२४ डिसेंबर: अनिल कपूर
------------------------------
80 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच अॕक्टींगसाठी मला तो आवडून गेला होता! म्हणजे मुळात शशीचं एक स्पेश्शल स्थान वगळता, मला अॕक्टींगसाठी बलराज सहानी, संजीवकुमार, नासिरुद्दीन; डायलॉगसाठी अमिताभ; गाणी साकारण्यासाठी देव आणि शम्मी आवडतात. आणि नंतरच्या पिढीत फक्त अनिलच आवडून गेला! त्याचे सुरुवातीचे "वोह सात दिन, मशाल आणि साहेब" बघून हा आपल्याला कुठेतरी आवडतोय याची जाणीव झाली!
१९८२च्या "सवाल, नमक हलाल आणि बेजुबान" नंतर माझ्या शशीनेही प्रौढ भूमिका स्वीकारायला सुरुवात केली होती आणि त्याच वर्षीच्या "शक्ती" नंतर अमिताभचीही जादू ओसरायला सुरुवात झाली होती आणि तश्यात अनिल कपूरच्या रूपात ज्याचे सिनेमे थेटरात जाऊन बघावेत असं वाटायला लागणारा कुणी समोर आला!
आणि मग १९८५ ला 'साहेब' पाठोपाठ आलेला त्याचा डबल रोलवाला 'युद्ध' पाहिला. खास शैलीत "झकाssस्स" म्हणणारा त्याचा रांगडा रोल आवडून गेला आणि मग पुढची कित्येक वर्षं मी थेटरमध्ये जाऊन नवीन हिंदी सिनेमे पाहिले ते फक्त त्याचे आणि त्याचेच!! तेजाबमधला 'मुन्नाभाय', कर्मामधला 'जॉनी', आवारगीमधला 'आझाद', आणि जोशिलेमधल्या 'करण'सारख्या त्याच्या रफटफ, रांगड्या भूमिका पाहिल्यावर, त्याला 'रंगीला'मधला आमिर खानचा "मुन्ना"चा रोल मिळता तर त्याने ती भूमिका कुठल्या कुठे नेऊन ठेवली असती असं कायमच वाटत राहिलंय!!
त्याकाळात मी त्याच्या अभिनयशैलीवर आणि डायलॉगबाजीवर खुश होऊन त्याचे काय वाट्टेल ते सिनेमे बघायचो! अगदी "इतिहास, विजय, हिफाजत, मोहोब्बत, जाँबाज, सोने पे सुहागा, किशन कन्हैय्या"पासून "रूप की रानी चोरों का राजा, खेल, ठिकाना" पर्यंत वाट्टेल ते!! अर्थात त्याचे खास सुपरहिट्ट "मेरी जंग, मिस्टर इंडिया, राम लखन, परिंदा" तर नंतरही पुन्हा पाहिले! त्यावेळी मला क्लिंट ईस्टवूडस्टाईल खुरटी दाढी ठेवण्याचं वेड होतंच त्यात अनिल कपूरही साधारणपणे तशीच खुरटी दाढी ठेवायचा त्यामुळे तोही आपल्याच कळपातला वाटून जायचा!! ;-) )
तो किस्सा आठवतोय."मेरी जंग"च्या मुहूर्ताच्या वेळचा! सलीम जावेदची सणसणीत कथा! जणू अमिताभलाच डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेला सिनेमा!..पण एव्हाना अमिताभचं वय वाढल्याने तो त्या यंग डॕशिंग वकीलाच्या भूमिकेत शोभला नसता, त्यामुळे स्वाभाविकच अनिल त्या रोलसाठी योग्य चाॕईस होता. मुहूर्त अमिताभच्याच हस्ते करायचा ठरला आणि तोही जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे मुहूर्ताच्या सीनमधे जे डायलाॕग्ज अनिल म्हणणार होता ते आधी अमिताभने आपल्या अंदाजात पेश करायचे आणि मग अनिलने तेच म्हणत टेक द्यायचा!! आता, इतर लेचापेचा कुणी असता तर आपलेच डायलाॕग्ज इतक्या लोकांसमोर साक्षात अमिताभने म्हटल्यावर आपण तेच म्हणत शाॕट ओके करायचा तर किती फे फे उडाली असती. पण अनिलने प्रचंड झोकात डायलाॕग्ज म्हणत 'टेक' देत सगळ्या उपस्थितांची वाहव्वा मिळवली होती! ☺
त्याकाळात मी मंजूबरोबर बोरिवलीतल्या आमच्या मित्राकडे (निशांत कर्णिक) आमच्या ग्रुपमधे पडीक असायचो. तर तिथे निशांतचा त्याच 'नाटकवाला लेन' भागात राहणारा, 'अनिल कपूर'मय झालेला एक मित्र यायचा! त्याच्याइतका मी कुठल्याच हिरोचा तितका अशक्य ठ्ठार वेडा फॅन आजतागायत पाहिलेला नाही!! त्याने अनिल कपूरचे तोपर्यंत आलेले सर्वच्या सर्व सिनेमे अनेकदा तर पाहिले होतेच पण हाईट म्हणजे त्याला ते सर्व सिनेमे "क्रमवार chronologically" पाठ होते!!!! म्हणजे आपण त्याला संपूर्ण यादी म्हणायला सांगितली तर तो ती न चुकता क्रमवार म्हणून दाखवायचा आणि मधूनच आठवा सिनेमा सांग, चौदावा सांग, तेवीसावा सांग वगैरे म्हटलं तरी तो शांतपणे कितीही वेळा ना चुकता कितवाही सिनेमा विचारला, तरी न चुकता आत्मविश्वासाने अगदी सहज ती यादी कुठल्याही नंबरच्या सिनेमासाठी घडाघडा सांगू शकायचा! खोटं वाटेल हे ऐकून, पण आम्ही टेस्ट घेतली होती त्याची!! अनिल कपूरचाच काय पण कुठल्याही हिरोचा तस्सा फॅन मी आजतागायत पाहिला नाही! (मी स्वतःसुद्धा प्रचंड शशीवेडा आहे आणि शशीचे किमान ९० सिनेमे बघितलेत मी आणि त्यांची नाव सहजच सांगू शकलो तरी अशी 'क्रमवार' नाही बाबा सांगू शकणार! 🙄
काही वर्षांपूर्वी आलेली अनिलची हिंदी टीव्ही सिरीयल "24" आणि त्याचा अभिनय कोण विसरेल? आजही तरुण नायकांबरोबरच्या सिनेमात तोच भाव खाऊन जात असतो! मग सीन इंटेन्स असो वा काॕमिक!
No comments:
Post a Comment