द शाॕप अराऊंड द काॕर्नर
---------------
अर्न्स्ट लुबिश या ग्रेट दिग्दर्शकाच्या मी सध्या प्रेमात! गेल्या पाच रात्रींतला त्याचा तिसरा मूव्ही काल रात्री पाहिला तो १९४० सालची "द शाॕप अराऊंड द काॕर्नर" ही हलकीफुलकी काॕमेडी!
हाॕलीवुडच्या १९३०-१९६० या सुवर्णकाळात गाजलेला आणि हलकेफुलके रोल्स लीलया साकारणा-या अॕक्टर्समधला जेम्स स्ट्युअर्टचा हा मूव्ही! त्याचे "फिलाडेल्फीया स्टोरी", "इट्स अ वंडरफूल लाईफ" मनात ताजे आहेतच! उंचापूरा, शिडशिडीत जिमी स्ट्युअर्ट सहजच जगतो कुठलाही रोल!
स्टोरी तशी साधी सरळ सिंम्पल. बुडापेस्टमधलं एका काॕर्नवरचं "मॕटुशेक अँड कंपनी" हे छोटेखानी डिपार्टमेंटल स्टोअर. तिथे काम करणारे अनेक कर्मचारी आणि स्वतः मालक मॕटुशेक (फ्रँक माॕर्गन). त्या दुकानातला क्लार्क म्हणून काम करणारा क्रालिक (जेम्स स्ट्युअर्ट) आणि त्याच दुकानात नव्याने भरती झालेली क्लारा (मार्गरेट सलव्हन) ची हलकीफुलकी प्रेमकथा!
हा काळ ३०-४०च्या दशकातला! त्याकाळी कम्प्युटर्स, मोबाईल नव्हते. फेसबुक, व्हाॕट्सअॕप असण्याचा प्रश्नच नव्हता!.."पत्रमैत्री म्हणजेच पेनफ्रेंडशिप"चा तो जमाना!...तर क्रालिक आणि क्लारा हे दोघं एकमेकांचे पेनफ्रेंड्स आहेत पण टोपणनावानं एकमेकांना पत्र पाठवत असल्यानं प्रत्यक्षात आपणच ती दोघं हे त्यांना ठाऊक नाहीये. प्रत्यक्षात दोघांमधे उलट खटकेच उडत असतात.
एक दिवस दोघंही पेनफ्रेंड्स एकमेकांना हाॕटेलमधे भेटायचं ठरवतात...नेमकं त्याच दिवशी मालक मॕटुशेकनं काही संशयावरनं क्रालिकला कामावरुन कढून टाकलंय त्यामुळे तो आधीच नर्व्हस! ..शाॕपमधल्याच पिरोव्हीच (फेलीक्स ब्रेसार्ट) ह्या घाबरट ज्येष्ठ सहका-याला घेऊन क्रालिक हाॕटेलच्या बाहेर उभा आहे. तो पिरोव्हिचला पेनफ्रेंडने सांगितलेल्या खाणाखूणांवरुन ती आहे का आत, ते बघायला सांगतो. ती क्लाराच आहे हे कळून तो हैराण!..त्यांची ती भेट कशी होते?..तो क्लाराला आपली खरी ओळख सांगतो का? मॕटुशेक त्याला पुन्हा कामावर का घेतो? शाॕपमधे पुढे काय घडतं? क्रालिक आणि क्लारा कसे एकत्र येतात?..अश्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हा दीड तासाचा रंजक सिनेमा!
हलक्याफुलक्या पद्धतीनं पुढे सरकत जाणारी कथा! सगळ्याच पात्रांची उत्तम अॕक्टींग आणि केवळ ते शाॕप, हाॕटेल, क्वचित हाॕस्पिटल आणि क्लाराची रुम इतक्या मोजक्याच ठिकाणी घडणारं कथानक! माझ्यासारखंच ज्यांना तो १९३० ते १९६० मधला काळ...त्याकाळचं अमेरिका, युरोपमधलं आयुष्य ज्यांना पाहायला (जगायला?!!) आवडतं त्यांना आवडेल हा सिनेमा! लुबिशचं सफाईदार दिग्दर्शन!
No comments:
Post a Comment