चार वर्षांपूर्वीची आठवण...!
-----------
रम्य संध्याकाळ गेली आजची!
निमित्त ठरलं सुभाषचंद्र जाधव यांच्या मजरुह सुलतानपुरी यांच्यावर लिहिलेल्या "यहां के हम सिकंदर" ह्या मराठी पुस्तकाचं प्रकाशन! समारंभ होता एस एम जोशी सभागृहात! मी अर्थातच खूप लवकर जाऊन जागा पकडली...
कार्यक्रमाची सुरुवात मजरुह साहेबांनी ओपी नय्यर, सचिनदा, एलपी, रवी, नौशाद, आरडी यांसारख्या संगीतकारांसाठी लिहिलेल्या काही गाण्यांच्या सादरीकरणाने...आणि मग प्रकाशन समारंभ रंगला तो उपस्थित छान पाहुण्यांमुळे!!...मजरुहजींची लाडकी कन्या सबा मजरुह सुलतानपुरी आणि नौशादजींचे पुत्र राजू नौशाद अली यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ पार पडला. प्रमुख उपस्थिती होती जुने जाणते बुजुर्ग अकॉर्डीअन वादक आणि अरेंजर "इनॉक डॅनिअल्स" आणि पुण्यातले रफीभक्त गायक इक्बाल दरबार आणि सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची!
या कार्यक्रमामुळे कळलं की 'राजू नौशाद अली' आणि 'सबा मजरुह' हे पतिपत्नी आहेत म्हणून!! जोडी मस्त आहे त्यांची आणि त्यांनी मजरुह आणि नौशादजींचे मस्त किस्से सांगितले. --
मजरुहजींची सबा खूप लाडकी म्हणून तिचं नाव गुंफलेली बरीच गीतं मजरुहजींनी लिहिली...फेमस म्हणजे "ममता" आणि "उंचे लोग" ची गाणी!..
एकदा मजरुहजी सकाळपासून बेचैन होते..संध्याकाळ होत आली तरी मनासारखं गाणं सुचलेलं नव्हतं...तितक्यात त्यांची लाडकी कन्या 'सबा'' शाळेतून घरी आली आणि तिच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे बघून मजरुहना पटकन ओळ सुचली "ये कौन आया, रोशन हो गयी मेहफिल किसके नाम से, मेरे घर मे जैसे सूरज निकला है शाम से".... हे गाणं पुढे "साथी"मध्ये सिम्मीसाठी वापरण्यात आलं!...राजू नौशाद यांनी हा किस्सा सांगताना हेही सांगून टाकलं की पुढे ह्या "साथी" दरम्यानच त्यांचं आणि सबा ची साथ जुळली होती म्हणून! 😍
नौशाद यांच्या घरी एक कुर्सी आहे ज्यावर ते नंतर नंतर कुणालाच बसू देत नसत, कारण का - तर त्या कुर्सीवर बसूनच "रफी, लता, सुमन, मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर' सारख्यांनी नौशादजींकडून आपली गाणी घोटवली होती..त्यामुळे कुणी पाहुणे त्यावर बसायला गेले तर नौशाद घाईघाईने त्या पाहुण्याला दुसरीकडे ओढून नेऊन बसवायचे. कुण्या 'बेसुऱ्या'ने त्यावर बसता कामा नये असा त्यांचा दंडक!!.🙄😜
लता अगदी नवीन इंडस्ट्रीत आली तेंव्हाचा किस्सा तर मजेशीर! त्याकाळी रेकॉर्डिंग स्टुडिओत अक्षरशः दर दहा मिनिटांनी चहा यायचा...नौशाद आणि बाकीच्यांनी आग्रह केला तरी लता आपली चहा ला "नको नको"च करायची.... नौशादजींनी कारण विचारल्यावर लताने भोळेपणे सांगितलं की त्यांचंच सैगलच्या "शाहजहान" मधलं गाणं आहे ना "चाहा बरबाद करेगी हमे मालूम ना था, रोते रोते कटेगी हमे था..." म्हणजे चाहा वाईटच की! ते ऐकून नौशाद हसले आणि त्यांनी लता ला ताबडतोब "उर्दू शिक" असा सल्ला दिला म्हणजे उर्दू/हिंदी ची "चाहा" आणि मराठीचा "चहा" ची गल्लत होणार नाही म्हणून! ☕😃
राजू नौशाद यांनी मजरुह यांच्या डाव्या विचारसरणीमुळे त्यांना तुरुंगवास कसा पत्करावा लागला...आणि त्यांनी बाणेदारपणे तो स्विकारून वर पुन्हा आपल्या लेखणीतून उत्तरही कसं दिलं तोही किस्सा सांगितला..
मजरुह हे अनेक संगीतकारांना लकी ठरले कारण अनेकांच्या 'प्रारंभीच्या' सिनेमांसाठी त्यांनी दिलेली गाणी प्रचंड हिट्ट ठरून त्या संगीतकारांना प्रचंड यश मिळालं होतं! ओपी, एलपीपासून ते अगदी आरडी, आनंद मिलिंद, जतीन ललित पर्यंत!...
मजरुह यांचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सैगलच्या सिनेमापासून म्हणजे १९४४ पासून ते २००० च्या आमिरखान पर्यंत तब्बल "५६ वर्षं" त्यांनी 'आघाडीचे गीतकार' म्हणून कित्येक संगीतकारांच्या पिढ्यांबरोबर काम केलं!
मजरुहची खरी जोडी जमली आणि गाजली ती मात्र 'ओपी, सचिनदा आणि आरडी' या तिघांबरोबरच!!..त्यांची सर्वाधिक गाणी गायली ती अर्थातच रफीसाब यांनी!!..
पण पुढल्या काळात मजरुह वैतागले होते कारण संगीतकार त्यांना तयार चाली ऐकवून त्यावर गीत लिहायला सांगायचे जे असं "फिटर"चं काम त्यांच्यातल्या सच्च्या शायरला आवडत नव्हतं..
अनेक किस्से...
अश्या काही छान मंडळींना बघून/ ऐकून एस एम जोशी सभागृहातली संध्याकाळ छान गेली आजची!!
No comments:
Post a Comment