राॕबिन अँण्ड मेरियन
---------
मला लहानपणापास्नं झपाटणारं कॅरॅक्टर म्हणजे राॕबिन हूड! आजतागायत तोच माझा आयडॉल राहीला आहे! नॉटींगमच्या उत्तरेला बार्न्सडेलपर्यंत पसरलेल्या शेरवूडच्या जंगलात घडलेली त्याची दंतकथा!! विजेच्या वेगात बाण काढून तो धनुष्याला लावून, अचूक लक्ष्यावर मारणारा रॉबीन! उर्मट श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करणारा रॉबिन! जंगलात राहून हरणाचं आणि इतर मांस आणि तत्सम पदार्थ खाऊन आपली टोळी बनवून झुडूपात, झाडावर घरं बांधून राहणारे त्याचे सवंगडी मला प्रिय होते आणि आहेत! "लिटल जॉन, मेड मेरियन, फ्रायर टक, विल स्कार्लेट, एलन अ डेल, मच" अश्या आपल्या दिलदार, धाडसी आणि नॉटिङ्गमच्या दुष्ट शेरीफच्या शिपुर्ड्यांबरोबर कधीही दोन हात करायला तय्यार असणाऱ्या आपल्या जिवलग साथीदारांबरोबर शेरवूड आणि बार्न्सडेलच्या दाट जंगलात राहणारा रॉबिन मला भलताच प्रिय होता आणि अजूनही आहे!! त्याच्या स्टोरीवरचे बरेच मूव्हीज मी बघितलेत. अगदी बीबीसीची सिरियलसुद्धा!...
आजतागायत सर्वात भावलाय आणि मनात ठसलाय तो ‘एरॉल फ्लिन’चा रॉबिन!! डग्लस फ़ेअरबँक्स, जॉन हॉल, जेसन काॕनरी, केव्हिन कोस्नर आणि रसेल क्रोचे रॉबिनचे मूव्हीजसुद्धा मी पाहिलेत! पण फक्त आणि फक्त एरॉल फ्लिनच्याच रॉबिनमध्ये दंतकथेला साजेस रगेल आणि रंगेलपणाचं परफेक्ट मिश्रण होतं (जसं इयान फ्लेमिंगने जन्म दिलेल्या जेम्स बॉण्डच्या रगेल आणि रंगेल वर्णनात केवळ आणि केवळ 'शॉन कॉनरी'च फिट्ट बसतो! 😜 )...काही वर्षांपूर्वी स्टार टीव्ही (इंग्लिश असताना) त्यावर शॉन कॉनरीच्या मुलाने, जेसन कॉनरीने झकास रॉबिन साकारला होता. ती सिरीयल मस्तच होती! तर रसेल क्रोच्या सिनेमात रॉबिनहूडला "आउटलॉ" म्हणून घोषित करेपर्यंतची कथा होती. तोसुद्धा मला आवडला होता. रॉबिनवर कोणीही कितीही पिक्चर्स काढोत! आपण तो प्रत्येक पिक्चर बघायचा आणि त्या जुन्या स्मृतीत हरवून जायचं!..
