मेमरी..
वोह दिन कहाँ गये बता..
-------
बोरिवलीच्या गोखले हायस्कूलमधे असताना आयुष्यभर बाईंच्या टेबलला चिकटून असणा-या पहिल्याच बेंचवर बसणारा मी, काॕलेजात गेल्यावर बॕक बेंचर बनून केलेली सगळी मजा इथे सांगत बसत नाही, पण एक वेगळा आवडीचा एंजाॕय केलेला टाईमपास म्हणजे 'अ ते ज्ञ' पर्यंतची सगळी अक्षरं घेऊन त्यातली 'ङ्, ञ, ळ, ण, क्ष, ज्ञ' अशी काही अक्षरं सोडता बाकी जवळपास प्रत्येक अक्षराच्या बाराखडीवरुन सुरु होणारी हिंदी गाणी आठवतील तसतशी त्या बॕकबेंचवर बसून वहीत लिहित सुटलेलो ;-)
एकदा कधीतरी टाईमपास म्हणून सुरु झालेला तो प्रकार पुढे पुढे तर चटकच लागली त्याची.. आणि मग गाण्याची पहिली ओळ लिहून पुढे कंसात त्याचा सिनेमा, गीतकार, संगीतकार आणि गायक अशी सगळीच माहिती लिहून काढायचा आवडीचा उद्योगच होऊन बसला!!.आणि हे गुगलच नव्हे तर मुळात कम्प्युटर्सही नव्हते त्या काळात!!! :-D ...अर्थात ते गाण्यांविषयीचं चहुअंगांनी प्रचंड नाॕलेज मिळायचे दोनच स्रोत होते "रेडिओ" आणि "सिनेसंगीतांविषयीची पुस्तकं" आणि "रसरंग/ चित्ररंग/ स्टार अँड स्टाईल, स्टारडस्ट, फिल्मफेअर, मायापुरी, पिक्चरपोस्ट (छोट्या आकाराचं) आणि स्क्रीन"सारखी साप्ताहिकं/ मासिकं"... ती तुफ्फान वाचायचो!!...आणि हो ते सेंट्रल प्रकाशनच्या 'एफ.सी.बु-हानपूरवाल्याच्या छोट्या फोल्डिंग पुस्तिका' असायच्या त्याही जमवलेल्या होत्या (हल्ली पेप्रातनं आरतीसंग्रह मिळतात तसल्या आकाराच्या!) ...
अशातच शोध लागला तो कानपूरचा हरमंदिरसिंग 'हमराज' काढत असलेल्या "लिसनर्स बुलेटिन"चा! मग मी लगोलग त्याचा पत्ता मिळवून त्याला मनिआॕर्डरने वार्षिक वर्गणी भरुन (हो, त्याकाळी मोबाईल आणि जी-पे नसायचं बरं!) ते बुलेटिन चालू केलं जे पोस्टाने यायचं घरी!एकीकडे ती २०० पानी वही भरत होतीच..,अशातच हरमंदिरने एक दिवस त्याच्या "हिंदी फिल्म गीत कोशां"ची अनाउन्समेंट केली. १९३०/४०/५०/६० आणि ७० अशा पाचही दशकात प्रसिद्ध झालेल्या यच्चयावत् सर्व सिनेमांमधल्या गाण्यांची डिरेक्टरीच असणार होती तो एकेक खंड म्हणजे!!...सिनेमाचं नाव, जाॕन्र, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, प्रत्येक गाण्याची पहिली ओळ, गीतकार, संगीतकार आणि प्रत्येक गाण्याच्या HMVच्या रेकाॕर्डचा नंबर- असं सगळं त्यात!..(मला जेन्युइन इंटरेस्ट होता १९४८ ते १९७३ मधल्या २५ सुवर्णयुगी वर्षांमधल्या गाण्यांत!!)...
पहिलाच कोश निघाला तो १९५१-६० दशकाचा!!..त्याचं प्रकाशन झालं होतं चर्चगेटच्या जयहिंद काॕलेजच्या हाॕलमधे!.(मंजू येऊ शकणार नव्हती पण माझी मेव्हणी आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या बरोबर!)....क्काय माहोल होता तो!!..नौशाद, बुलो सी.रानी सारखे संगीतकार, राजकुमारी आणि जोहराजान अंबालावालीसारख्या गायिका आणि इतरही बरेच मान्यवर उपस्थित होते!..मोठ्या दिमाखात प्रकाशन सोहळा पार पडला आणि मी तो १९५१-६० मधल्या गाण्यांचा कोष घेऊन घरी आलो!!..पुढे मी १९६१-७० मधल्या गाण्यांचाही कोश विकत घेतला आणि अशात-हेनं मला प्रचंड प्रिय असणा-या १९५१ ते १९७० मधल्या दोन दशकांतल्या सगळ्या सिनेमांच्या आणि गाण्यांच्या माहितीची माझ्या संग्रहात भर पडली! (आजकालच्या पिढीला ते गुगलमुळे एका क्लीकवर उपलब्ध आहे म्हणा...पण माझ्या त्या दोन छापील कोशांचं अफाट महत्त्व आहे माझ्यासाठी!) ;-)
