'अ मॕन काॕल्ड ओव्हे'
------------
काल, २७ मे:- मी काहीतरी टाईमपास करत असताना निकिता समोर आली आणि हातातलं पुस्तक माझ्यासमोर धरत म्हणाली,"बाबा तुम्ही 'हे' पुस्तक वाचा. मी दुसरं काहीतरी वाचत्येय!"...(माझ्या दोन्ही मुली - निकिता, गार्गी - चांगलं इंटरेस्टिंग काही वाचत आणि बघत असतात, त्यामुळे निकिताने रेकमेंड केलं म्हटल्यावर, मी हातातलं काम बाजूला ठेवून, तिने दिलेलं पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केली...)
आज, २८ मे :- पुस्तकाचं शेवटचं २९४ व्वं पान संपवून पुस्तक बंद करत एकवार प्रेमानं मुखपृष्ठावर नजर टाकताना डोळ्यंत अश्रुंचा पडदा जमा झाला होता...(खरं तर एका बैठकीतच संपवण्यासारखी ही कादंबरी, पण काही वर्षांपूर्वी वाचण्यापुरती "चाळीशी" डोळ्यांवर चढल्यापासून आताश्या ३०० पानांना दोन दिवस लागायला लागलेत!)
--------------------------------
खूप दिवसांनी काहीतरी छान, satisfying, ठाव घेणारं वाचल्याचा आनंद मिळाला. दोन दिवस जस्सा वेळ मिळेल तस्सा मी ही "ओव्हे"ची कहाणी वाचत गेलो. काये ही ओव्हेची कथा?
३० लाखांहून जास्त खप असलेली फ्रेडरीक बॕकमनची ही मूळ स्विडीश कादंबरी हेन्निंग काॕचने इंग्लीशमधे आणल्येय. एका विक्षिप्त, काहीश्या तिरसट, पण लव्हेबल माणसाची कथा! त्याला स्वतःला शिस्तबद्ध आयुष्य जगायला आवडतंय आणि जेव्हा आसपासची मंडळी - सोसायटीचे साधेसाधे असोत वा बाहेरचे समाजात वावरतानाचे - रुल्स पाळत नाहीत तेव्हा त्याची कवटी सटकते. "Pest!", "Idiots!" त्याचे अश्यांसाठीचे उद्गार आणि मग त्याचं ते चिडून कोटाच्या खिशातल्या खिशात घट्ट मूठ आवळणं!..(त्याचे काही ट्रेट्स माझ्याशी जुळल्यामुळेही असेल, पण मी त्याच्याशी काही प्रमाणात रिलेट करत गेलो वाचतावाचता) 😝
किंचीत संथ गतीनं उलगडणारी स्वीडनमधल्या मध्यमवर्गीय'ओव्हे'ची कहाणी. ५९ वर्षांचा ओव्हे, एका विशिष्ट पठडीतलं आयुष्य जगतोय. तसा साधारण परिस्थितीतनं वर आलाय तो! त्याची स्वतःची काही ठाम तत्त्वं आहेत, काही ठोस विचार आहेत ज्यांच्याशी तो प्रामाणिक आहे. पक्का स्विडीश असल्यानं तो "साब" मेकचीच कार चालवतो आणि जॕपनीज, अमेरिकन कार्स वापरणारे त्याच्या डोक्यात जातात ;-)
कादंबरीची सुरुवात होते तेव्हा त्याचं ते आखीवरेखीव एकटेपण उलगडत जातं. जवळपास चाळीस वर्षं तो त्या दुमजली घरात राहतोय. गजराचं घड्याळ न वापरणारा ओव्हे, रोज बरोब्बर पावणेसहाला उठतो आणि त्याचं ते मजेशीर त-हेवाईक रुटीन सुरु होतं. तो फार बोलका नाही. (तरीही प्रेमविवाह होऊन खूपच सुंदर बायको मिळवली होती त्यानं. पण मूल तिच्या पोटात असताना झालेल्या बस अपघातात मूल दगावलेलं असतं आणि पुढे तिलाही कॕन्सर होऊन तीही गेलेली असते.)..