१५ वर्षांपूर्वीची एक आठवण->> कंपनीच्या कामानिमित्तानं मला इंग्लंडच्या ईस्ट मिडलंड भागात दीड महिना काढायचा योग आला होता. तेंव्हा जितके वीकेंड्स मिळाले तितक्यांदा ब्रिटीश कंट्रीसाईड बघायला पळायचो. रॉबीन हूडच्या प्रेमापोटी मी असाच एका रविवारी धावतपळत नॉटीन्गमला जाऊन, "नॉटीन्गम कासल"ला भेट दिली होती!! कासलच्या बाजूच्या डेन्स वूड्समधून संध्याकाळच्या गार हवेत फेरफटका मारला होता. तिथल्या जवळच्या "रॉबिन'स् डेन"मध्ये २-३ तास घालवले होते. त्या "डेन"च्या पहिल्या मजल्यावर साबकुझ राॕबिन हूडमय वातावरण होतं..त्याची पूर्ण दंतकथा मोठ्या पोस्टरवर ब्लो अप करुन भिंतींवर लावलेली होती..एका भागात भिंतीवर प्रोजेक्टरवरुन त्याचे मूव्हीज दाखवणं चालू होतं..मी गेलो तेव्हा केव्हीन कोस्नरचा '"राॕबिन हुड - प्रिन्स आॕफ थीव्हज" दाखवणं सुरु होतं...दुसरा भाग एकदम नाॕस्टॕल्जिक करणारा - तिथे रॉबिनच्या शेरवूडमधल्या घरासारख्या, ओंडक्यांनी लाॕगवूडने बनवलेल्या सेटवर - रॉबिनच्या काळातले ड्रेसेस, टोप्या, बेल्ट घातलेले सुंदर तरुण-तरुणी आपल्याला ड्रिंक्स, कॉफी, ब्रेडऑम्लेट्स वगैरे सर्व्ह करत होते...त्यांच्यात २ तास धमाल खाता-पिताना आयुष्यात काहीतरी विलक्षण 'गवसल्या'ची भावना झाली होती!! एकूणच नाॕटिंगम कासल आणि कासल-वूड्सची भेट माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवाच्च!! (तिथे संध्याकाळी अंधारात काढलेले आणि "ब्लर" झालेले दोनतीन फोटोज आठवण म्हणून जपलेत ते शेअर केलेत!)
(आणि त्याच्याही खूप पूर्वीची आठवण - मी लहान असताना, आमच्याकडे त्या काळी एक भली मोठी तारांची मोडकी छत्री होती. तर तिच्या तारांपासून मी आणि माझ्या आतेभावानं, धनुष्य आणि बाण तयार केले होते. सुट्टीच्या दिवशी गिरगावातून आमच्याकडे माटुंग्याला लोकमान्य नगरमध्ये राहायला येणारा माझा आत्तेभाऊ आणि मी मिळून एका भिंतीवर आमचं रॉबिन हुडसारखं, धनुर्विद्येतलं कौशल्य आजमावत असू! अर्थात त्या कामी उपयोगी पडायचं ते त्या काळी आमच्याकडे येणारं "सोव्हिएत देश" मासिकाचं कॅलेंडर!! (माझ्या आठवणीत आमच्याकडचे सगळे जनसंघीय असूनही आमच्याकडे ते कम्युनिस्टाचं रशियन मासिक आणि कॅलेंडर का यायचं कुणास ठाऊक??! :-) ) - पण त्या गुळगुळीत कॅलेंडरवर मस्त मस्त फोटो असायचे आणि मी आणि माझा आत्तेभाऊ तासनतास आमच्या राॕबिनवरच्या प्रेमाखातर, आमच्या धनुर्विद्येचं कौशल्य थोड्या अंतरावर उभं राहून, त्या कॅलेंडरवरच्या लेनिनच्या नाकपुडीत अचूक बाण घुसवून किंवा कुण्या पुतळ्याची टोपी भेदून आजमावत असू!! रॉबिन पुरताच भिनला होता रक्तात तेव्हापासून.😂)
तर सांगायचं म्हणजे रॉबिनहूडच्या दंतकथेवर पार १९०८ सालच्या "रॉबिन हूड अँड हिज मेरी मेन" या मूकपटापासून ते अगदी २०१८च्या "रॉबिनहूड" पर्यंत तब्ब्ल चाळीसेक मूव्हीज येऊन गेलेत! (मी त्यातले जेमतेम पाचसहाच मूव्ही पाहिले असले तरी मी छातीठोकपणे सांगू शकतो की १९३८ सालचा "एरॉल फ्लीन"चा "द ऍडव्हेंचर्स ऑफ रॉबिनहूड" हा नितांतसुंदर टेक्निकलर मूव्ही हा सर्वात ऑथेन्टिक आहे आणि तोच रॉबीनच्या कथेवरचा सर्वश्रेष्ठ मूव्ही राहील!)..
