Monday, 14 June 2021

कणेकर आणि माझी फजिती..

शिरीष कणेकर आणि माझी फिरकी...
----------------
"क्रिकेट आणि जुन्या हिंदी" सिनेमांवर (आणि अर्थात जुन्या हिन्दी गाण्यांवर) प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने कणेकरांच्या बहुतेक सर्वच पुस्तकांची पारायणं केलेली असतात."यादों की बारात" आणि "गाये चला जा" घरच्या शेल्फमधे नसतील तर आपल्या कलेक्शनला पूर्णत्त्व नसतं.. त्यांचे 'फिल्लमबाजी', 'फटकेबाजी' आणि 'कणेकरी' सर्वांनी नक्कीच पाहिलेले असतात किंवा किमान त्याच्या कॅसेट्स तरी पाठ होईस्तो ऐकलेल्या असतात!! आपण प्रत्येकानेच जे काही सिनेमाविषयक ज्ञान मिळवलेलं असतं त्यात रेडियो सिलोन, विविधभारती इतकीच मदत आपल्यला 'इसाक मुजावर, कैलास झोडगे, माधव मोहोळकर, विजय जानोरकर, विजय पाडळकर, अंजनकुमार, सुलभा तेरणीकर, मृदुला दाढ्ये-जोशी आणि अर्थातच शिरीष कणेकर यांच्या पुस्तकांची झालेली असते!!

त्यांच्या हज्जारो भक्तांमधलाच मीही त्याचा एक भक्त! मराठी विनोदी लेखकांची लिस्ट (अगदी श्रीपाद कृष्णांपासून-) करायला बसलो तर मला वाटतं धुमाकूळ विनोदी लिहिणाऱ्या पहिल्या पाच-सहांमध्ये कणेकरांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल इतकं धम्माल, मुरकुंडी वळेल असं हुकुमी विनोदप्रचुर लिखाण त्यांनी केलंय! गंमत म्हणजे पु.लंच्या नंतर 'स्टॅन्ड-अप-कॉमेडी' मध्ये त्यांच्याइतकं यश आणि लोकप्रियता कुणाला लाभली नसेल! फिल्लमबाजी सदर करतानाचे किस्से किंवा फटकेबाजीमधले किस्से ऐकताना हंसून मरायला झाल्याचा अनुभव प्रत्येकानेच पुनःपुन्हा घेतला असेल!

माझ्या एकदा त्यांनीच केलेल्या फजितीची ही छोटीशी आठवण -->

बोरिवलीत राहत असताना, त्यावेळी मी आमच्या सोसायटीच्या सांस्कृतिक मंडळाचा जॉइंट- सेक्रेटरी होतो. डिसेंबरमध्ये नेमेची तीन दिवस चालणा-या सोसायटीच्या वार्षिकोत्सवात आम्ही त्या वर्षी 'कणेकर-अनंत भावे' जोडीचा 'फिरकी फिरकी' हा कार्यक्रम ठेवला होता. त्यांच्या धमाल गप्पा आणि किस्से यांतून उलगडत जाणारा मजेशीर कार्यक्रम असं त्याचं स्वरूप होतं. आमच्या सोसायटीच्या चाळीस फुटी पाण्याच्या टाकीवर मस्तपैकी स्टेज बांधून तीन दिवस कार्यक्रम असायचे. समोर मोठ्ठं पटांगण आणि त्याच्या मागे एक आडवा कट्टा. त्या रात्री खच्चून झालेली गर्दी!...कार्यक्रमाच्या सुरुवातीचं निवेदन करून मी स्टेजवरून उतरून समोर बसलेल्या गर्दीच्या मागच्या कट्ट्यावर मित्रांबरोबर बसून कार्यक्रम एन्जॉय करत होतो. धम्माल रंगला होता कार्यक्रम. ..

कार्यक्रम संपला. लोकांनी टाळ्यांचा कडकडात केला. एव्हढ्यात कुणीतरी मला अंधारात ढोसलं-

"अरे प्रसन्न, कार्यक्रम संपला. आभार प्रदर्शन कर जा."

"मी कुठे परत जाऊ? मी सुरुवातीचं बोललो आता तो अनिल ओक सेक्रेटरी आहे. तो करेल आभार प्रदर्शन"..

मी म्हटलं खरं, पण अनिल ओक कुठेच दिसेना. दोन तीन सेकंद तसेच गेल्यावर मग कुणीतरी चार शब्द बोलायलाच हवेत म्हणून मी गर्दी कापत स्टेजवर धाव घेतली...

धापा टाकत कणेकर आणि भाव्यांच्या समोरचाच टेबलवरचा माईक उचलून सुरुवात केली -"आपण सर्व रसिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून आजचा "फिरकी फिरकी" हा कार्यक्रम शिरीष कणेकर आणि अनंत भावे यांना ..." --- पुढे मी एक सेकंद अडकलो...मी ते वाक्य असं काही विचित्र पद्धतीने सुरु केलं की "यांना..." च्या पुढे काय म्हणू?...माझ्या डोक्यात पुढे काही सुचेपर्यंत मागे बसलेल्या कणेकरांनी मला इम्प्रॉम्प्च्यू प्रॉम्प्टिंग केलं -"सहन केलंत--" आणि मीही कानात पडलेले ते शब्द घाईघाईच्या नादात जसेच्या तसे उच्चारून मोकळं झालो "सहन केलंत"...त्यामुळे ते वाक्य "शिरीष कणेकर आणि अनंत भावे यांना सहन केलंत" असं तयार होऊन जमलेलं पब्लिक लोटपोsssट!!😜🤣

मला दोन सेकंद लागले झालेला घोटाळा लक्षात यायला!! खजील होऊन मग मी ते वाक्य सुधारून बोललो खरा..पण भर पब्लिकसमोर कणेकरांनी घेतलेली फिरकी चांगलीच याद राहिली!🙄😉😝

No comments:

Post a Comment