रोमन हाॕलीडे
--------
कधी कधी काही चुटपुटत्या भेटीसुद्धा मनात विलक्षण घर करुन जातात...अवघ्या काही तासांचा सहवाससुद्धा एक विलक्षण ओढ निर्माण करुन जातो...सहवासातनं ओळख...ओळखीतनं दोस्ती...आणि त्यातनंच एका अनोख्या असोशीची चाहूल?...पण ती असोशी कायमस्वरूपी नात्यात बदलेपर्यंत जुदाईचा क्षण येतो आणि ते बघणारा प्रेक्षकही हळहळतो... दिग्दर्शक विली वायलरची ‘रोमन हॉलिडे’ ही अशीच चुटपुट लावणारी प्रेमकथा... ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबर्नच्या हळुवार फुलणा-या प्रेमाच्या प्रेमात पाडणारी कथा.... ‘लिव्ह्ड, लव्ह्ड अँड फिल्म्ड इन रोम’ असं ज्या सिनेमाचं नेमकं वर्णन केलं गेलंय तो सिनेमा म्हणाजे "रोमन हॉलिडे"!
...........
आधी ही कथा दिग्दर्शक फ्रँक काप्राकडे आली होती आणि कॅरी ग्रँट आणि लीझ टेलरला घेऊन तो ह्यावर सिनेमा बनवणार होता. पण काही घडामोडी घडून विली वायलरकडे ही कथा आली आणि त्यानं ग्रेगरी पेकला घेऊन त्याच्याबरोबर अत्यंत लोभस, गोड दिसणाऱ्या नाजूक ऑड्री हेपबर्नला प्रिन्सेस अॕनाची भूमिका दिली.आणि जे काही रसायन तयार झालं ते ऐतिहासिकच! सात ऑस्कर नाॕमिनेशन्स मिळून प्रत्यक्षात तीन ऑस्कर्स मिळाली, ज्यात अर्थातच ऑड्री हेपबर्नचं अभिनयाचं ऑस्कर होतं!
असं ऐकलंय की सिनेमा रिलीज होण्याआधी, खूप मोठा स्टार असणारा नायक ग्रेगरी पेक हा आॕड्रीचं काम बघून भलताच प्रभावित झाला होता आणि त्यानेच मग सिनेमाच्या टायटल्समधे "इंट्रोड्यूसिंग ऑड्री हेपबर्न" अशी छोट्या फाँन्टमधे तिची बोळवण न करता आपल्याबरोबरीने तिचं नाव ठळक अक्षरात पोस्टरवर असावं असा आग्रह धरला. त्याच्या मते ऑड्रीने अफलातून काम केलंय आणि तिला ऑस्करही मिळू शकतं...आणि खरोखरीच तसं घडलंही नंतर!
ह्यातली एक गंमत म्हणजे ज्या स्कूटरवरून दोघं रोम शहर फिरतात ती पिआज्जो कंपनीची व्हेस्पा स्कूटरसुद्धा (‘०’ सिरीज, शॅस्सी नंबर १००३) लोकांना प्रचंड आवडली आणि त्या प्रकारच्या स्कूटर्सचा सेल रातोरात वाढला होता. विशेष म्हणजे या सिनेमात वापरल्या गेलेल्या त्या स्कूटरचा चार वर्षांपूर्वी लिलाव होऊन ती चक्क दोन लाख युरोंना (दीड कोटी रुपये) विकली गेली होती.
