------------------------------
आकाशदर्शन करायचं तर डोकं मागे पाठीला टेकवायचा प्रयत्न करत सतत वर बघून उपयोगाचं नाही कारण त्याने काहीच मिनिटांत मानेला सणसणीत रग लागून भलतीच व्याधी मागे लागायची. झोपून बघायचं म्हटलं तर आपण कुठे डोंगरावर असू किंवा एखाद्या उंच पठारावर तर तशी छान मोकळी जागा असायला हवी. त्यामुळे साधारणपणे पश्चिम क्षितिजापासून सुरुवात करून तिथून आपल्या डोक्यावर असणाऱ्या आकाशाच्या भागाकडे (ख-स्वस्तिक) बघत बऱ्यापैकी चांगलं निरीक्षण होऊ शकतं. अर्थात त्याचवेळी डाव्याउजव्या दक्षिणोत्तर दिशांकडे आणि मागच्या पूर्वेकडे क्षितिजालगतचे तारे आणि नक्षत्र बघायला विसरायचं नाही!
आकाशदर्शन करताना सर्वात बेसिक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे "उत्तर ध्रुवा"चं स्थान निश्चित करणं. कारण तो अख्खी रात्र, वर्षभर आपलं ठिकाण सोडत नाही आणि त्यामुळे त्याच्या रेफरन्सने मुख्य म्हणजे सर्व दिशा आणि इतरही गोष्टी कळणं सोप्पं होतं. आपल्यासारख्या भारतात किंबहुना उत्तर गोलार्धात राहणाऱ्या ज्याला त्याला/जिला तिला "उत्तर ध्रुव तारा" कोणता कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात. कारण आकाशात असा तो एकमेव तारा आहे ज्याची स्थिती जन्मांत बदलत नाही, निदान काही हजार वर्षं तरी! (पण पृथ्वीच्या भोवऱ्यासारख्या फिरण्याच्या गतीमुळे, अनेक तारे हजारो वर्षांच्या गतीचक्रात त्या त्या कालखंडांत "ध्रुव तारा" म्हणून मान मिळवतील. उदाहरणार्थ इसवी सन ३००० साली 'जेम्मा सिफीआय' हा तारा ध्रुव तारा बनेल. आणि आणखी १३००० वर्षांनी 'व्हेगा' हा तारा पृथ्वीसाठी ध्रुव तारा असेल. (असो ते किंचित क्लिष्ट गणित आता बोलायला नको. सध्या तरी आपला नेहेमीचा ओळखीचा ध्रुव तारा आपण मनात ठेवू! :-) )
आपला हा ओळखीचा ध्रुव तारा शोधायचा कसा? तर उगाच उत्तरेला दृष्टी लावून अंदाजपंचेदाहोदर्शे त्यातल्या त्यात जरा प्रखर दिप्तीचा दिसतोय तोच असणार असं करून चालत नाही! मुळात आपला ध्रुव तारा खूप काही ब्राईट नाहीये बरं! तर तो शोधायची ट्रिक म्हणजे आकाशात दिसणारे सप्तर्षी आणि शर्मिष्ठा नक्षत्र आधी शोधायची - जी अत्यंत सहज उठून दिसतातच! (नाहीतर माझ्यासारखा कुणी हौशी तारे दाखवणारा असेलच, त्याला पकडा!) तर सोप्पी ट्रिक म्हणजे सप्तर्षींच्या वरच्या चौकडीतल्या पहिल्या दोन ठळक ताऱ्यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा आपण आकाशात काढली आणि ती शर्मिष्ठेच्या दिशेने नेऊन जोडली तर त्या रेषेच्या निम्म्या अंतरात जो ठळक तारा असतो तोच आपला ध्रुव तारा! एकदा हा कळला की पुढची गंमत म्हणजे एक कल्पना करायची की आपल्या हातात एक महाकाय काळी छत्री आहे.
आता कल्पना करा की त्या महाकाय छत्रीचा दांडा आपण हातात धरून, त्या छत्रीचं अणकुचीदार टोक जर ध्रुव ताऱ्याकडे रोखलं आणि कल्पना केली की त्या महाकाय छत्रीचं कापड म्हणजेच हे रात्रीचं आकाश आणि सर्व तारे, नक्षत्र या छत्रीवर आहेत. आता जर का आपण दांडा हातात ठेवून आणि टोक ध्रुव ताऱ्यांकडे रोखलेलं ठेवून छत्री अत्यंत सावकाश गोल फिरवायला सुरुवात केली तर काय होईल? ध्रुव ताऱ्याचं स्थान तेच स्थिर राहून बाकी कापडावरचे सर्व तारे, नक्षत्र गोलाकार फिरत क्रमाक्रमाने आपल्या नजरेसमोर येतील आणि जातील ....आणि ही क्रिया छत्री फिरत राहिस्तोवर होत राहील, बरोबर? ...तर exactly हेच आकाशात घडत असतं आणि घडत आलंय पृथ्वीच्या निर्मितीपास्नं!!!! पृथ्वीचा आस उत्तर ध्रुवाकडे कललेला असल्याने आणि ती स्वतःभोवती हळुवारपणे गोल फिरत राहिल्याने तेच तेच तारे आणि नक्षत्र क्रमाक्रमाने उगवताना आणि मावळताना आपल्याला दिसत राहतात.
आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून ही सर्व आकाशस्थ मंडळी पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. म्हणून आकाशदर्शन करायला बसल्यावर ही पश्चिमेकडून पटकन दिसेनासे होणारी मंडळी miss व्हायला नकोत म्हणून पहिल्यांदा पश्चिम क्षितिज बघून घ्यायचं; कारण पूर्वेकडे उगवणारे पश्चिमेकडे मावळायला येण्यासाठी अख्खी रात्र लागणार असते. पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांत फिरते म्हणजेच पूर्ण ३६० डिग्री (अंश) फिरायला तिला २४ x ६०=१४४० मिनिटं लागतात. म्हणजेच दर चार मिनिटाला पृथ्वी एक डिग्री (अंश) फिरते. म्हणजेच या गतीने आपल्या डोक्यावरचं तारामंडळ पुढे पुढे सरकत राहतं. त्यामुळे आपल्याला छान वेळ मिळतो बरंच काही पाहायला!
आता आपल्याला शहराबाहेर जाऊन असं रात्रभर आकाशदर्शन करायचं तर आपल्याकडे पुरेसे उबदार कपडे, थोडा तोंडात टाकायला खाऊ, प्यायला पाणी, थोडा उत्साह राहायला चहा हवा म्हणून गॅसची छोटी शेगडी आणि एक बऱ्यापैकी टेलिस्कोप आणि टेलिस्कोप नसल्याचं तर एखादा चांगला बायनॉक्युलर असला म्हणजे मजा येईल!
No comments:
Post a Comment