Thursday, 17 June 2021

फिलाडेल्फिया स्टोरी

द फिलाडेल्फिया स्टोरी
---------------
काल रात्री १९४० सालचा "द फिलाडेल्फिया स्टोरी" पाहिला! कॕथरिन हेपबर्नबरोबर कॕरी ग्रँट आणि जेम्स स्ट्युअर्ट अशी मातब्बर मंडळी! जाॕर्ज क्युकरसारखा ब्बाप डायरेक्टर! ( जेम्स स्ट्युअर्टने आॕस्कर पटकावलंय यातल्या रोलबद्दल!)

कॕथरीन हेपबर्न दिसायला साधारण पण अँक्टिंगमधे दादाच!! अकॕडमी अवाॕर्ड्सच्या इतिहासात 'बेस्ट अॕक्ट्रेस' म्हणून चार आॕस्कर्स मिळवणारी ती एकमेव मेन हिराॕईन!! (माझी लाडकी इंग्रीड तिच्यापाठोपाठच तीन आॕस्कर्स मिळवून!)

या कोरोनाने लादलेल्या बंदिवासाआधी कॕरी ग्रँट आणि जेम्स स्ट्युअर्ट दोघांचेही जेमतेम दोन-दोन सिनेमे पाहिलेला मी, आता 25 मार्चच्या पहिल्या बंदिवासापासून ते आजपर्यंत, दोघांचेही एकामागोमाग एक सिनेमे दनाद्दन बघतच सुटलोय! आवडायलाच लागलेत दोघं एकदम्म! विशेषतः कॕरी ग्रँन्ट! दोघंही अगदीच समकालीन हिरो! आणि दोघंही हिचकाॕकचे विशेष लाडके! दोघांबरोबर हिचकाॕकने चार चार सिनेमे केलेत! कॕरी ग्रँन्टबरोबर "सस्पिशन, नटोरियस, टू कॕच अ थीफ आणि नाॕर्थ बाय नाॕर्थवेस्ट" तर जेम्स स्ट्युअर्टबरोबर "रोप, रिअर विंडो, द मॕन हू न्यू टू मच आणि व्हर्टिगो"..

हा सिनेमा फिरतो मात्र कॕथरिन हेपबर्नभोवती! ट्रेसी लाॕर्ड (कॕथरिन) ही श्रीमंत मुलगी. सी.के.डेक्स्टरशी (कॕरी ग्रँन्ट) लग्न झालंय तिचं! पण दोघांचं पटत नाहीये अज्जिबात! सिनेमाची सुरुवातच जोरदार!..भांडणं विकोपाला गेलेली दोघं वेगळे होण्याचा सीन! आपलं सामान घेऊन डेक्स्टर तावातावाने बंगल्याबाहेर निघालाय. तेव्हढ्यात ट्रेसी त्याची आत राहिलेली गाॕल्फ क्लब्सची (स्टिक) बॕग आणून आदळत आणि एक क्लब- 'शोले'च्या शेवटी गब्बरला मनाविरुद्ध ठाकूरच्या हवाली करत धर्मेंद्र जसा मांडीवर लाठी तोडतो- तश्शी तोडत, त्याच्यावर फेकते..त्यावर डेक्स्टर तिच्या चेहे-यावर हात ठेवून तिला इतक्या जोरात ढकलतो की ती दण्णकन आपटतेच जामिनीवर!

