Thursday, 17 June 2021

अ फेअरवेल टू आर्म्स

"अ फेअरवेल टू आर्म्स"
---------------
आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की दुस-या महायुद्धात (1939~1945) 'जर्मनीच्या बाजूने' लढणारा इटली हा देश, पहिल्या महायुद्धात (1914~1918) मात्र 'जर्मनी, आॕस्ट्रिया,बल्गेरिया, आॕट्टोमान' यांच्या विरुद्ध 'ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेच्या बाजूने' लढला होता!

अर्नेस्ट हेमिंग्वेची त्याच्या स्वतःच्या पहिल्या महायुद्धातल्या अनुभवांवरची, 1929 सालची "अ फेअरवेल टू आर्म्स" ही कादंबरी प्रचंड गाजली आणि लोकप्रिय झाली. त्यातल्या कथानायकाचे अनुभव त्याने स्वतः घेतलेले होते..(जायबंदी होऊन मिलानच्या हाॕस्पिटलमधे असताना आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठ्या नर्सच्या प्रेमात पडण्याचाही!)

या कादंबरीवर गॕरी कूपर आणि हेलेन हेस जोडीला घेऊन (आपल्याकडच्या अमिताभ- जया सारखी दिसते ही लंबू आणि ठेंगूची जोडी! गंमत म्हणजे कादंबरीतल्या कॕथरिनचं वर्णन मात्र "Tall" असं आहे! ;-) )

 फ्रँक बोर्झाजे नं हा सिनेमा बनवला 1932 साली!.. आणि त्याकाळाच्या उपलब्ध टेक्निक्सच्या मानाने, त्याने अफाटच बनवलाय! गंमत म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे आपल्या कादंबरीवर निघालेल्या या  'सिनेमा'वर समाधानी नसला तरी, हिरो 'गॕरी कूपर'वर मात्र भलताच खूष झाला होता आणि पुढे त्यांची मस्त दोस्ती जमली होती! (गॕरी कूपरला बघताना - विशेषतः त्याच्या कपाळावरुन सुरु होत मागे जाणारा टोकेरी त्रिकोणी भांग बघताना- आपला मोतीलाल आठवतो!).

बाकी, यातल्या लेफ्टनंट फ्रेडरिक हेन्री, या इटलीमधे युद्धकाळात अँम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काम करायला आलेल्या अमेरिकन आर्किटेक्टच्या भूमिकेत गॕरी कूपर दिसलाय रुबाबदार!...आणि तिथल्या ब्रिटीश नर्स कॕथरिन बार्कलेच्या भूमिकेत हेलेन हेसनेही मस्त काम केलंय! 

इटलीमधे ड्युटी करायला आलेल्या लेफ्टनंट फ्रेडरिकची दोस्ती होते मेजर रिनाल्डीशी (अॕडाॕल्फ मेन्यू)...एका प्रसंगात बाँम्बवर्षावातून वाचण्यासाठी काळोख्या जिन्याखालती आधारासाठी गेलेल्या कॕथरिनची फ्रेडरिकशी गाठ पडते त्यावेळी तो दारुच्या नशेत तिला आधी भेटलेली भलतीच कुणी समजतो...पुढे मेजर रिनाल्डीबरोबर रात्री एका पार्टीत ती दोघं पुन्हा समोर येतात. खरं तर नर्स कॕथरिन खरी रिनाल्डीचीच मैत्रिण आसते...पण रिनाल्डीने फ्रेडरिकची तिच्याशी ओळख करुन दिल्यावर, तिच्याकडे पाहताक्षणीच त्याला ती आधी भेटल्याचं आठवतं...आणि ती आवडतेही!.. पार्टी सोडून तो तिच्याबरोबर बाहेर अंधारात गार्डनमधे बसतो..तिथे आलेला रिनाल्डी त्या दोघांना जवळ बसलेलं पाहून चरफडत निघून जातो. फ्रेडरिकला त्याचा जळफळाट कळतो. तो तसं बोलून दाखवतो-

"पाहिलंस? वैतागला कसा ते..?" तो उद्गारतो. 
"का पण?" ती.
"मी इथे आहे नं आत्ता तुझ्याबरोबर?! जनरली बायका त्याच्याकडे आकर्षित होत असाव्यात" तो मिश्कीलपणे म्हणतो."आपण एक चक्कर मारु या इथे बागेत?"
"हो.."
दोघं त्या अंधारात..बागेत..दोघं अगदीच जवळ बसल्येत. तो तिच्याकडे एकटक पाहतोय...

"कसला विचार करतोयस?"
"व्हिस्की.."
"व्हिस्कीचं काय?"
"छान असते व्हिस्की....तू पण खूप छान आहेस!"

