"शेक्सपियरवाला"
---------------------
तुम्ही माझ्यासारखेच शशीचे वेडे फॅन्स असाल तर हा सिनेमा तुम्ही पुनःपुन्हा पाहिला असेलच! तसं तर शशीने ११ ब्रिटीश-अमेरिकन सिनेमांत कामं केल्येत, त्यांपैकी १९६३च्या 'हाऊसहोल्डर' नंतरचा हा त्याचा दुसरा इंग्लिश सिनेमा! हा सिनेमा बघून त्याच्या सासऱ्याने (प्रख्यात ब्रिटिश रंगमंच कलाकार जॉफ्रे केंडाल) म्हटलं होतं की शशीने हिंदी फिल्म इंडस्ट्री सोडून आता हॉलीवूडमध्येच लक्ष केंद्रित करावं म्हणून!! कारण शशीच्या लोभस चिकण्या रुपड्यामुळे आणि सफाईदार इंग्लिशमुळे त्याला हॉलिवूडमध्ये उत्तमोत्तम रोल्स नक्कीच मिळाले असते! या सिनेमातल्या राजबिंड्या शशीने साकारलेला बेफिकीर आणि गुलछबू संजू मस्तच आणि आपल्या हृदयात घुसणारा!
---------------------------------------------------
शशीने सिनेमात शिरण्याआधी बालपणापासूनच अनेक वर्षं पापाजींच्या पृथ्वी थिएटर्समधून हिंदी नाटकांत कामं केली आणि पुढे टीनएजर असताना जॉफ्रे केंडलच्या 'शेक्स्पीयराना' ग्रुपबरोबर भारतभर दौरे करत शेक्सपियरच्या अनेक गाजलेल्या नाटकांमधनं त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या वीस वर्षांत म्हणजे १९४० आणि ५० च्या दशकांत, पृथ्वीराजजींच्या "पृथ्वी थिएटर्स"चे हिंदी नाटकांचे आणि जॉफ्रे केंडलच्या "शेक्स्पीयराना" ग्रुपच्या इंग्लिश नाटकांचे भारतभर दौरे सुरु असत. "शेक्सपियरवाला" हा सिनेमा अशाच इंग्लिश नाटकांचे भारतभर दौरे करणाऱ्या एक ग्रुपची कथा मांडतो!
सिनेमाचा काळ हा भारत स्वतंत्र होऊन जेमतेम काही वर्षं झाल्यावेळचा. अजूनही भारतात काही ठिकाणी ब्रिटिश राहतायत, काही ठिकाणी संस्थानं आहेत आणि काही ठिकाणी इंग्लिश नाटकांचे दौरे होतायत. कधी बंदिस्त थिएटरमध्ये, कधी छोट्या हॉलमध्ये, कधी ओपन एअर मोकळ्या जागेत तर कधी चक्क एखाद्या संस्थानिकांच्या भव्य दिवाणखान्यात! शेक्सपियरची नाटकं करणारा ग्रुप आहे टोनी (जॉफ्रे कॅंडल) आणि कार्ला (लॉरा लीडेल) या बकिंगम दाम्पत्याचा! त्यांची टप्पोऱ्या डोळ्यांची आणि गुब्ब्यागुब्ब्या गालांची मुलगी लीझ्झी (फेलिसिटी केंडल) त्यांच्या नाटकात हिरोईनचे रोल्स निभावणारी! हि भारतातच जन्मल्ये! त्यांच्या नाट्यमंडळींत काही भारतीय कलाकारही काम करतात. बहुतांशी रेल्वेने किंवा मोटारीतून प्रवास करत भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन ते शेक्सपियरची नाटकं आपल्या परीने जिवंत ठेवण्याचा यत्न करताना दिसतात. पण भारत स्वतंत्र होऊन भारतात आता मनोरंजनाची स्वतःची साधनं आहेत, सिनेमेही बनायला लागलेत. साहजिकच बकिंगमच्या इंग्लिश नाटकांचा रंगमंचीय आविष्कार बघणारे दर्दी प्रेक्षक दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेत. तरीही टोनी बकिंगम नेटाने त्याची नाट्यसेवा करायला धडपडतोच आहे...
एक मार्मिक दृश्य - त्यांच्या ट्रुपची मोटार बिघडल्यामुळे त्यांचा ट्रूप राजस्थानच्या वाटेवर कुठेतरी रस्त्याच्या कडेला थांबलाय. त्या रणरणत्या उन्हात एक माकडवाला चाललाय. ट्रुपमधले भारतीय कलाकार त्यांच्याशी हिंदीत संवाद साधत त्याची विचारपूस करतात. तो सांगतो की तो अजमेरला निघालाय कारण आता त्याच्या माकडाच्या खेळावर त्याची गुजराण होत नाहीये - "He is not doing too well, people don't care for his art anymore' - ते ऐकून त्या नाटकाच्या ट्रुपमधला एक बुजुर्ग इंग्लिशमन पट्कन उद्गारतो,"Our story exactly!" .... माकडवल्याचं माकड त्याची आज्ञा न जुमानता त्याने हातात दिलेल्या झांजा पुनःपुन्हा फेकत राहतं आणि तो माकडाला खेळ दाखवण्यासाठी ओरडत राहतो ..त्या बॅकग्रांउडवर - मरणकळेला लागलेल्या फिरत्या इंग्लिश थिएटरच्या अवस्थेवरचं ते भाष्य कुठेतरी स्पर्शून जातं!...