सिनेमा सुरू झाल्यावर आपल्याला कळतं की युरोपमधल्या कुठल्याश्या देशाची राजकन्या अॕना (ऑड्री हेपबर्न) ही युरोपमधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांना म्हंजे लंडन, अॕमस्टरडॅम, पॅरिस वगैरे शहरांना सदिच्छा भेटी देत देत आता रोममध्ये पोहोचल्ये आणि तिचं शाही स्वागत होतंय.. तिच्या स्वागताप्रित्यर्थ त्यांच्या देशाच्या राजदूताने एक जंगी पार्टी ठेवल्येय. शिष्टाचारानुसार एकेका प्रतिष्ठित पाहुण्याची ओळख करून दिली जात्येय मात्र तिला ते शिष्टाचाराचं कृत्रिम स्मित करताना एकीकडे पायातला बूट चावायला लागलाय. एकीकडे लोकांचं अभिवादन स्विकारत असताना घोळदार झग्याआत, कुणाचं लक्ष जाणार नाही अशा बेतानं ती हळूच बुटातून उजवा पाय बाहेर काढून मोकळा करुन डाव्या पायाला खाजवून घेते. पण तेवढ्यात बूट सटकून तिच्या घोळदार झग्याबाहेर...मग तो उलटसुलट करत सावरताना तिची पंचाईत...हे पहिलंच दृश्य तिच्यात लपलेली अल्लड, मासूम मुग्गी दाखवणारं!
एकूण तो सगळा शिष्टाचार, पाहुणचार, भेटीगाठी, कृत्रिम वागणं आणि अत्यंत व्यग्र शेड्युलच्या भडिमाराने ती प्रचंड वैतागल्येय, चिडचिडी झाल्येय..तिला तपासायला आलेला डॉक्टर तिला झोपेचं इंजेक्शन देऊन, त्याचा सावकाश परिणाम होईल सांगून जातो. तिला बरं वाटावं म्हणून तिला हवं ते तिनं करावं असंही सांगतो. ती समाधानाने हसते.
सगळी मंडळी गेल्यावर ती पटापट ड्रेस चढवते आणि चक्क त्या पॅलेसमधून बाल्कनीतून उडी मारून सटकते. सामान नेण्यासाठी आलेल्या एका टेम्पोमध्ये जाऊन लपते. टेम्पो पॅलेसच्या गेटच्या बाहेर येतो...ती हळूच सामानामागून डोकं बाहेर काढून बघते...रोमच्या रस्त्यावरची रात्रीची दुनिया..तिला खूपच छान वाटतंय...एका ठिकाणी ती उतरते...पण आता त्या झोपेच्या इंजेक्शनचा अंमल चढायला लागलाय...जांभया देत ती रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरच्या एका बाकावर झोपते. झोपेतच काही बडबडत वळताना ती बाकावरून पडणार तेवढ्यात तिथूनच घरी निघालेला ज्यो ब्रॅडली (ग्रेगरी पेक) हा पत्रकार तिला सावरतो. तिचं तोल जाणं आणि बडबड ऐकून त्याला ती दारूच्या नशेत आहे असंच वाटतं... "झेपत नसेल तर एवढी पिऊ नये माणसानं" असं तो तिला सुनावतोसुद्धा!...तिला घरी जाण्यासाठी टॅक्सी थांबवतो..ती प्रचंड झोपेत आहे...तिचं कलोसियम..कलोसियम ऐकून त्याला पत्ता कळणं शक्यच नाही...आणि सुनसान रात्री तिला एकटं सोडणं त्जंटलमन ज्यो लाशक्य नाही...निरुपायाने तो तिला आपल्या भाड्याच्या रुमवर घेऊन जातो. (तिकडे पॅलेसमध्ये ती नसल्याचं लक्षात येऊन सर्वांचं धाबं दणाणलंय. शोधाशोध सुरू आहे. ती हरवल्याचं कोणालाही कळता कामा नये असं सांगून राजदूत ती अचानकच आजारी पडल्ये असं जाहीर करत पुढच्या सर्व अपॉइंटमेंट्स कॅन्सल करवतो).
दुसरा दिवस उजाडलाय. दुपार होत आल्येय.. तिच्यापायी झोपायला उशीर झालेला ज्यो कसाबसा ऑफिसला जातो...खरं तर त्याने आज रोमभेटीवर आलेल्या प्रिन्सेसची भेट घेणं अपेक्षित आहे.. म्हणून ऑफिसला गेल्या गेल्या तो संपादकाला इंटरव्ह्यू संपवूनच आल्याचंच ठोकून देतो....पण पेपरातली तिच्या आजारपणाची न्यूज कळलेला चलाख संपादक त्याला घोळात घेत बरेच प्रश्न विचारतो आणि शेवटी प्रिन्सेस अचानक आजारी पडल्याने तिच्या सर्वच अपॉइंटमेंट्स कॅन्सल झाल्याची पेपरातली ठळक बातमी दाखवून त्याला खोटं बोलल्याबद्दल फैलावर घेतो!
