-----------------------------
"तुला भूतकाळात जन्म घ्यायला मिळाला आणि चॉईस दिला तर कुणाचं आयुष्य जगायला आवडेल?" असा प्रश्न मला कुणी विचारल्यावर, माझं हटकून उत्तर असायचं "भारताबाहेर गतकाळातला जन्म मिळाला तर एडवर्डिअन ईरामधल्या ब्रिटिश कंट्रीसाईडमधे एखाद्या सधन घराण्यातला कुणीही" पण भारतातलाच मिळणार आसेल तर मात्र "राज कपूरचंच आयुष्य जगायला आवडेल!"...
काय की, पण मला या दोन गोष्टींविषयी प्रचंड आकर्षण आहे. "ब्रिटिश कंट्रीसाईड" ही सुरुवातीला माझ्या लाडक्या वुडहाऊसच्या कादंब-यांमधून आणि नंतर प्रख्यात इंग्लिश अंपायरच्या पुस्तकातून "डिकी बर्ड'स ब्रिटन" मधून डोळ्यांसमोर उभी राहिली होती, पुढे 2006 साली दीड महिन्याःसाठी का होईना जवळून पाहायलाही मिळाली आणि घुसलीच मनात. कायमची! तस्संच राज कपूरचं आयुष्य!! इतकं प्यारं आणि जवळचं वाटत आलंय मला म्हणून सांगू?!!! किती बहुरंगी आणि बहुढंगी जगावं माणसाने?!! एकाचवेळी किती गिफ्टेड, क्रिएटिव्ह आणि टॅलेंटेड असावं माणसाने?!! उत्तम अभिनय, डोकेबाज संकलन, अफलातून दिग्दर्शन आणि जोडीला चोखंदळ निर्मिती! त्याच्या आयुष्यातल्या एकेक गोष्टी ऐकून मी भारला गेलो होतो! गंमत म्हणजे त्याच्या आयुष्यातल्यासारखेच हुब्बेहुब दोनतीन प्रसंग माझ्याही आयुष्यात घडल्यामुळे तर, मला त्याच्या एकूण आयुष्याबद्दल जास्तच आकर्षण! ;-)
प्रेम या संकल्पनेच्याच मी प्रेमात त्याच्यासारखाच!! थोडक्यात, 'प्रेम' हा स्थायीभाव असल्यामुळे राज कपूर मला जरा जास्तच आवडतो! त्याने स्वतःच्या फिल्म्समधून सामाजिक समस्या आणि विषय मांडले तरी त्या मांडणीच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा खूपच धीटपणे आणि बघणा-याला अपील होतील अशा संवेदनेनेच मांडल्या!! तो होता राजबिंडा यात शंकाच नाही! 'चोख अॕक्टिंग, खानदानी पठाणी पंजाबी वर्ण, निळ्या डोळ्यांचा' वगैरे जे "संगम" मधल्या सुंदरच्या भूमिकेतून ठळकपणे जाणवलं होतं! भले त्याच्याकडे दिलीपकुमारसारखी मेथॉडिकल अॕक्टिंग नसेल किंवा देव आनंदइतका कमालीचा देखणा चेहरा नसेल; पण तरीही १९४९ ते १९६४ पर्यंतची १५ वर्षं तो त्यांच्याबरोबरीने आघाडीचा पॉप्युलर स्टार होता!! अजूनही त्याकाळात रमणाऱ्या लोकांना दिलीप-राज-देव त्रिकूट एकत्रच आठवतं! दोस्तीही होतीच त्यांच्यात, म्हणून तर दिलीपकुमारच्या लग्नात त्याने आणि देव आनंदने बारातीची जबाबदारी सांभाळली होती. आपल्या संपूर्ण करियरमधे दिलीपबरोबर देव आनंदने 'इन्सानियत' हा एकच सिनेमा केला, तसाच राजनेही दिलीपबरोबर 'अंदाज' हा एकमेव सिनेमा केला होता! दिलीप बऱ्याचदा सीधासरळ देहाती किंवा शहरी हिरो असायचा, देव आनंद बऱ्याचदा अंडरवर्ल्डशी संबंधित अत्यंत स्टायलिश चिकणा हिरो, तर राज कपूर मात्र भोळाभाबडा पण प्रामाणिक क्वचित ट्रॅम्पच्या भूमिकेत असायचा!
