Monday, 14 June 2021

इम्-पर्मनन्स

मेमरीतून...

Impermanence!!
----------------
मला ते एक वाक्य ज्याम पटायचं नाही की -"होतं ते भल्यासाठीच (चांगल्यासाठीच) होतं" वगैरे!

वाटायचं की एखादी वाईट, अप्रिय, दु:खद किंवा पीडेश घटना घडली तर ती भल्यासाठीच किंवा चांगल्यासाठीच घडली म्हणणं हा तर मूर्खपणाच, नाही का? म्हणजे- आपली परीक्षेत वाट लागणं...प्रेमात पोपट होणं...कुणी जवळचं माणूस जाणं...किंवा अगदी मोबाईल कुठेतरी विसरणं/ हरवणं वगैरे... आता ह्या सगळ्यात आपलं भलं कुठं आणि कसं लपलंय हे शॕटमारी कळायचं नाही...आणि मग तसलं वाक्यं अलम दुनियेवर फेकणाऱ्या त्या कुण्या यडबंबूला शिव्याच घालाव्याश्या वाटायच्या.. 😉

पण अलीकडे काही अनुभवांती आणि  काही छान बौद्धिक वाचनांती मला या वाक्यातली खोली जाणवायला लागल्ये! जरा नव्यानं बघतोय त्या (कु)प्रसिद्ध वाक्याकडे! म्हणजे अगदी हल्लीच मी थोडं बौद्ध तत्त्वज्ञानातलं "impermanence"विषयी वाचलं! "जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही, चिरंतन नाही, पर्मनंट नाही...आणि प्रत्येक गोष्टीला अंत हा आहेच" - असं सांगणारी वरकरणी फारच सोप्पी वाटणारी पण खरं तर खूप खोल कल्पना आहे ही! प्रत्येक क्षण हा नवाच असतो..आणि नवंच काहीतरी घेऊन समोर येत असतो. एका क्षणापूर्वीचे आपण त्या क्षणानंतर बदललेलो असतो. आपणच नाही तर आपल्या भवतालातली प्रत्येकच गोष्ट! आपल्या शरीरातल्या पेशी मरत असतात आणि नव्या जन्म घेत असतात..

उत्पत्ती, स्थिती आणि लय हे इतक्या  वेगळ्या प्रकारे आणि कमीत कमी शब्दांत सांगतं हे बौद्ध impermanenceचं तत्त्वज्ञान! ...की जगात सतत समोर येणाऱ्या मोठ्या भव्य बदलांमागे छोटे छोटे, चिंटू, सूक्ष्म बदल सतत घडत असतात जे आपल्याला जाणवत नाहीत पण खरी मजा त्यांतच तर आहे! अगदीच सोप्पं उदाहरण म्हणजे एका मायक्रोस्कोपिक सेलपास्नं आपला शरीर बनणं..आपला जन्म..आपली वाढ.. पाहता पाहता दोन पायांवर उभं राहून आपण चालायला लागणं..आणि मग शरीराची उंची ताकद वाढणं.(आणि त्याचबरोबर अक्कलही! आणि मग त्या अक्कलेचे तारे वगैरे :-) ) ..मग मेंदूत स्फुरणारे विचार... भाव भावना...आणि मग नऊ रस..षड्रिपु आणि काय काय..मग प्रेमबिम..आणि ओघानेच प्रेमभंग.. आणि सगळ्या लोच्या...😉..तर थोडक्यात काय तर हे सगळं impermanenceच्या चष्म्यातनं पाहिलं की मग त्रास कमी होतो... 

मला भल्याबुऱ्या (बुऱ्याच जास्त!) अनुभवांती आलेलं शहाणपण म्हणजे "क्षण जगून आपण पुढे जायला हवं, त्यात अडकून पडलो की गोची!" :-) आणि impermanence अगदी त्याच्यामागची फिलॉसॉफीच तर उलगडतं की!!..काहीही चिरंतन नाही ..थोडक्यात एखादी प्रिय गोष्ट/ व्यक्ती आपल्याकडे असताना आपण अगदी "sitting on top of the rainbow फिलिंग" मेहसूस करत असतो आणि ती गोष्ट किंवा प्रिय व्यक्ती दुरावल्यावर फारच दु:खी होतो...सुतकी चेहरा वगैरे... पण impermanence तत्त्वज्ञान कळायला लागलं की त्या तसल्या दु:खातून बाहेर येणं सोप्पं होतं! (अनुभवाचे बोल!)😝🤣

"कल क्या होगा किसको पता, अभी जिंदगी का ले लो मजा"..असं काही मी म्हणतो तेव्हा मला "प्रसन्न..तू नं इम-मच्युअर आहेस"- वगैरे ऐकवलं जातं! पण सगळ्याच गोष्टी जर क्षणभंगुर आहेत तर आपण जगण्यासारखं जवळ असतानाच ते पुरेपूर जगून घ्यायला हवं नाही का?..अगदी द ग्रेट सॉमरसेट मॉमनेसुद्धा असं वेळच्यावेळी क्षण "न जगणाऱ्यांना" वेड्यातच काढलंय की - "Nothing in the world is parmanent, and we are foolish when we ask anyhting to last, but surely we are still more foolish not to take delight in it while we have it!" .. 

थोडक्यात काय तर लाईफ सालं जर क्षणभंगुरच आहे तर - शक्य तितकं एन्जॉय करणे!! जसं जमेल तसं, जेंव्हा जमेल तेँव्हा, जितकं जमेल तितकं!! नैत्तर  imparmanence बौद्ध तत्त्वज्ञान कळलंच नाही असं व्हायला नको! नै का?🤣

No comments:

Post a Comment