पेपरमधल्या तिच्या फोटोवर नजर गेल्यावर मात्र आपल्या घरी आपण जिला रात्री आसरा दिलाय ती हीच प्रिन्सेस हे लक्षात येऊन ज्यो क्षणभर दचकतो; पण त्याला लगेच पुढची सनसनाटी न्यूज दिसायला लागते. तो लगेच संपादकाला पटवून तिचा ‘न भूतो’ एक्स्क्लुझिव्ह इंटरव्ह्यू मिळवून दाखवण्याचं प्रॉमिस देतो आणि बदल्यात घसघशीत पाच हजार डॉलर्सचं इनाम कबूल करवून घेतो. घरमालकाला फोन करवून आपल्या रुममधल्या पाहुणीवर लक्ष ठेवायला सांगतो...
आॕफिसमधनं घाईघाईतच घरी येऊन अजूनही झोपेतच असलेल्या तिच्या तोंडून तीच प्रिन्सेस असल्याची खात्री करून घेतो. त्याच्यातला जंटलमन जागा होऊन मग आदल्या रात्री कसंतरी लाकडी कॉटवर झोपवलेल्या तिला उचलून तो मऊ बेडवर अलगद उचलून ठेवतो...थोड्या वेळाने उठल्यावर तिला स्त्रीसुलभ जाणीव होते, की तिने एका सर्वस्वी अनोळखी माणसाच्या रूमवर रात्र काढली आहे... त्याचाच सदरा पायजमा घालून...
मग ती स्वतःला सावरते आणि आपण प्रिन्सेस आहोत हे लपवत आपली ओळख ‘आन्या’ अशी करून देते... ती तयार होईपर्यंत ज्यो त्यांच्या फोटोग्राफर मित्राला अर्विंगला (एडी अल्बर्ट) फोन करून एक जबरदस्त स्कूप मिळतोय लवकर भेट म्हणून सांगतो...इकडे प्रिन्सेस आंघोळ करून तिचे कपडे घालून ज्यो चा निरोप घेते..."महत्त्वाच्या कामासाठी" अर्जंट जायला लागणार असल्याचं सांगून परत करण्याच्या बोलीवर त्याच्याकडनं थोडे पैसे उधार घेऊन निघते....ज्यो तिच्या नकळत तिचा पाठलाग सुरू करतो. ..त्याची सनसनाटी न्यूज डोळ्यांदेखत निघून चाललेली तो कसाहातची गमावणार?..पण त्याचबरोबर तिने सुरक्षित असावं हेही कुठेतरी त्याच्या मनात...
प्रिन्सेस अॕना आयुष्यात प्रथमच इतकं स्वातंत्र्य महसूस करत्येय...आज बाॕडीगार्ड्स बरोबर नाहीत...ओळखणारं कुणी नाही...बोअरिंग राजशिष्टाचार नाहीत...तिची ती!!... मोकळी... स्वच्छंद!!...ती फूटपाथवरनं सँडल्स विकत घेते...मग लहर आल्यावर एका सलूनमध्ये घुसून आपले लांब केस कापून चक्क बॉयकट करून घेते....तिला आता आणखीच मोकळंढाकळं वाटतंय....मुक्त फिरतेय ती रोममध्ये... ज्यो अर्थातच तिच्या मागे... ती एका ठिकाणी बसून आइस्क्रीम एन्जॉय करताना.. तो समोर जाऊन अचानकच भेटल्याचं नाटक करतो...तिच्या ‘महत्त्वाच्या कामाची’ चौकशी करतो... मग ती त्याला, ‘काम वगैरे काही नव्हतं. मी खोटं बोलले. खरं तर मी शाळेच्या होस्टेलमधून पळून आले आहे रात्री’ वगैरे थाप ठोकते...तिला मजा करायचीय... गल्लीबोळात मुक्त फिरायचंय... रोडसाइड कॅफेत बसून कॉफी प्यायच्येय...विंडोशॉपिंग करायचंय...ज्योला मजा वाटते ते ऐकताना.. तिनं पुन्हा निघायचं म्हटल्यावर तो एकत्र एक दिवस तिला हवं तसं मजा करायला तिच्याबरोबर येण्याची तयारी दाखवतो आणी तिथून सुरू होते दोघांची मस्त सफर..... रोममध्ये धमाल एकत्र फिरणं.... त्यांना अर्विनही येऊन भेटतो... तो तिच्या नकळतच तिचे फोटो काढणं सुरू करतो...
