रेमप्रसंग...आणि चटका लावणारा शेवट ..हे प्रत्यक्ष सिनेमा बघत अनुभवण्यातच मझा आहे. तिच्या नुसत्या ‘असण्याने’ हा सिनेमा एका मोठ्या उंचीवर गेलाय.कॅसब्लॅंका बघून इंग्रीडच्या प्रेमात पडू न शकणारा माणूस पृथ्वीतलावर नसेल!.... 

त्यानंतर तिने अर्नेस्ट हेमिंग्वेच्या 'फ्रॉम हूम द बेल टोल्स"मधली मारिया साकारली आणि त्या भूमिकेबद्दल तिला पहिल्यांदा ऑस्कर नॉमिनेशन मिळालं, पण अवॉर्डने हुलकावणी दिली.  तिचा पुढचा सिनेमा 'गॅसलाईट' मानसिक थरारपट होता. वेळोवेळी होणाऱ्या भासांमुळे नवऱ्याकडून पद्धतशीरपणे वेडी ठरवली जाणारी बायको! इंग्रीडने जबरदस्त मुद्राभिनयानं ही भूमिका जिवंत केली. खुर्चीला हात बांधलेल्या अवस्थेतला चार्ल्स बाॕय(र्), "ड्रॉवरमधली सूरी काढून माझी सुटका कर" असं जेव्हा तिला सांगतो त्यावेळचे इंग्रीडचे भाव बघण्यासारखे. एकीकडे त्याने सांगितल्यानुसार यांत्रिकपणे ड्रॉवर उघडून अनाहूतपणे हातात आलेल्या सुरीकडे पाहत,"आर यू सजेस्टिन्ग धिस इज अ नाईफ आय ऍम होल्डिंग इन माय हॅन्ड?." म्हणत ती भ्रमिष्टासारखी बडबडत सुटते.. "येस, आय ऍम मॅsड...आय ऍम मॅड" - सत्य कळलेली ती नवऱ्याला जे सुनावते तो सारा प्रसंगच भन्नाट! अर्थात या भूमिकेबद्दल तिने आपलं पहिलं ऑस्कर जिंकलं. त्यानंतरच्या 'द बेल्स ऑफ सेंट मेरीज' या सिनेमात तिने शाळेसाठी धडपडणाऱ्या ननची भूमिका केली आणि लागोपाठ तिसऱ्या वर्षी ऑस्करसाठी नामांकन मिळवलं पण यावेळी ऑस्कर अवॉर्डने हुलकावणी दिली. एव्हाना स्वीडनमधून अमेरिकेत आलेली ही कमालीची गोड हिरॉईन लोकप्रिय होत चालली होती. तिच्या सहजसुंदर अभिनय क्षमतेमुळे ती दिग्दर्शकांमध्ये प्रिय होत होती. त्याचवेळी सस्पेन्स थ्रिलर्सचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉकचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने तिच्यासाठी तीन सिनेमे बनवले. कॅरी ग्रांटबरोबरचा 'नटोरीयस', ग्रेगरी पेकबरोबर 'स्पेलबाऊंड' आणि जोसेफ कॉटन आणि मायकेल विल्डीन्गबरोबरचा 'अंडर कॅप्रीकॉर्न. तिन्ही सिनेमात तिने कमाल केली. 'नटोरीयस'मधल्या नाझी हेराच्या मुलीच्या भूमिकेत तिची कॅरी ग्रॅण्टबरोबरची केमिस्ट्री विलक्षण गाजली. ती दिसलीसुद्धा फारच देखणी. 'स्पेलबाऊंड'मधल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमिकेबद्दल तिला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलचं अवॉर्ड मिळालं. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिचे आणि ग्रेगरी पेकचे नाजूक प्रेमसंबंध निर्माण झाले पण तिच्या मृत्यूपर्यंत त्याची दोघांनीही कधीच वाच्यता होऊ दिली नाही हे विशेष!!

यानंतर तिचे 'जोन ऑफ आर्क' आणि 'स्ट्रॉम्बोली' हे सिनेमे गाजले. स्ट्रॉम्बोलीच्या शूटिंग दरम्यान ती डायरेक्टर रॉबेर्तो रोझेलिनीच्या प्रेमात पडली आणि मग आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन तिने चक्क रोझेलिनीबरोबर राहणं पसंत केलं. तो काळ तिच्या आयुष्यातला प्रचंड खळबळजनक आणि उलथापालथ करणारा ठरला. काही काळ ती हॉलीवूडपासून दूर गेली होती. पण तिने लोकक्षोभ मनावर घेतला नव्हता. ती त्यावेळी म्हणून गेली,'“I have no regrets. I wouldn’t have lived my life the way I did if I was going to worry about what people were going to say.”.... 

पुन्हा ती हाॕलीवूडमधे दिमाखात परतली ती  "अनास्ताशीया"मधून! रशियन उमराव घराण्याच्या डचेसच्या भूमिकेत तिने आपलं दुसरं ऑस्कर अवॉर्ड जिंकलं. पुढच्या वीस वर्षांत तिने मोजक्याच भूमिका केल्या आणि १९७४ साली 'द मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस'मधल्या भूमिकेबद्दल वयाच्या साठाव्या वर्षी तिने तिसरं ऑस्कर अवॉर्ड जिंकलं. नंतरच्या "ऑटम सोनाटा" या इंगमार बर्गमनच्या सिनेमाबद्दल तिला पुन्हा ऑस्कर नॉमिनेशन मिळालं एकूण सातवं!! करिअरच्या शेवटाकडे जाताना तिने केलेली इस्राएलच्या पंतप्रधान गोल्ड मेइरची भूमिकाही जबरदस्त होती!! 

माझ्या लाडक्या देखण्या इंग्रीडचा अभिनय कमालीचा ग्रेट होता!! मला मात्र ती दिसण्यापलीकडे आणि अभिनयापलीकडे एका वेगळ्याच कार्मिक कनेक्शनने खूप जवळची - डार्लिंगच जणू - वाटत आल्येय!! ;-)  :-D

No comments:

Post a Comment