बिघडलेली मोटार दुरुस्त होण्याची चिह्नं नाहीत अशात रात्रीच्या अंधारात एक जीप थांबते आणि त्यातून तरणाबांड, देखणा संजू (शशी) उतरतो. टोनी बकिंगम आपल्या ट्रूपची ओळख करून देतो. संजूचं लक्ष लीझ्झीकडे जातं. ती त्या देखण्या भारतीय तरुणाकडे पाहून प्रसन्न हसते. संजुची नजर एक क्षण तिच्या नजरेत अडकते...तो क्षण..त्यांचं एकमेकांकडे पाहणं... प्रसन्न स्मित...पुढची चाहूल देणारं?..त्या रात्री सर्वजण संजूच्या काकाच्या बंगल्यावर मुक्कामाला येतात. बंगल्याबाहेरच्या प्रशस्त लॉनवर राहुट्या उभारून सर्वांची झोपायची व्यवस्था होते.
सकाळी सर्वजण उठून आपापल्या राहुटीबाहेर येऊन तयारी करतायत तेव्हढ्यात संजू लीझ्झीच्या तंबूपाशी पोहोचलाय. संजू शिकारीनिमित्त त्या ठिकाणी राहायला आलाय. आपल्या वाघाच्या, रानडुकरांचा शिकारीच्या थरारक गोष्टी सांगून तो लीझ्झीवर चांगलंच इम्प्रेशन पाडतो. अगदी पक्ष्यांचे, माकडांचे आवाज काढून वातावरण निर्मिती करत! लीझ्झीला आवडलाय हा देखणा तरुण..त्याचं बोलणं..आणि मग पुढचा दिवस त्यांच्या भेटी ..सहवास... ती त्याला नाटकाच्या गोष्टी सांगते... तो म्हणतो तिला," I would like to see you act!" ..तो गोड हसते!... शशी कस्सला हँडसम दिसलाय त्या प्रसंगात!... त्यानंतर तो जीपमधून तिला घेऊन फिरायला बाहेर जायला निघतो तेव्हा त्याचा किलर फ्लर्टेशस अंदाज बघण्यासारखाच!!
बकिंगमची टीम एका विलक्षण सुंदर अश्या हिल स्टेशनवर एका ब्रिटिश कुटुंबाच्या ग्लेनिगल्स नावाच्या हॉटेलमध्ये उतरलेत. इथे छोट्याश्या रोलमध्ये जेनिफर दिसते! त्यांच्याकडून कळतं की आता स्वतंत्र भारतात त्यांच्याकडेही येणारी मंडळी कमी होत गेल्येत आणि त्यांना भारत सोडून जावंसं वाटायला लागलंय. टोनीलाही जाणवतंय की त्याच्या नाटकालाही आता पूर्वीसारखे प्रेक्षक नाहीत आणि त्यामुळे इतर कलाकारांचं मानधन वेळेवर देणंही शक्य होत नाहीये.... त्यांची ही मानसिक घालमेल अचूक पकड्ल्येय या सिनेमात! क्लाराशी बोलताना तो त्याची ती अवस्था तिला बोलूनही दाखवतो -
"I just can't get it out of my mind... such rejection...rejection of me... everythig I have done...why are we here?..instead of Sheffield or Bristol...Did I have to come all the way to india just because I was not good enough for those places?... we were idealists... " .. त्याला वाटतंय की इंग्लंडला नाटकांचं वेड आहे..लोकं रांगा लावून तिकिटं घेतायत.... टोनी आणि क्लाराला बदललेली परिस्थिती पाहता लीझ्झीने आता भारतात न राहता इंग्लंडला जाऊन राहावं असंही कुठेतरी वाटतंय....पण भारतातही अजून काही खरे दर्दी लोकं त्यांना योग्य ती दाद देणारे आहेत म्हणून त्यांचा जीव इथेही अडकलाय... हा प्रसंग सुरेख जमून आलाय...