सुरुवातीलाच कुणी नवीन राहायला आलेले शेजारी त्यांची ट्रेलर जोडलेली कार त्याच्या कुंपणावर धडकावत त्याचं डोस्कं फिरवतात. पॕट्रीक, त्याची तिस-या वेळेला प्रेग्नंट असणारी इराणी बायको पारवाने आणि सात आणि तीन वर्षांच्या दोन मुली!..आणि मग कादंबरीच्या शेवटापर्यंत त्या फॕमिलीबरोबर रंगणारे कित्येक खुसखुशीत आणि धम्माल विनोदी प्रसंग!
जिच्यावर आत्यंतिक प्रेम होतं ती बायको, सोनिया आता जगात नसल्यामुळे त्याला एकटेपणा नकोसा झालाय ...आता त्याचा जाॕबही नाहीये..,तो सतत आत्महत्येचे प्रयत्न करु पाहतो...अगदी न्यूजपेपर घेणं बंद करुन, रेडिएटर्स स्विच आॕफ्फ करुन, घरातले दिवे घालवून वगैरे तयारी करुन कधी छताला दोर बांधून फाशी घेऊन, कधी रेल्वेसमोर उडी टाकून, कधी बंदुकीची गोळी उडवून..पण प्रत्येकवेळी काहीतरी अनपेक्षित भलतंच घडून त्याचा आत्महत्येचा पोपट होत राहतो...! ;-)
ओव्हेचं बालपणापासूनचं आयुष्य...कामगार बापाकडनं रक्तातनंच चालत आलेला प्रामाणिकपणा...सोनिया भेटते तो प्रसंग...तिच्या वडिलांना तो भेटतो तो प्रसंग...ज्या एरियात तो राहात असतो तिथले एकेक नमुने..त्या सर्वांमधून त्याची ठळक होत जाणारी व्यक्तिरेखा...
पण ओव्हे ख-या अर्थानं समोर उभा राहतो तो सोनियाबरोबरच्या, शेजारच्या पारवाने बरोबरच्या आणि त्याला सतत पिडणा-या मांजरीबरोबरच्या प्रसंगांमधनं..🐱😝
सोनियासारखी सुंदर मुलगी आयुष्यात येते तेव्हाचं वर्णन अक्षरशः दोन वाक्यांत उभं राहातं आपल्यासमोर - "He was a man of black and white. And she was colour. All the colour he had". तिला पहिल्यांदा तो पाहतो तेव्हाची ती -"She had brown hair and blue eyes and red shoes and a big yellow clasp in her hair..." आणि मग...मग काय...And then there was no more peace and quiet for Ove." ...त्यावेळी त्याला कुणी विचारलं असतं की ,"कसा जगत होतास ती भेटण्याआधी?"..तर त्याचं नक्की हेच उत्तर असतं-"जगलो?..मी?..छे..छे...मी कुठे "जगत" होतो आजपर्यंत!".😜...(आणि ती गेल्यावर तरी कुठे "जगत" राहिला तो...?!! ती गेल्यावरचं त्याचं नेहेमी जाऊन तिच्या थडग्याला भेट देणं,..ती ऐकत्येय असं समजत तिच्याशी गप्पा मारणं हे खूप स्पर्शून जातं...आणि त्याच्या आयुष्यात त्याला अज्जिबात आवडत नसणा-या त्या मांजरीने मात्र त्याला मूक साथ देणं...
कादंबरीच्या शेवटाकडे जातानाचं एक प्रकरण खूप छान फिलाॕसाॕफिकल होत उलगडतं...सुरुवात एका वाक्यानं -"Death is a strange thing.."..आणि मग मृत्यूविषयी थोडं चिंतन...सोनिया सोडून गेल्यावरची त्याची मनःस्थिती.."Grief is a strange thing"...त्यानंतर ओव्हेजवळ बसलेल्या पारवानेची शोकाकूल अवस्था... "Love is a strange thing.." ..आणि मग शेवटच्या प्रकरणाची सुरुवात -"Life is a curious thing.."...आणि तो विलक्षण तरल...शेवट....
No comments:
Post a Comment