प्रिन्सेसचं ज्योबरोबर व्हेस्पा स्कूटरवरून रोममध्ये मुक्त फिरणं सुरू होतं...दरम्यान एका ठिकाणी ज्यो कुणाशी उतरुन बोलत असताना राजघराण्याच्या ऐश्वर्यात मोठमोठ्या गाड्यांतनं फिरणा-या तिला त्या साध्याश्या स्कूटरचं अगदी लहान मुलागत आकर्षण वाटून ती स्कूटर सुरु करते...मग मात्र तिची तारांबळ...ज्यो कसाबसा धावत येऊन तिच्या मागे बसतो...पण तिला स्कूटर चालवण्यातला आनंद घेऊ देतो..भले ती गर्दीत घुसते...लोकांना धडका देते..हातगाड्यांना ठोकते..
ज्यो तिला "माउथ ऑफ ट्रुथ" बघायला नेतो... अशी वदंता असते, की त्याच्या उघड्या तोंडातून आत हात घालायचा आणि जर का तुम्ही "खोटारड्या वृत्तीचे असाल...खोटं बोलला असाल... बोलणारे असाल तर तुमचा हात मनगटापासून कापला जातो"...अॕनाला ते ऐकून दचकते...आपण तर खोटं बोललोय ज्यो शी...ती त्यालाच आधी ट्राय करायला सांगते...ज्यो हात त्या उघड्या तोंडात घालतो आणि हात तुटल्याची अॕक्टिंग करतो... ती घाबरते... पण मग त्याने कोटाच्या बाहीतून हात सुखरूप दाखवल्यावर त्याला लटकेच मारत त्याच्या मिठीत शिरते... त्यांच्यात एक मोकळेपणा आलाय एव्हाना...
दिवसभर फिरत दोघं एका डान्सपार्टीत जातात... दरम्यान तिच्या शोधासाठी तिच्या देशातनं खास रोममधे आलेले गुप्तहेर तिला ओळखतात..तिला ते पकडून नेणार तेव्हा ती ज्योला मदतीसाठी हाका मारते...धमाल हाणामारी आणि त्या गडबडीत दोघं नदीत उडी मारून सटकतात....
भिजून तिला हुडहुडी भरली आहे...बोलता बोलता दोघं जवळ येतात....एक गोड किस...दोघं ज्योच्या अपार्टमेंटवर येतात...तिला त्याच्या सहवासात आता खूपच सुरक्षित वाटतंय...त्याच्याबद्दल एक अनाहूत ओढ तिलाही...दिवसभरातल्या सर्वच घटनांनी, त्या एकत्र घालवलेल्या सा-या सुंदर क्षणांनी दोघांच्यात अनोखा अनुबंध तयार झालाय. ती त्याच्या बाहुपाशात येते...
त्याच्या रूममधल्या रेडिओवरच्या न्यूज बुलेटिनमध्ये तिच्या देशाची जनता तिच्या अचानक गायब होण्याने प्रचंड काळजीत पडल्याचं आणि तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं तिला समजतं. तिला जाणीव होते आता मात्र तिला निघायला हवं...
.
