Thursday, 17 June 2021

द हाउसहोल्डर

"द हाउसहोल्डर"
--------------
माझ्या शशीचा हा पहिलाच इंग्लिश सिनेमा!१९६३ सालचा! भारतात घडणारं कथानक. शशीने नुकतंच हिंदी सिनेमे करायला सुरुवात केली होती आणि त्याच्या खात्यात तोपर्यंत तीन फ्लाॕप सिनेमे (चार दिवारी, धर्मपुत्र, मेहंदी लगी मेरे हाथ) होते...पण आपल्या इंग्लीश फिल्मसाठी शशीच हवा असल्यामुळे इस्माईल मर्चंटने अमेरिकेहून बेट्टी डेलगार्नोला घेऊन मुंबईत येऊन सरळ शशीचं घर गाठलं आणि 'बिनबुलाये मेहमान' थाटात तो शशीच्या घरात घुसला. त्यांची पहिलीच भेट विलक्षण होती. इस्माईल मर्चंटने लिहिलंय,"शशी समोर आला आणि मी पाहातच राहिलो. इतका हँण्डसम आणि डॕशिंग हिरो..."...मग इस्माईलने स्वतःची ओळख करुन दिली आणि एका वाक्यात धाड्कन सांगून टाकलं,"हॕलो, मी इस्माईल मर्चंट. अमेरिकेहून आलोय, इंग्लिश फिल्म बनवतोय आणि तू त्याच्यात हिरो असणारेस!"...शशी अवाक् होऊन पाहात राहिला...पण त्याच्याशी गोत्र जुळून शशीने त्याच्या मर्चंट-आयव्हरी प्राॕडक्शनसाठी पुढे सात इंग्लीश मूव्हीज केले.

या "द हाउसहोल्डर" सिनेमासाठी शशी आणि लीला नायडू असे दोघेही देखणे कलाकार..त्यामुळे आपल्याच नाॕव्हेलवर कथा-पटकथा लिहिणा-या रुथ प्राॕवर झाबवाला ला प्रश्नच पडला की दिल्लीतल्या त्या साध्यासुध्या निम्न मध्यमवर्गीय नवरा-बायकोच्या रोलमधे हे दोघं देखणे कलाकार कसे काय शोभणार? (शशी कमालीचा हँडसम होताच, पण लीला नायडूसुद्धा १९५४च्या Vogue मासिकाने जगातल्या सर्वात  सुंदर म्हणून निवडलेल्या १० चेहे-यांपैकी एक गाजलेली होती!)...!..पण शशीने आणि लीला नायडूने अत्यंत साधारण केशभूषा (तेल लावून बसवलेले चप्पट केस) आणि वेशभूषा करुन कॕमे-यासमोर उभं राहिल्यावर रुथला खात्री पटली की दोघंही पात्रांना न्याय देतील म्हणून!..शशीने तर त्यावेळी इस्माईल मर्चंटचं टाईट बजेट पाहून या B&W सिनेमासाठी मानधनही घेतलं नाही!...

प्रेम (शशी कपूर) हा ज्युनियर काॕलेज टीचर आणि त्याची पत्नी इंदू (लीला नायडू) यांच्या आयुष्यात आणि भावविश्वात घडलेली गोष्ट फ्लॕशबॕक पद्धतीनं मांडल्येय यात. त्यांची मानसिक आंदोलनं सुरेख पद्धतीनं घेतल्येत. प्रेम आपल्या पत्नीला इंदूला घेऊन मित्राच्या लग्नाला गेलाय. मित्राच्या बाजूला बसून पारंपारिक पद्धतीनं जुळवलेलं लग्न आणि संसार सुरु केल्यावर आलेले अनुभव त्याला सांगतासांगता प्रेमला स्वतःचा संसार सुरु झाल्यावरचे दिवस आठवतात..

प्रेम बिचारा आपल्या मस्तवाल विद्यार्थ्यांना धड आवरु शकत नसतो आणि काॕलेजच्या प्रिन्सिपाॕलची बोलणी खात असतो. आपल्या १८० रुपये पगारात कसेबसे दिवस ढकलू पाहात असतो. इंदू साधी, सरळ, खाली मान घालून वावरणारी. एकदा पार्टीत तिने पुढ्यातल्या स्वीट्सवर ताव मारत सगळ्यांसमोर चांगली शोभाही करुन घेतल्यामुळे प्रेम कावलेलाच आसतो तिच्यावर. ..एकीकडे मनासारखा पगार नाही, काॕलेजात टवाळी, अवहेलना, बायकोवर प्रेम नाही..अशा सगळ्याचा परिपाक म्हणून तो जवळजवळ फ्रस्ट्रेट झालाय...

त्याच्या उद्विग्नावस्थेत भर म्हणून की काय इंदू प्रेग्नंट आसल्याचं समजतं. 'मूल होऊ देणं परवडणार नाही' असं त्याने म्हटल्यावर इंदू माहेरी जाण्याचा निर्णय घेते...प्रेम आपल्या आईला घरी (दुर्गा खोटे) घरी राहायला बोलावतो. प्रेमच्या आईचं त्याच्यावर प्रचंड प्रेम...तश्यात तिला सुनेचे सगळे दोष दिसायला आणि खुपायला लागतात,..मधल्यामधे प्रेमची स्थिती केविलवाणी...एक दिवस इंदू चिडून बॕग भरुन माहेरी निघून जाते...

प्रेमचे मित्र काय सल्ला देतात?..मनःशांतीसाठी स्वामीकडे गेल्यावर स्वामी (पहाडी संन्याल) काय सल्ला देतो? पगारवाढ मिळण्यासाठी प्रिन्सिपाॕलला आणि घरभाडं कमी करण्यासाठी प्रेमने मालकाला लिहिलेल्या पत्रांचं काय होतं?..

इंदूजवळ तो आपली निराशा व्यक्त करतो...काहीच मनासारखं होत नसल्याचं सांगतो..त्याचा रडवेला चेहेरा पाहून इंदू त्याला जवळ घेऊन समजावते,"का असा निराश होतोयस?...सर्व विसरून जा...आपण आहोत ना एकमेकांसाठी?.मग सगळं विसर बघू ते!..आणि हस एकदा छानसा...म्हण मी सुखी आहे!...सुखी आहेस तू..आणि मी सुद्धा!"...

"एकमेकांवरच्या प्रेमातून मोक्षा शोधा"..हेच जणू त्या स्वामींना सांगायचं होतं?..

एका संथ लयीतला हा सिनेमा. मुळात कमालीच्या देखण्या शशी आणि लीला नायडूने आमुलाग्र बदल घडवून हे साधं, गरीब जोडपं संयत साकारलंय! त्यांची देहबोली आणि एक्स्प्रेशन्समधनं त्यांचा अभिनय भिडतो!...

बघा माझ्या शशीसाठी! आणि लीला नायडूसाठी! 😍

No comments:

Post a Comment