...इतकं बोलून फ्रेडरिक तिचं चुंबन घ्यायला गेल्यावर आधी ते धुत्कारत, ती त्याला थोबाडीत ठेवून देते..पण मग तिलाच वाईट वाटतं..हा उमदा देखणा तरुण वाईट नाही असं तिचा मन कौल देतं आणि ती त्याचं एक अनाकलनीय आकर्षण वाटून त्याच्या बाहुपाशात शिरत आपणहून त्याला चुंबनासाठी उद्युक्त करतेही! ..आणि तो तिला चक्क पटवतो. अक्षरशः!..(फिल्मचं फार फुटेज न खाता त्यांचं पटापट एकमेकांवर प्रेम जडतं आणि फुलतंही!)

त्या दोघांचं एकमेकांत गुंतणं मेजर रिनाल्डीला आवडत नाही आणि जळफळाट होऊन तो हेलेनची बदली मिलानला करवतो. पण युद्धभूमीकडे अँम्ब्युलन्स घेऊन गेलेला फ्रेडरिक शत्रुच्या तोफांच्या बाँम्बहल्ल्यात जखमी होऊन योगायोगाने हेलेनच्याच हाॕस्पिटलमधे दाखल होतो..मग काय?..तिथे त्यांचं प्रेम चांगलंच बहरतं! तिथलाच एक अधिकारी त्याचं त्या नर्सिंग रुममधेच काही मंत्र पुटपुटत लग्न लावून देतो...फ्रेडरिक खडखडीत बरा होतो आणि त्यांच्या सहवासातून  कॕथरिन प्रेग्नंट राहते...दरम्यान खडखडीत बरा झालेल्या फ्रेडरिकला पुन्हा फ्रंटवर पाठवलं जातं..

कॕथरिन बाळाच्या डिलिव्हरीसाठी स्वित्झर्लंडला जाते आणि तिथनं फ्रेडरिकला पत्रं पाठवत राहते..पण कुटील आणि मत्सरी मेजर रिनाल्डी, ती पत्रं फ्रेडरिकपर्यंत पोहोचूच देत नाही..फ्रेडरिकची पत्रंही कॕथरिनला मिळत नाहीत...तिच्या आठवणीने बेचैन झालेला फ्रेडरिक तिथनं धोका पत्करुन चक्क पळ काढून तिला भेटायला निघतो...

इकडे ब-याच महिन्यांनंतर कॕथरिनला एक दिवस पोस्टातनं तिने आजवर लिहिलेल्या सर्व 20-22 पत्रांचा "परत आलेला गठ्ठा" हातात पडतो आणि ती दुःखावेगानं उन्मळून पडते, त्यात प्रेग्नंसीमुळे तिची प्रकृती कमालीची बिघडते आणि हाॕस्पिटलमधे आॕपरेशनला नेलं असताना तिचं पोटातलं बाळ पोटातच दगावतं..ती स्वतःसुद्धा  मरणाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपते...

इकडे युद्धभूमीवरुन सटकलेला फ्रेडरिक,  कॕथरिनचा शोध घेत आधी मिलान आणि तिथनं स्वित्झर्लंडला पोहोचतो...त्याचा शोध तिच्यापर्यंत येतो तेव्हा ती त्याच्याच वाटेकडे डोळे लावत शेवटचे काही तास मोजत असते..

त्याच्याच बाहुपाशात ती शेवटी प्राण सोडते तेव्हाच 'युद्धविरामा'ची बातमी येते!

"A farewell to arms" - हे शीर्षक तश्या दोन्ही अर्थांनी समर्पकच!..आर्म्स म्हणजे शस्त्रही आणि प्रियकराचे बाहूसुद्धा!!..दोन्हींसाठी हा farewell !

यातल्या दोघांच्या जवळीकीच्या सीन्समधले डायलाॕग्ज आपल्याला भिडतात.

त्याच्या मिठीत शेवटचे श्वास घेताना -

तो- आपण कधीच दूर नव्हतो एकमेकांपासून. भेटल्यापासून कधीच नव्हतो दूर...
ती- भेटल्यापासून कधीच नव्हतो..
तो- आणि नसूही कधीच..एकमेकांपासून दूर..
ती- नसूही दूर..
तो- जगताना आणि मरतानासुद्धा. हो नं माऊ?
ती- (त्याला घट्ट बिलगत-) जगताना आणि मरतानासुद्धा! आपण कधीच नसू दूर एकमेकांपासनं...
तो- (तिला छातीशी घट्ट धरत) तुझा विश्वास आहे नं? सांग माऊ?..
ती- (त्याच्या आश्वस्त मिठीत-) हो..पूर्ण विश्वास आहे. मी नाही घाबरत...

पण असं म्हणातानाच ती निचेष्ट. त्याच्या मिठीतच प्राण सोडते...हा "फेअरवेल" चटका लावणारा...

आवडेल हा सिनेमा तुम्हालाही. त्या हाॕलीवुडच्या गोल्डन ईरामधले सिनेरसिक आहेत त्यांनी पाहिलाच असेल म्हणा!!

No comments:

Post a Comment