पण असं असलं तरी काल रात्री मी पाहिला तो शाॕन काॕनरी आणि आॕड्री हेपबर्नचा "राॕबिन अॕण्ड मेरियन" हा सिनेमा "विलक्षणच" म्हणता येईल! कारण पहिल्यांदाच या सिनेमात 'प्रौढ, पन्नाशीकडे झुकलेले राॕबिन आणि मेरियन' आपल्यासमोर येतात!...आपण सर्वांनी वाचलेल्या पुस्तकांचा आणि याआधी पाहिलेल्या मूव्हीजचा शेवट होताहोता राॕबिनची भेट 'किंग रिचर्ड - द लायनहार्टेड' राजाशी होताना आपण पाहिलेलं असतं...
तर पुढे असं होतं की राजाच्या आमंत्रणावरुन राॕबिन, पुढे २० वर्षं त्याच्याबरोबर युरोपमधे लढाया (क्रुसेड्स) लढायला आपलं प्रिय शेरवूडचं जंगल सोडून आणि आपली प्रेयसी मेड मेरियनला मागे ठेवून जातो..."राॕबिन अॕण्ड मेरियन" मूव्हीची सुरुवात होते तीच मुळी त्या २० वर्षांच्या सततच्या लढाया उरकून "क्रुसेड"वरुन परतणारा पन्नाशीकडे झुकलेला राॕबिन हूड (शाॕन काॕनरी) आणि त्याचा जीवलग साथीदार लिटल् जाॕन (निकोल विल्यमसन) परतताना एक शेवटचा किल्ला जिंकायला आलेल्या दृश्यानं!!...आधी ऐकल्यानुसार काही जडजवाहिर, सोन्याची मूर्तीबिर्ती शिल्लक नसलेला तो किल्ला घेण्यात अर्थ नाही असं ते राजाला सांगतात पण त्यांनी हुकूम मोडला म्हणून त्यांना कोठडीत टाकलं जातं...पुढे खांद्यावर बाणाची जखम झालेल्या राजाचा मृत्यू होतो आणि सुटका झालेला राॕबिन लिटल् जाॕनसह त्याच्या प्रिय शेरवूडच्या जंगलात परततो...तिथे विल आणि फ्रायर टक हे शिल्लक दोन जुने साथीदार त्यांना भेटतात पण बाकी कुणी जंगलात शिल्लक नसतं..
राॕबिनला मेरियमची आठवण होते...आणि तो मेरियमला (आॕड्री हेपबर्न) भेटतोही...ती भेटल्यावरचा सीन सुंदर...जुन्या २० वर्षांपूर्वीच्या प्रेमाची याद...मेरियन एव्हाना खेड्यातल्या चर्चची नन झाल्ये...पण तिला तिथल्या शेरीफचा छळ सहन करावा लागतोय...त्याच्या माणसांनी तिच्याबरोबर काम करणा-या इतर नन्सना बंदी बनवून त्याच्या गढीत नेलंय...राॕबिन आपल्या साथीदाराबरोबर जाऊन तिची आणि इतर नन्सची सुटका करतो..तो सीन बघण्यासारखा.. अत्यंत खरा वाटावा असा वास्तवदर्शी...प्रौढ राॕबिनच्या अंगात पूर्वीची चपळाई, विजेचा वेग..ते रिफ्लेक्सेस राहिलेले नाहीत...पण तरीही जिगर शाबूत आहे...तो सुटकेचा प्रसंग आणि थरार मस्त जमलाय...राॕबिन क्रुसेडवर निघून गेल्यापास्नं नन चं जिणं जगणारी मेरियनही बदलल्येय...तिला आता शांत जीवन हवंय...राॕबिन आता प्रौढ झालाय तर त्याने पूर्वीचा रंगेलपणा..त्या मारामा-या...त्या चकमकी आता टाळाव्यात असंच तिला वाटतंय...पण राॕबिनला त्याचे तीन विश्वासू साथीदर आणि पुन्हा त्याच्या टोळीत सामील व्हायला आलेल्या गावक-यांना घेऊन मेरियनच्या साथीत तिथल्या शेरीफला अद्दल घडवायच्येय...
शेरीफच्या गढीतनं चकमक करुन सर्वांना सोडवून जंगलात परतलेल्या राॕबिनजवळ बसून मेरियन त्याला न्याहाळत्येय...दोघांचा खूप गोड सीन -
मेरियन - मला बघू दे तुझ्याकडे.