दोन वर्षं उलटल्येत...ट्रेसीबरोबर तिची आईवडिल, धाकटी बहिण आणि अंकल राहतायत. तिचा भाऊ दूर कुठेतरी साउथ अमेरिकेत राहतोय...डेक्स्टरशी घटस्फोट घेऊन ट्रेसी आता जाॕर्ज किट्रीजशी (जाॕन हाॕवर्ड) लग्न करायच्या तयारीत! तेव्हढ्यात डेक्स्टर परततो तो बरोबर "माईक काॕनर (जेम्स स्ट्युअर्ट) आणि एलीझाबेथ इंम्ब्री (रुथ हस्सी)" या सनसनीखेज स्टो-या छापणा-या रिपोर्टर्सना घेऊन! कारण ती दोघं काम करतायत त्या "स्पाय" मॕगझिनच्या संपादकाकडे ट्रेसीच्या वाडिलांच्या एका अफेअरची बातमी मिळल्ये आणि ती न छापण्याच्या बदल्यात त्याला ट्रेसी-किट्रिजचं हाय प्रोफाईल लग्नाचं कव्हरेज करु देण्याची जबाबदारी डेक्स्टरने उचलल्ये!

डेक्स्टर ट्रेसीला दोघांची ओळख तिच्या साउथ अमेरिकेतल्या भावाचे मित्रमैत्रिण म्हणून करुन देतो, तरी तिला ते रिपोर्टर असल्याचं कळतंच आणि मग ती उगाचच त्यांच्यासमोर खोटी खोटी वागते!...वडिलांचं प्रकरण कळल्यामुळे ते लग्नात नको म्हणून अंकललाच वडिल म्हणून खोटंखोटं वागवते...

दरम्यान माईक हा कवी असल्याचं समजल्यावर ट्रेसीला माईकविषयी साॕफ्ट काॕर्नर वाटायला लागतो...आणि ते लिझीला खुपायला लागतं...लग्नाचा दिवस जवळ येत चाललाय...दरम्यान ट्रेसीच्या छोट्या बहिणीला आणि आईला मात्र डेक्स्टरचं परत घरी येणं आवडलंय कारण अजूनही त्याचं ट्रेसीवर असलेलं प्रेम त्यांना जाणवलंय...दोघींना तो आवडत असतोच!..

पण घरात घोळ वाढतो. घरी परतलेले ट्रेसीचे बाबा तिला चार गोष्टी सुनावतात...डेक्स्टरसुद्धा तिला ऐकवतोच...पण ट्रेसी कुठची ऐकायला?...लग्नाआधीच्या रात्री माईकबरोबर ड्रिंक्स घेतलेली ट्रेसी त्याच्याशी दोस्तीत खूपच मोकळी होत त्याला किस्स करते..ड्रिंकचा अंमल जास्त झालेल्या ट्रेसी आणि माईकचे सिन्स धमाल...(या सीनमधे स्क्रीप्टमधे न लिहिलेली आणि रिहर्सलमधे न ठरलेली उचक्या देत धम्माल  अॕक्टिंग जेम्स स्ट्युआर्टने केली तेव्हा कॕरी ग्रँन्टला हंसू न आवरल्याने त्याने क्षणभर मान खाली घालत हंसू दाबलंय!)

सकाळी तिथे आलेल्या किट्रीजला आदल्या रात्रीचा प्रकार कळून तो ट्रेसीची निर्भत्सना करतो...

आता ट्रेसीसमोर पेचप्रसंग!..किट्रीजशी लग्न? ..की आवडलेल्या माईकला पसंत करणं?.की आयुष्यात परत आलेल्या डेक्स्टरशी पुन्हा लग्न करणं?..

सिनेमा उत्कंठावर्धक मोडवर...शेवट काय होतो?..त्यासाठी बघाच ही हेपबर्न- ग्रँन्ट- स्ट्युअर्टची जुगलबंदी!! छोट्या बहिणीच्या रोलमधली व्हर्जिनीया वीड्लरही आवडून जाणारी! जाॕर्ज क्युकरचं सफाईदार दिग्दर्शन!..साला काय एकेक धमाल सिनेमे बनायचे १९३०-४०-५० च्या दशकात!!..कोरोनाने लादलेल्या बंदिवासात ते सगळे बघण्याची सुबुद्धी झाल्येय आणि बघायला मिळतायत हे लकच!!

No comments:

Post a Comment