"हिज गर्ल फ्रायडे"
-----------------
लाॕकडाउन काळात मी माझ्या आवडत्या १९३०/४०/५० काळातल्या हाॕलीवूड मूव्हीजमधे रमतोय...गेले चार महिने...त्यात काल रात्री पाहिलेला हा धुमाकूळ मूव्ही!! कॕयच्या कॕय शब्दबंबाळ....धाडधाड डायलाॕग्ज्सची तुफान मेल!...पण अशक्य वस्सूल धम्माल काॕमेडी!!..🤣
डॕनियल डिफोच्या १७१९ सालच्या अफाट गाजलेल्या कादंबरीच्या हिरोला, राॕबिन्सन क्रुसोला साथीदार मिळाला होता एका शुक्रवारी आणि म्हणून त्याने त्याचं नामकरण "फ्रायडे" केलं होतं...आणि तेव्हापास्नं आपल्या भरवशाच्या मदतनीसाला, सहाय्यकाला, साथीदाराला "मॕन फ्रायडे" म्हणण्याची पद्धत पडली होती अगदी हा शब्द डिक्शनरीतही जाऊन बसला तेव्हापास्नं!...१९४० साली हाॕवर्ड हाॕक्सने त्याच्या (आणि आपल्याही सर्वांच्या) लाडक्या हिरोला कॕरी ग्रँन्टला एका न्यूजपेपर एडिटरच्या रूपात पेश करताना त्याला जी भरवशाची असिस्टंट दिली ती बनली त्याची "गर्ल फ्रायडे" आणि मग धुमाकूळ मूव्ही तयार झाला "हिज गर्ल फ्रायडे"!!😍😆😂
आपलं प्रेयसीशी/ बायकोशी पटलं नाही आणि विसंवाद, भांडणं वाढत जाऊन आपण वेगळे झालो, तरी तिच्याबाबतीत एक साॕफ्ट काॕर्नर राहिलेलाच असतो! अशात जेव्हा ती समोर येते आणि दुस-यावर मन जडल्याची बातमी देते, त्याच्याशी लग्न करणार असल्याचं सांगते तेव्हा आपला इगो उफाळून वर येणारच ना?...आणि मग अर्थातच जलन... 'J' factor...असुया वगैरे?!!!
वाॕल्टर बर्न्स (कॕरी ग्रॕन्ट) हा "माॕर्निंग पोस्ट"चा हिकमती न्यूज पेपर एडिटर! हिल्डी जाॕन्सन (रोझलींड रसेल) ही त्याची बायको, जी त्याच्यापास्नं वेगळी होऊन आता ब्रुस बाॕल्डविन (राल्फ बेलॕमी) या इन्शुरन्स एजंटशी लग्न करत्येय. आणि आपलं दुस-याच दिवशी लग्न होणार असल्याचं कळवायला (आणि वाॕल्टरला जळवायला) ती त्याच्या आॕफिसमधे आल्ये या दृश्याने मूव्हीला सुरुवात होते आणि पुढचा दीड तास आपण धम्माल एंजाॕय करत राहतो!...
वाॕल्टरला तिच्यातली हाडाची पत्रकार चांगलीच ठाऊक आहे आणि तिची धडाडी, बातमीचा माग काढण्यातली धिटाई आणि जोषही!..त्यामुळे आपला प्रमुख पत्रकाराला मुलगा झाल्याने तो बिझी आहे आणि म्हणून, त्यादरम्यान गाजत असलेल्या खटल्यातल्या खुनी माणसाची अर्ल विल्यम्सची सनसनीखेज मुलाखत घेऊन त्याच्या हातून अजाणतेपणी घडलेल्या गुन्ह्यातली त्याची बाजू सर्वांसमोर आणण्याची कामगिरी बजावण्याचं आणि त्यातनं मिळणा-या नावलौकीकाचं आमिष तो हिल्डाला दाखवतो. (खरं तर तिने आॕफिसमधे आणि आपल्या आयुष्यातही परत यावंहा त्याचा सुप्त हेतू!)...तिच्या होणा-या नव-याला ब्रुसला भेटून बोलताबोलता त्याला कन्व्हिन्स करुन तो दोघांना नेहेमीच्या रेस्टरांमधे लंचला घेऊन जातो. ब्रुस तसा सिंपल, साधाभोळा इन्शुरन्स एजंट आहे. बोलता बोलता दुस-याच दिवशी दोघं लग्न करुन ब्रुसच्या आईला घेऊन अल्बॕनीला निघून जाणार कळल्यावर, धूर्त वाॕल्टर ते लग्न थांबवण्यासाठी आणि हिल्डा जवळ राहावी म्हणून एक डाव टाकतो!..
