द ट्रबल विथ हॕरी
------------
हिचकाॕकची धमाल "ब्लॕक काॕमेडी"!!
ब्लॕक काॕमेडीमधे बहुतेकदा एखाद्या पात्राच्या मृत्यूभोवती फिरणारी कथा पण हलक्याफुलक्या, विनोदी ढंगात मांडलेली असते! (उदाहरणार्थ हिंदीमधले भक्ती बर्वे, नसिरुद्दीन, रवि वास्वानी, सतीश शहा, ओम पुरीचा "जाने भी दो यारो" आणि दीपिका पडुकोन, नसीरुद्दीन, पंकज कपूर, डिम्पलचा "फाईंडिंग फॕनी" आपण प्रत्येकाने पाहिलेले असतात!)...तर सस्पेन्सचा बादशहा हिचकाॕकचा ६५ वर्षांपूर्वीचा म्हणजे १९५५ सालचा "द ट्रबल विथ हॕरी" हा असाच एक अप्रतिम ब्लॕक काॕमेडी मूव्ही!!...
त्याकाळच्या व्हर्माॕट ह्या अमेरिकेतल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यानं नटलेल्या अत्यंत शांत गावात घडलेली ही कथा! आपल्यावर अद्भूत गारुड करणारा निसर्ग...हिरवाई..ती वृक्षराजी...त्या मखमली टेकड्या आणि कुरणं...आणि हे सगळं पुन्हा शरदऋतु म्हणजे आॕटम उर्फ फाॕलमधलं!!..त्यामुळे ह्या मूव्हीच्या एक्केक फ्रेममधून समोर येणारी ती पानांच्या रंगांची उधळण आपल्याला वेडं करुन जाते!
गावात दूरदूर अंतरांवर असणारी टुमदार घरं...आणि त्यातल्या इनमीन ९-१० पात्रांमधे घडणारी कथा..!!
सिनेमा सुरु होतो तेव्हा लहानगा आर्नी (जेरी मॕथर्स) आपली खेळातली बंदूक घेऊन (खोट्याखोट्या-) शिकारीला निघालाय...हिरव्यागार टेकडीवरच्या रानातून वाट काढत जात आसताना त्याला बंदुकीचे तीन बार ऐकू येतात...बालसुलभ कुतूहलाने इकडेतिकडे शोध घेताना त्याला एक माणूस जमिनीवर आडवा पडलेला दिसतो...तो आपल्या आईला ते सांगायला धावत सुटतो...दरम्यान त्याच रानात सश्याची शिकार करायला आलेला म्हातारा कॕप्टन वाईल्स (एडमंड ग्वेन) आपण झाडलेल्या तीन गोळ्यांचा परिणाम सशाच्या शिकारीत झाला की नाही याचा शोध घेत त्याच जमिनीवर पडलेल्या माणसाजवळ येतो..तो माणूस मेलेला आहे आणि बहुदा आपणच झाडलेल्या तीन गोळ्यांपैकी एका गोळीमुळे असं वाटून कॕप्टन घाबरतो...त्या माणसाचा मृतदेह ओढत नेऊन दाट झाडीत तो टाकणार तेव्हढ्यात तिथे आलेली आयव्ही (मिल्ड्रेड नॕटविक) ही अविवाहित प्रौढा ते बघते...पण फार आश्चर्य व्यक्त न करता उलट कॕप्टननं त्या मृतदेहाला लपवून नंतर आपल्याकडे दुपारी नाश्त्यासाठी यावं असं आमंत्रण देऊन जाते...हुश्श करुन कॕप्टन त्या मृतदेहाकडे वळणार तेव्हढ्यात त्याला लहान मुलाचा आवाज ऐकू येतो म्हणून तो पुन्हा झाडामागे लपतो...लहानगा आर्नी आपल्या विधवा आईला, जेनिफरला (शर्ले मॕक्लीन) घेऊन तिथे आलाय...जेनिफर तो माणूस हा आपला आधीचा नवरा हॕरी असल्याचं ओळखते पण आर्नीला काही कळू न देता त्याला घेऊन तिथनं निघून जाते...दरम्यान अतिश्रमाने कॕप्टनला तिथे झाडामागेच झोप लागल्ये...थोड्या वेळाने त्या गावाता राहणारा चित्रकार सॕम (जाॕन फाॕरसिथ) लँण्डस्केप्स काढायला त्या रम्य ठिकाणी येतो आणि त्यालासुद्धा तो मृतदेह दिसतो...एव्हाना जागा झालेला कॕप्टन त्याला घडलेला प्रकार सांगून आपण सशाची शिकार करत असताना त्या माणसाला चुकून गोळी लागली असावी असं सांगून तो मृतदेह पुरण्यासाठी मदतीची विनंती करतो..दोघं मिळून खड्डा खणून तो मृतदेह पुरतात...