इकडे संजू हा गुलछबू वृत्तीचा गुलझार तरुण! सध्या त्याचं मंजुळा नावाच्या हिंदी सिनेमातल्या नटीबरोबर (मधुर जाफरी) अफेअर सुरु आहे. तो जात असतो तिच्या शूटिंगच्या ठिकाणी. पण त्याला आता लीझ्झीची भुरळ पडल्ये! त्याला आता त्यांच्या ट्रूपबरोबर राहून त्यांचे नाटकाचे शोज बघावेसे वाटतायत. त्याला लीझ्झीला स्टेजवर अक्टिंग करताना बघायला आवडतं. एकदा तो लीझ्झीच्या मेकअपरूममध्ये थेट घुसलेला तिच्या आईला क्लाराला आवडलेलं नाही! "Excuse me!! An actor's dressing room is absolutely private!" म्हणत ती तिची नाराजी व्यक्तही करते! पण ती गेल्यावर संजू त्याच्या गोड बोलण्याने आणि कमालीच्या प्रेमळ आविर्भावाने लीझ्झीला जिंकतो. नाटकाच्या शो नंतर निघून, तो पठ्ठा मंजुळाच्याकडे जाऊन तिलाही खुश करतो. बोलताबोलता तो बकिंगमच्या ग्रुपचं हॅम्लेट बघायला गेल्यामुळे उशीर झाल्याचं सांगतो. त्याला एकंदरीत नाटक या प्रकाराने प्रभावित केलंय.
दुसऱ्या दिवशी संजू लीझ्झीला घेऊन त्या नयनरम्य हिलस्टेशवरच्या एका अदभूत स्पॉटवर फिरायला गेलाय. आसमंतात सर्वत्र धुकं....नजर जाईल तिथे फक्त धुकं ...विलक्षण मोहमयी वातावरण... संजू लीझ्झीला त्याच्या शालेय जीवनातले किस्से सांगतोय.. शिक्षकांचे किस्से.. मजा.... ती अचानक त्याला शाळेतलं संस्कृतमधलं काहीतरी म्हणून दाखवायला सांगते ...त्याला ते येत नसतं -
"I forgot.."
"Go on.."
"राम रामः रामाहा ..I don't know.." तो थांबतो... त्याला काहीच येत नाहीये. पण ती लाडिक आर्जव करत्येय -
"Go on.." ...
तो अचानकच काही हिंदी काव्यपंक्ती सुरु करतो-
"शाम भी थी धुआं धुआं, हुस्न भी था उदास उदास
दिल को कई कहानीयां - याद सी आके रह गयी..." ..आणि तो तिच्या नाकाच्या शेंड्याला हलकच बोट लावतो... ती मोहरल्ये.
ती विचारते-
"what's the meaning..?"
"Its philosophical .." तो उत्तरतो.
ती त्याला बिलगते, "Now come on tell me ..." ..तिच्या कमरेभोवती त्याच्या हाताची आश्वस्त मिठी..
आणि पुढच्या क्षणी त्या धुक्याने भरलेल्या आणि भारलेल्या पायवाटेवर दोघांची घट्ट मिठी आणि दीर्घ चुंबन.....पुन्हा एकदा... पुनःपुन्हा... हा सीन अत्यंत तरल...अतीव देखणा शशी आणि त्याची प्रत्यक्षातली मेहुणी फेलिसिटी केंडल!...
पण त्या दोघांना मंजुळाच्या घरच्या बाईने पाहिलंय आणि ती जाऊन ते मंजुळाला सांगते. मंजुळाला सहन होत नाही आणि ती लीझ्झीला घरी बोलावून त्यांच्यातल्या नात्याची कल्पना देते. लीझ्झी हैराण. संजूला सगळं समजलंय. पण त्याला लीझ्झीला गमवायचं नाहीये. तो लीझ्झीला भेटून तिची मनधरणी करतो. तो शो दर शो गणिक तिच्या मागे जात राहतो. त्यांची जवळीक सीमारेषा पार करते. अगदी त्यांच्या तालमीच्या ठिकाणी एका कोपऱ्यात दोघांची बेभान आलिंगनं. लीझ्झी पुरतीच गुंतल्ये त्याच्यात! जे अर्थातच लीझ्झीच्या आईला सहन होत नाही...एक अंतर्गत तणाव...
लीझ्झीच्या एका शोला आलेले काही तरुण कमेंट्स करून रसभंग करण्याचा प्रयत्न करतात .संजुची त्यांच्याशी मारामारी. पुढे?...
लीझ्झी संजूच्या मिठीत शिरून त्याला सांगत्ये -"संजू, मी तुझ्यासाठी काहीही कारेन. सगळं सोडून तुझ्याबरोबर येईन. तू फक्त मला साद दे.." पण संजूचं त्यावेळचं मौन तिला सत्यपरिस्थितीची जाणीव करून देतं... संजूला कायमची जबाबदारी नकोय हे तिला उमगतं... ती उध्वस्त होते.... शेवट?....
मी सांगत नाही ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघाच... शशीच्या असण्यासाठी...दिसण्यासाठी ...आणि सहजसुंदर अभिनयासाठी!!
जेम्स आयव्हरीचं दिग्दर्शन... सत्यजित रे यांचं संगीत..... आणि सुब्रत मित्राची अफलातून सिनेमॅटोग्राफी...
No comments:
Post a Comment