मेमरी..
आज ग्रेगरीचा स्मृतीदिन...
----------
आमचे वसंतभाऊ सोमण नेहेमी एक वाक्य म्हणायचे की "सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो". म्हणजे उत्तम अभिनय करणारे बहुदा खूप सुंदर असत नाहीत किंवा अप्रतिम सुंदर मंडळींना उत्कृष्ट अभिनय जमतोच असं नाही! पण ग्रेगरी पेक याला सणसणीत अपवाद होता! तो देखणाही होता आणि उत्तम अभिनेतासुद्धा! अभिनयासाठी एकदा आॕस्कर, दोनदा गोल्डन ग्लोब आणि इतर तेरा आवाॕर्ड्स त्याने मिळवले होते!
देवसाबला भारताचा ग्रेगरी पेक म्हणायचे! कारण दोघांच्या चेह-यात, देखणेपणात, ओठांच्या ठेवणीत साम्य होतं. दोघंही समकालीनच! देवसाबने १९४६ ला पदार्पण केलं सिनेमात, तर ग्रेगरी पेकने किंचित आधी १९४४ ला! दोघंही कमालीचे स्टायलीश आणि जंटलमेन! देव वयाच्या ८८ व्या वर्षी गेला तर ग्रेगरी पेक ८७ व्या वर्षी!
देव आनंदचं मोना सिंगशी लग्न होण्याआधी आपली 'विद्या'ची को-स्टार सुरैय्यावर प्रेम होतं, तर ग्रेगरी पेकचं लग्नाआधी त्याची 'स्पेलबाउंड'ची को-स्टार इंग्रीड बर्गमनवर! आणि गंमत म्हंजे सुरैयाला दोघंही आवडायचे आणि तिघांची मुंबईत भेटही झाली होती! श्रीलंकेतलं शुटींग संपवून ग्रेगरी परत जाताना मुंबईत थोडा वेळ होता त्यावेळी विलींग्डन क्लबला तिघांची भेट झाली होती.
मला वाटतं ज्यांना देवसाब आवडतो त्यांना ग्रेगरीसुद्धा आवडतोच!..मी लहानपणी पाहिलेला ग्रेगरी पेकचा पहिला मूव्ही होता "मॕकन्ना'ज गोल्ड"! त्यावेळी आमच्या माटुंगा रोडचं "श्री सिनेमा" हे टाॕकीज इंग्लीश सिनेमांसाठी प्रसिद्ध होतं! (आयुष्यातले बहुतेक सगळे लाॕरेल-हार्डी आणि टारझनचे मूव्हीज मी तिथे पाहिलेत). चाॕकोबार खात "मॕकन्ना'ज गोल्ड"मधल्या शेरीफ मॕकन्नाला पडद्यावर पाहताना ग्रेगरी पेक घुसलाच होता एकदम मनात!..आजपर्यंत त्याचे "स्पेलबाउंड, गन्स आॕफ नॕव्हराॕन, रोमन हाॕलीडे, ओमेन, यर्लींग, दा स्नोज आॕफ किलीमांजारो, बाॕईज फ्राॕम ब्राझील, द सी वूल्व्ज, मिलीयन पाउंड नोट, द मॕन इन द ग्रे फ्लॕनल सूट" सारखे मूव्हीज पाहून झालेत! (त्यापैकी मॕकन्ना'ज गोल्ड, गन्स आॕफ नॕव्हराॕन आणि रोमन हाॕलीडे तर कित्तीतरी वेळा! ;-) )
आपल्याकडच्या राज-शम्मी-शशी, राजेश, संजीवकुमार सारख्या अनेक मोठ्या स्टार्स आणि नसीर, अमोल पालेकर, फारूक शेख, ओम पुरी, इरफानसारख्या अनेक उत्तम अभिनेत्यांप्रमाणेच तोसुद्धा आधी रंगमूमीवर कामं करुन नंतर सिनेमांत आला होता! ६'३" ऊंचीच्या ग्रेगरीने मिलीटरी शिक्षण घेतलं, तरी पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला दुस-या महायुद्धात अमेरिकेकडून युद्धात उतरता आलं नव्हतं. पण त्यामुळेच तो १९४४ साली सिनेमातून झळकू शकला आणि आपल्याला त्याची सहजसुंदर अॕक्टींग पाहण्याचं भाग्य लाभू शकलं!..
'त्याचं हसणं, डावी भिवई जराशी उडवत नजरेला नजर भिडवत बोलणं' घुसायचंच मनात! गन्स आॕफ नॕव्हराॕनचा कॕप्टन मॕलरी मॕकना'ज गोल्ड मधला शेरीफ मेकॕना, स्पेलबाउंडचा डाॕ.एडवर्ड्स, यर्लींगमधला पेनी बॕक्स्टर, रोमन हाॕलीडेमधला पत्रकार ज्यो ब्रॕडली हृदयात वस्तीला आहेत कायमचे!!
आता त्याचा "I wanted you to see what real courage is, instead of getting the idea that courage is a man with a gun in his hand. It's when you know you're licked before you begin but you begin anyway and you see it through no matter what." - म्हणणारा लाॕयर अॕटीकस फिंच दमदार केस लढवताना पुन्हा पाहायचाय!!
No comments:
Post a Comment