तोपर्यंत माझी हिंदी सिनेमांची गाणी ऐकण्याची आवड जरी रेडिओ पुरवत असला, तरी हवं तेव्हा आवडीची गाणी ऐकण्यासाठी कॕसेट्स आणि प्लेयर घरी असणं आवश्यक ठरत होतं...पण त्यावेळी नुकताच इंजिनियर होऊन पहिलावहिला जाॕब सुरु केल्यामुळे पैसे फार नव्हते! मग -"प्लेयर घेऊ नंतर, आधी कॕसेट्स तर जमवू" - असा विचार करुन मी माझ्याकडे त्यावेळी असलेल्या गाण्यांच्या माहितीच्या प्रचंड खजिन्याचा वापर करुन, एकसोएक लीस्ट्स तयार केल्या. ब-यापैकी पैसे खर्च करुन सोनी आणि टीडीकेच्या ब्लँक आॕडिओ कॕसेट्सच्या थप्प्या विकत घेतल्या आणि त्यावेळी बोरिवलीत आमच्या वझिरा नाक्याहून लोकमान्य टिळक रोडने स्टेशनकडे जाताना डावीकडे एक "गाला इलेक्ट्राॕनिक्स" नावाचं शाॕप होतं त्याच्याकडे जाऊन त्या ब्लँन्क कॕसेट्सचा ढीग आणि मी मोठ्या मेहनतीने त्या गीतकोशांचा आणि माझ्या वहीतल्या नोंदींचा वापर करुन बनवलेल्या सगळ्या लिस्ट्स त्याच्या पुढ्यात टाकल्या!..तो गुज्जु माणूस उडालाच!!.."अरे कहाँसे निकाले तुमने ये सब गाने और लीस्ट्स?"...तो वेडाच झाला होता!!.. कारण त्याला मुळात त्याच्याकडे उपलब्ध असलेली आणि नसलेली गाणी गोळा करुन मला हवी त्या क्रमाने मला हव्या त्याच कॕसेट्समधे टेप करुन द्यायची होती...पण तोही रसिक निघाला...थोडे दिवस घेतले त्याने, पण मला हवी तश्शी त्या त्या काँम्बिनेशनची गाणी त्याने त्या त्या कॕसेट्समधे रेकाॕर्ड करुन दिलीन्!
मग सगळ्या कॕसेट्सचा तो खजिना घरी नेऊन प्रत्येक कॕसेटच्या जॕकेटच्या आतल्या कागदावर A आणि B साईडला त्या त्या क्रमाने येणा-या गाण्याचा मुखडा आणि डिटेल्स माझ्या सुवाच्च अक्षरात लिहिण्याचं काम अत्यंत आवडीनं केल्यावर माझ्याकडे ब-यापैकी छानछान गाण्यांची मला हव्या त्या गायक-संगीतकार काँम्बीनेशन्सच्या १९४६ ते १९७१ मधल्या सुवर्णयुगी २५ वर्षांतल्या गाण्यांच्या कॕसेट्सचा ढीग तयार झाला!!...पण गंमत म्हणजे तोपर्यंत तरी माझ्याकडे कॕसेट प्लेयरच नव्हताच!!
त्यावेळी मग मी कॕसेट्स घेऊन मित्राच्या घरी जाऊन त्या ऐकायचो...क्वचित माझा मित्र त्याचा तो नॕशनलचा मोनो कॕसेट प्लेयर मला माझ्या घरी न्यायला द्यायचा..मग तर मी घरी अक्षरशः त्या सगळ्या कॕसेट्स वेड्यासारख्या भान हरपून ऐकायचो...
यथावकाश आम्हीही आधी जरा स्वस्तातला पियानो स्टाईलचा कॕसेट प्लेयर घेतला! आणि मग तर काय मला माझ्या आवडीच्या तलतच्या, रफीच्या, तलत-लता ड्युएट्सच्या, लता-सी.रामचंद्र, लता-मदनमोहन, रफीसाब-सचिनदा, लता-शंकरजयकीशन, किशोर-सचिनदा, आशा-ओपी वगैरे वगैरे पंधरा-वीस काँम्बिनेशन्सच्या कॕसेट्स ऐकायला वेळच पुरेनासा झाला...!!
कधीकधी तर म्यॕडसारखं एक्कच गाणं रिवाइंड करकरुन १४-१४ १५-१५ वेळा ऐकायचो (शिनशिनाकी बुबलाबू मधलं "तुम क्या जानो तुम्हारी याद मे"..असंच संतोषच्या घरी १४ वेळा रिवाईंड केल्यावर आम्ही दोघं सोडून, बाकीचे मित्र बाहेर ग्यॕलरीत जाऊन गप्पा मारत बसले होते आम्हाला मूर्खात काढून!! 😝😆
अज्जूनही मी त्या १९४८ ते १९७३ मधल्या गाण्यांमधेच अडकलोय..तिथेच रमतो!...मला मंजूने कितीही "गंजका..बुढ्ढा" म्हटलं त्यावरुन तरी अज्जिब्बातच काही वाटत नाही...आजही अंताक्षरी खेळताना त्याच काळातली गाणी एक्कापाठोपाठ एक उलगडत जातात...अगदीच क्वचित त्यानंतरच्या काळातल्या येशुदाससारख्याचं एख्खादं गाणं डोकावलं तर डोकावतं म्हणा...पण कित्तीही तास अंताक्षरी खेळलो तरी चुक्कुनही १९७३ च्या पुढच्या मंडळींची गाणी आठवतही नाहीत आणि म्हटली तर त्याहून जात नाहीत!...(मी त्याअर्थाने बुढ्ढा, म्हातारा...अगदी जराजर्जरही म्हणाच ना!! ;-) .पण... क्काय झपाटलेले दिवस होते ते!!!
वोह दिन कहाँ गये बता...
No comments:
Post a Comment