त्याची अचिव्हमेंट अद्भूत आणि थक्क करणारी! म्हणजे बघा नं - वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी काढून 'आग', २५ व्या वर्षी 'बरसात', २७ व्या वर्षी 'आवारा' आणि ३१व्या वर्षी 'श्री ४२०' सारख्या एकसोएक अफलातून सिनेमांची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्याचबरोबर अभिनय ही कामगिरी अफाटच्च!! त्यातही वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी 'आवारा' मध्ये ते अभूतपूर्व असं स्वप्नदृश्य इमॅजिन करून, तसा सेट करायला लावून 'घर आया मेरा परदेसी' सारखं गाणं चित्रीत करणं यासाठी अचाट प्रतिभाच लागते जी त्याच्याकडे होती. पुढे ४०व्या वर्षी संपूर्ण टेक्निकलरमध्ये आणि पहिल्यांदाच भारताबाहेर युरोपमध्ये शूट केलेला 'संगम'सारखा भव्य, दोनदोन इंटरव्हल असणारा सिनेमा त्याने केला. आणि एकीकडे असे माईलस्टोन मुव्हीज करत असताना 'अंदाज', 'जागते रहो', 'फिर सुबह होगी', 'तिसरी कसम', 'अनाडी' सारख्या सिनेमांमधून अफलातून जिवंत अभिनयसुद्धा केलान!!
एखाद्याा गोष्टीत झोकून देण्याच्या स्वभावानुसार अहोरात्र, अखंड सिनेमाचा ध्यास आणि त्यातच रंगून जाताना "नर्गिस, वैजंयन्तीमाला, पद्मिनी"मध्ये दिल-से इन्व्हॉल्व्ह होणंही झालं! त्याच्या गुलजार वृत्तीइतकीच त्याच्या दिलदारपणाचीही चर्चा त्याकाळी होत असे. आरके स्टुडिओच्या होळी आणि गणेशोत्सवानिमित्त त्याचं सर्वांमध्ये मिसळणं, चेंबूरला बंगल्याजवळच्या भेळवाल्याकडे जाऊन भर लोकांमधे फुटपाथवरच खुर्चीत बसून तब्येतीत पाणीपुरी, भेळपुरी हाणणं हे लोकांमध्ये कौतुकाचे विषय असायचे. शिवाय त्याच्या मालकीच्या आर.के.स्टुडिओच्या कँन्टिनचं आॕम्लेट, दाल-चावल आणि फिशकरीं-राईस तर भल्याभल्या खवय्यांना प्यारे होते!
एकीकडे फिल्मी लाईफ सांभाळून कपूर घराण्यातला मोठा भाऊ म्हणूनही त्याचे अनेक घरगुती रंजक किस्से ऐकलेत. विशेषतः माझ्या शशीवरचं त्याचं प्रेम आणि त्या भावांचे खूप सारे किस्से! शम्मी आणि त्याच्यात 7 वर्षांचं अंतर तर शशी त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान त्यामुळे शशीवर तर त्याचं जणू पुत्रवत प्रेम होतं. म्हणून तर आग आणि आवारामधल्या आपल्या लहानपणीच्या भूमिका त्याने शशीकडूनच करवून घेतल्या आणि त्याही छोट्या शशीचे शुटींगदरम्यानचे खाण्यापिण्याचे नखरे सांभाळून!! ते सर्वजण एकत्र राहात असताना शशीने खोड्या काढल्या, खेळताना दंगा करुन आरडाओरड करुन डोकं फिरवलं तर तो शशीवर चांगलाच खसकायचा, प्रसंगी दोन रट्टेही हाणायचा पण शशीने भोकाड पसरल्यावर मात्र स्वारी विरघळून शशीला जवळ घेऊन त्याचे सर्व लाड पुरवत असे! (मी दिलेत त्यांचे काही गोड किस्से माझ्या "प्रिन्स चार्मिंग" पुस्तकात!)
त्याच्या वाढदिवसानिमित्त माझ्या लाडक्या रफीसाबच्या आवाजातलं त्याचं हे गाणं!
https://youtu.be/Ag2XtqWZ5jE

No comments:
Post a Comment