मूनस्ट्रक!!
-------
चंद्राच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर जसे भौगोलिक परिणाम होतात तसेच मानवी मनावरही परिणाम होतात. आणि मनानं कमकुवत किंवा अति भावनाप्रधान, (आणि रोमँन्टिक!) असणा-या माणसांवर तर जरा जास्तच! म्हणूनच असेल पण मग मनानं कमकुवत असणा-यांना 'वेडाचे झटके' येतात त्यांना चंद्राच्या लॕटीन 'ल्युना' शब्दावरनं 'ल्युनॕटिक' म्हटलं जातं, तर ज्यांना 'प्रेमाचे झटके' येतात अशांच्या स्थितीचं वर्णन "मूनस्ट्रक" शब्दात केलं जातं! ;-)
प्रेमिकांच्या बाबतीत चंद्राला विशेष महत्त्व आहे..आणि कवी मंडळी तो अचूकपणे शब्दांतनं व्यक्त करतात! पूर्णाकृती चंद्रबिंब पाहणं आणि त्यात हरवून जाणं ही तर प्रेमिकांची खासियत! प्रियकर आणि प्रेयसीचं एकाचवेळी त्यात हरवून जाणं "विंदा"नी किती सुंदर मांडलंय - "एकाच चांदणीत मिळतील चार डोळे, या जाणीवेत लाभे काही मुके निराळे.." (मी अनुभवलंय हे कोणे एके काळी!☺️)..
तर असं चंद्रबिंबाचं झपाटणं अनुभवणा-या भावनाप्रधान माणसांची कथा म्हणजे १९८७ सालचा, नाॕर्मन जुईसन या दिग्दर्शकाचा तीन आॕस्कर विजेता रोमँन्टिक मूव्ही "मूनस्ट्रक"!
ही कथा आहे कॕस्टाॕरिनी या अमेरिकेत स्थायिक झालेल्या इटालियन कुटुंबाची आणि त्यातल्या लाॕरेट्टा (शेर) ह्या ३७ वर्षीय सुंदर विधवेची! (कुरळ्या केसांची 'शेर' ही मुळात प्रचंड लोकप्रिय पाॕप सिंगर..पण तिने ह्या सिनेमात लाॕरेट्टाची भूमिका अप्रतिम रंगवली आणि अभिनयाचं आॕस्करही पटकावलं!)
लाॕरेट्टाचं पुन्हा लग्न ठरलंय साध्यासरळमार्गी जाॕनीशी (डॕनी आईल्लो). लाॕरेट्टाला एंगेजमेंट रिंग देऊन तो तडक सिसीलीला गेलाय शेवटच्या घटका मोजणा-या आईला बघायला. आई जाणार हे निश्चित आहे आणि ती गेल्यावर तो परत येऊन लाॕरेट्टाशी लग्न करणारेय. त्याचा भाऊ राॕनी (निकलस केज). जाॕनीमुळे त्याने आपला डाव्या हाताचा पंजा गमावलाय आणि तिथे कृत्रिम पंजा लावून तो जाॕनीविषयी आयुष्यभराची चीड मनात ठेवून जगतोय...
आणि मग... तो पौर्णिमेचा चंद्र उगवतो आणि कॕस्टाॕरिनी कुटुंबावर आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करतो... लाॕरेट्टाच्या आईचं, रोझचं (आॕलिंम्पिया ड्युकॕसिस) नवरा काॕस्मोशी (व्हिन्सेंट गार्डेनिया) फार ग्रेट पटत नाही तरी पतीवर प्रेम आहे.. त्याने या वयातही बाहेर कुणाशीतरी सूत जमवलंय (चंद्रकिरणांची जादू?!!)...