तिला खरं तर त्याला सोडवत नाहीये....कुठेतरी ती अडकते त्याच्या सहवासात...काय आहे ते?.... प्रेम?... सहवासाने निर्माण झालेली असोशी?... पण तिला कर्तव्य विसरून चालणार नाही.. तिच्या देशाच्या जनतेसाठी एका युवराज्ञीने परत जाणं भाग आहे....ती रडवेली होत त्याच्या मिठीत... त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळलंय...तो तिला कारमधून पॅलेसपर्यंत सोडायला जातो.. गेटजवळ कार थांबवतो...आता तो निर्णायक जुदाईचा क्षण....
अॕन – I have to leave you now. I'm going to that corner there and turn. You must stay in the car and drive away. Promise not to watch me go beyond the corner. Just drive away and leave me as I leave you.
ज्यो - All right.
अॕन - I don't know how to say goodbye. I can't think of any words.
ज्यो - Don't try.
ती न राहवून मोठ्या आवेगाने पुन्हा त्याच्या मिठीत शिरते....पुन्हा एक दीर्घ चुंबन.. तो क्षण संपूच नये असं वाटणारी त्यांची असोशी...ती उतरते.. तो एकटक बघत राहतो.. ती जाते..
महालात परतल्यावर तिला विचारणा होते ती कुठे होती? का गेली होती? काय सांगायचं लोकांना? त्यावर तिचं सडेतोड उत्तर, "मला माझ्या घराण्याची आणि जनतेप्रति कर्तव्याची जाण नसती तर मी परत आलेच नसते!"...
दुसऱ्या दिवस उजाडतो. आज ती पत्रकारांना मुलाखत देणार आहे. एका भव्य राजेशाही दालनात छोट्या स्टेजसमोर पत्रकार जमलेत... ज्यो आणि अर्विनही हजर आहेत...त्या वेळच्या त्यांच्या बोलण्यातून तिचं गुपित हे गुपितच राहील याची तिला त्यांनी दिलेली सूचक ग्वाही...त्या प्रेस कॉन्फरन्सदरम्यान तिची ज्यो शी दृष्टादृष्ट होताना वारंवार त्याच्या नजरेत अडकणारी तिची नजर... खूप काही सांगून जाणारी ...कॉन्फरन्स संपते.... सर्व पत्रकार निघतात....ज्यो तिथेच उभा...त्याचं विमनस्क असणं अगदीच आपल्याला समजून येणारं...ती वळून निघते...तो विमनस्क...उभा...तिच्या जाण्याकडे बघत ...मनात काहूर...तिला जाणं भाग होतं, ती गेली..
ज्यो काही सेकंद तिथेच खिळून उभा...आणि अत्यंत जड अंतःकरणानं तो वळतो...अडकलेलं मन सावरत संथ पावलं टाकत निघतो...टाॕक्..टाॕक्...टाॕक्...त्याच्या बुटांचा आवाज... कॕमेरा पॕन होत हाॕलची भव्यता...ज्यो कॕमे-याकडे चालत हा़ॕलच्या दारापर्यंत येतो...पुन्हा वळतो...एकवार मागे वळून बघतो...शेवटचं..
एकच क्षण ..आणि निघतो..
दि एंन्ड!...
(आणि सिनेमा बघणा-या आपल्या डोळ्याच्या कडांनी अश्रु ओघळून गालांवर...)
म्हटलं तर ही एक प्रेमकथा पण अधुरी...एक रात्र आणि एक दिवसाच्या सहवासात झालेली दोस्ती आणि त्यातून उमललेलं खूप तरल, हळुवार प्रेम....ऑड्री हेपबर्नचा कमालीचा अभिनय आणि ग्रेगरी पेकची संयत साथ. रोममधलं त्यांचं एकमेकांच्या सहवासात मुक्त फिरणं.... मैत्री... जवळीक.... आणि सूचक प्रेम...
हा सिनेमा बघितला नसेल तर जरूर बघा. आणि बघितला असला तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघतच असणार ही खात्री!
No comments:
Post a Comment