पुढे असं काही उलगडतं की कदाचित हॕरीचा मृत्यू प्रौढा आयव्हीने त्याला केलेल्या बुटाच्या प्रहारामुळे झाला असावा...किंवा जेनिफरने त्याला दुधाच्या बाटलीने केलेल्या मारामुळे झाला असावा असं त्या दोघींना वाटून हॕरीला नक्की कुणामुळे मृत्यू आला याचं प्रश्नचिह्न उभं राहातं...
ह्या सर्व घटना घडत असताना आर्टिस्ट सॕम आणि जेनिफरमधे प्रेम उमलत असतं आणि प्रौढा आयव्हीलासुद्धा कॕप्टनबद्दल तश्याच भावना रुजायला लागलेल्या असतात...सॕम बाकीच्या तिघांना हॕरीच्या मृतदेह छपवण्यात मदत करत असतो...
मग ब-याच भानगडी घडत हॕरीच्या मृतदेहाला दिवस संपेपर्यंत तीनचारवेळा खड्ड्यातून बाहेरही काढलं जातं आणि पुन्हा पुरलंही जातं...
सरतेशेवटी हॕरीचा मृतदेह जेनिफरच्या घरी बाथरुममधे टबात ठेवून त्यासंबंधी एकवार सल्ला घेण्यासाठी गावातल्या अॕबसेंट माईंडेड डाॕक्टरला जेनिफरच्या घरी बोलावलं जातं...
आणि हे घडत असताना गावात शेरीफसाठी काम करणा-या डेप्युटी शेरीफ कॕल्व्हीनला त्या मृतदेहाची कुणकुण लागून तो या चौघांच्या मागावर जेनिफरच्या घरी येतो ..आणि त्याचवेळी त्या चौघांनी मदतीसाठी बोलावलेला अॕबसेंट माईंडेड डाॕक्टरही तिथे येऊन थडकतो...
पुढे काय घडतं? हॕरीच्या मृतहाचं काय होतं? चित्रकार सॕमच्या चित्रांना अचानक गि-हाईक चालत येऊन त्याबदल्यात काय मिळतं?..सॕम आणि जेनिफर आणि कॕप्टन आणि आयव्हीचं काय होतं? --- वगैरेंची उकल होण्यासाठी हा किंचित संथ गतीने पण रंजकपणे पुढे सरकणारा सिनेमा जरुर पाहा!..
हिचकाॕकच्या नेहेमीच्या थरारक रहस्यपटांपेक्षा वेगळ्या जाॕन्रचा मूव्ही!...व्हर्माँट गावाचं आफाट...अद्भूत निसर्गचित्रण..हा निसर्ग बघताना आपणही अमेरिकेच्या त्या ईशान्येकडच्या गावात एकदातरी जाऊन यावं असं नक्की वाटून जाईल!!...पुढे प्रचंड लोकप्रियता मिळवणा-या शर्ले मॕकलीनचा हा पहिलाच मूव्ही!!..हिचकाॕकच्या हट-के मूव्हीजमधली चक्क हलकीफुलकी ब्लॕक कामेडी!
No comments:
Post a Comment