जाॕनीच्याच सांगण्यावरनं लाॕरेट्टा राॕनीला भेटायला जाते. पहिल्या भेटीतच तिला त्राॕनीच्या प्रचंड आक्रस्ताळ्या रागीट स्वभावाचा अनुभव येतो...पण त्याला समजावता समजावता ती त्याच्या धसमुसळ्या चुंबनात अडकते आणि रात्र त्याच्याबरोबरच घालवते (चंद्रकिरणांचा प्रभाव?!!)..
रोझ नव-याला मिस्स्स करताकरता एकटीच जेवणासाठी हाॕटेलमधे जाते आणि प्रोफेसर पेरीशी (जाॕन महोनी) तिची पहिल्या भेटीत दोस्ती होते. (चंद्रकिरणांची जादू?!!)..प्रोफेसर डिनरनंतर तिला सोडायला अगदी घरापर्यंतही येतो...वाटेत नेमका कुत्र्यांना राऊंड मारायला आणणारा रोझचा म्हातारा सासरा त्या दोघांना एकत्र बघतो आणि वैतागतो...घरापर्यंत कंपनी देऊन निघणा-या प्रोफेसरला रोझ 'गुडबाय किस' मात्र देत नाही...तिकडे राॕनीबरोबर संध्याकाळी उशीरा आॕपेरा बघायला गेलेली लाॕरेट्टा त्या थिएटरमधे प्रेक्षकांच्या गर्दीत आपल्या बाबांना (काॕस्मो) सामोरी जाते जिथे ते मैत्रिणीबरोबर आलेत (चंद्रकिरणांची जादू?!!) ..गोचीच गोची..🙄😝
लाॕरेट्टाच्या आईला, रोझला प्रश्न पडलाय "पुरुष स्त्रीच्या मागे का लागतो?"...त्यावर सरळमार्गी जाॕनीचं उत्तर असतं -"अॕडमने (आदिपुरुषानं) आपल्या बरगडीपास्नं इव्ह (स्त्री) तयार केली, त्यामुळे त्याच्या छातीत एक पोकळी निर्माण झाली. .म्हणून ती रिकामी पोकळी पुन्हा भरुन काढण्यासाठी त्याला स्त्री हवी असते!!"...त्यावर रोझचा पुढचा प्रश्न असतो-"मग पुरुष एकापेक्षा जास्त स्त्रियांच्या मागे का धावतो?"...त्यावर साध्याभोळ्या जाॕनीचं उत्तर असतं -"कदाचित 'पुरुष मरणाला भीत असतो' म्हणून?!!" आणि तिला ते पटतं..आणि मग रात्री उशीरा घरी परतलेल्या नव-याला ती लगोलाग ऐकवतेच -"I just want you to know that no matter what you do, you're still gonna die! Just like everyone else!"..(मला तो प्रसंग आणि ते उत्तर आणि तो सीन एकंदरित विचारात पाडून गेला..) 🤔
एक चमत्कार होऊन जाॕनीची आई मरणाच्या दाढेतनं बाहेर येते..इतकंच नव्हे तर खडखडीत बरीही होते...जाॕनी दुस-याच दिवशी लाॕरेट्टाला भेटायला ब्रेकफास्टच्या वेळेला कॕस्टाॕरिनी फॕमिलीच्या घरी येतो तर तिथे राॕनी आधीच हजर आहे...टेन्स वातावरण...आदल्या रात्री उशीरा आलेल्या नव-यावर कावलेली रोझ...रोझला प्रोफेसरबरोबर घरी परतताना पाहिलेला सासरा...राॕनीची ब्रेकफास्ट टेबलवर उपस्थिती...शेवट काय होतो?...लाॕरेट्टाचं ठरल्याप्रमाणे जाॕनीशीच लग्न होतं का?..लाॕरेट्टाच्या आई-बाबांमधला बेबनाव मिटतो का?..चंद्राची जादू कायकाय परिणाम घडवते?..या सगळ्याच्या उत्तरासाठी "मूनस्ट्रक" बघा!..डायलाॕग्जसाठी!...निकलस केजसाठी!!...आणि अर्थातच शेर साठी!!
No comments:
Post a Comment