राॕबिन - (अंगरखा दूर करत) थोडंसं खरचटलंय आणि थोडा मार लागलाय बस्स..
मेरियन - (त्याच्या जखमांना स्पर्श करत) अई ग्गं....खूपच लागलंय...मला आठवतंय तू इथून गेलास तेव्हा किती सुंदर हट्टाकट्टा होतास...दणकट आणि अंगावर एकही व्रण नसणारा...तू माझा होतास!...तू गेलास आणि मला जगूच नये वाटलं..मग मी एका झ-याकाठी बसून हाताची शीर कापून घेतली...पण तिथे आलेल्या कुण्या मूर्खानं मला वाचवलं आणि चर्चच्या नन्सकडे सोपवलं...पण...आता तू भेटलायस...आता पुन्हा आणखी जखमा नकोत राॕबिन...मला तुला पुन्हा गमवणं सहनच नाही होणार..
राबिन - (तिला जवळ घेत) मी याआधी चर्चच्या कुठल्याच नन चं चुंबन घेतलं नाहीये...हे पाप तर नाही नं ठरणार?...(दोघं सुंदर मिठीत)...
दरम्यान शेरीफचा सरदार राॕबिनच्या मागावर चार घोडेस्वार घेऊन येतोही..पण त्याच्या साथीदारांना ठार करुन राॕबिन त्याला "माझ्या या जंगलात पाय ठेवलास तर ठार करीन" अशी धमकी देऊन सोडून देतो...
चवताळलेला तो सरदार राजाकडून दोनशे सैनिक घेऊन त्या शेरीफच्या (राॕबर्ट शाॕ) मदतीनं शेरवूड जंगलबाहेर तळ ठोकतो...
राॕबिनला हे ठाऊक आहे की त्या लढाईत पारंगत असणा-या सैनिकांसमोर त्याच्या बहुतांशी थकलेल्या प्रौढ आणि काही अगदीच कोवळं वय असणा-या साथीदारांचा तेही हाताशी फारशी शस्त्रं नसताना निभाव लागणं कठीण...
तो जंलाबाहेर जाऊन शेरीफला मॕन टू मॕन द्वंद्वाचं आव्हान देतो...अट एकच राॕबिन जिंकला तर राजाच्या सैन्याने पुन्हाशेरवुडच्या जंगलात त्रास द्यायला यायचं नाही...आणि त्यांचं द्वंद्व सुरु होतं...
कोण जिंकतं त्या द्वंद्वात? सरदाराचे सैनिक गप्प बसतात की हल्ला चढवतात?...प्रौढ राॕबिन आणि मेरियमच्या प्रेमकहाणीचा शेवट कसा होतो??
जरुर पाहा...प्रौढ वयातल्या शाॕन काॕनरीचा राॕबिन आणि आॕड्रे हेपबर्नची मेरियम!...
मूव्हीच्या शेवटाकडे जाताना राॕबिनवरचं प्रेम व्यक्त करताना मेरियमच्या भूमिकेतले आॕड्री हेपबर्नचे हृदयातनं आलेले शब्द - "I love you. More than all you know. I love you more than children. More than fields I've planted with my hands. I love you more than morning prayers or peace or food to eat. I love you more than sunlight, more than flesh or joy or one more day. I love you more than God...."
एकीकडे प्रौढ वयात "अनटचेबल्स", "इंडियाना जोन्स मूव्हीज", "द राॕक" सारख्या मारधाडीचे आणि वेगवान मूव्हीज देणा-या शाॕन काॕनरीने - ही प्रौढ, काहीश्या थकलेल्या राॕबिन हूडची भूमिका जबरदस्तच जगल्येय!! त्याला या मूव्हीआधी "वेट अनटील डार्क" सारख्या सिनेमात आंधळ्या प्रौढेची अफलातून भूमिका करणा-या आॕड्री हेपबर्नने उत्तम साथ दिल्येय...
नक्कीच पाहा...प्रौढ प्रेमाची ही कथा!
No comments:
Post a Comment