हिल्डाने ही अर्ल विल्यम्सची केस हातात घ्यावी आणि त्याबदल्यात वाॕल्टर स्वतःची एक लाखाची (१९४० सालचे!) पाॕलीसी काढायला तयार असल्याचं वाॕल्टरने सांगितल्यावर, त्यातनं मिळू शकणा-या कमिशनच्या कल्पनेनं हिल्डा तयार होते. आणि वाॕल्टर पुढे एकेक युक्त्या लढवत ब्रुसला पोलीस स्टेशनमधे चौकशीसाठी अडकवत राहतो...
इकडे हिल्डा कैदेतल्या विल्यम्सला भेटून त्याची मुलाखत घेते. अनवधानाने त्याच्या हातनं घडलेला गुन्ह्याची कहाणी तिला समजल्ये....
पुढे वेगवान घटना घडत जातात..वाॕल्टर कैदेतनं पळ काढतो...आणि...आणि तुरुंगासमोरच असणा-या "माॕर्निंग पोस्ट"च्याच आॕफिसमधे घुसतो. हिल्डा त्याला एका मोठ्या टेबलात लपवते....सगळीकडे एकच खळबळ उडाल्येय...दुस-याच दिवशी ज्याला फाशी द्यायच्येय तो कैदी पळालाय..पोलीसांची शोधमोहिम सुरु...रिपोर्टर्सची गडबड धावाधाव सुरु...फोन्स खणखणतायत...तश्यात अर्ल विल्यम्सची प्रेयसी त्याचा निष्पापपणा सांगायचा प्रयत्न करत्येय आणि तो पकडला जाऊन फासावर जाईल..आणि त्याचा ठावठिकाणा आपल्या तोंडून कळण्यापेक्षा जीव द्यावा म्हाणून त्या आॕफिसच्या खिडकीतनं खालती उडी घेत्येय...
इकडे विल्यम्सच्या दयेचा अर्ज मंजूर झाल्याची बातमी घेऊन आलेल्या ज्यो पेट्टीबोनला (बिली गिल्बर्ट) शहराचा शेरीफ आणि मेयर लालूच दाखवून तोंड गप्प ठेवायला सांगतात कारण विल्यम्सच्या हातनं मारला गेलेला पोलीस "ब्लॕक" आहे त्यामुळे तोंडावर आलेल्या इलेक्शनमधे विल्यम्सला फासावर लटकावून तमाम ब्लॕक्सची मतं त्यांना मिळवायच्येत....
आणि मग वाॕल्टरचे एक्केक प्लॕन्स...हिल्डाची धावपळ...विल्यम्सचं टेबलातलं करुण विनोदी लपणं....ब्रूसच्या आईला आणि ब्रूसला हिल्डापास्नं दूर ठेवण्यातले वाॕल्टरचे एकेक डावपेच...शेरीफ आणि पोलीसांचं आॕफिसमधे पोहोचून विल्यम्स टेबलात लपल्याचं बिंग फुटणं...आणि...आणि...???
या सगळ्या धुमाकूळ भानगडीचा शेवट काय होतो?..वाॕल्टरचे कारनामे यशस्वी होतात का?..हिल्डा फायनली काय ठरवते?..गरीब भोळा ब्रूस तिला घेऊन जाण्यात यशस्वी होतो का?..
याची उकल होण्यासाठी १९४० सालची ही धमाल धमाल काॕमेडी जरूर पाहा!..माझा आवडता कॕरी ग्रँन्ट अक्षरशः सुटलाय या रोलमधे! दोनतीन ठिकाणी त्याचं इम्प्रोव्हायझेशन तर कम्मालच!! रोझलींड रसेल दिसल्येही छान आणि तिने हिल्डाच्या भूमिकेत धमाल उडवल्येय! बिली गिल्बर्टने पेट्टीबोनच्या दोनच सीन्समधे बहार आणल्ये...जाॕन क्वॕलेनचा 'बिच्चारा खुनी' अर्ल विल्यम्सही लक्षात राहतो...
हाॕवर्ड हिक्स हा ब्बाप डायरेक्टर होता आणि त्याच्या सगळ्याच काॕमेडीज अत्रंगीच असायच्या हे हा मूव्ही बघून लोटपोट होताना कळतंच!
No comments:
Post a Comment