Monday, 14 June 2021

वुई आर नो एंजल्स

वुई आर नो एंजल्स..
-----------
दिग्दर्शक मायकेल कर्टिझ आणि हंफ्रे बोगार्टचा मी पाहिलेला "कॕसाब्लांका"नंतरचा दुसरा मूव्ही! १९५५ सालचा! ह्यामधे मात्र हंफ्रेला खूपच वेगळ्या काहीशा गंमत्या गुन्हेगाराच्या रोलमधे पेश केलाय कर्टिझनं! त्याच्याबरोबरचे साथीदार आहेत आॕल्डो रे आणि पीटर युस्टिनाॕव्ह! (पीटर युस्टिनाॕव्ह म्हणजे तोच जो इंदिरा गांधीच्या शेवटच्या क्षणी डाॕक्युमेंटरी शूट करण्यासाठी हजर होता! (त्याने काही शूट केलं होतं का? त्याच्या कॕमे-यात कितपत चित्रित झाला तो गोळीबार वगैरे काहीच माहिती नाही आली बाहेर!)..

तर ही कथा तीन गुन्हेगारांची! १८९५ सालातली! त्यावेळी डेव्हिल्स आयलंड हे बेट फ्रेंचाच्या अधिपत्याखाली होतं आणि तिथे वेगवेगळे कैदी ठेवले जात असत. त्यातल्याच काही गुन्हेगारांना नंतर आसपासच्या बेटांवर फुटकळ कामं मिळत असत. तर क्रिसमसच्या धामधुमीत तिथल्या तुरुंगातनं भामटा जोसेफ (हंम्फ्रे बोगार्ट), आणि त्याचे साथीदार खुनाचा आरोपी अल्बर्ट (आल्डो रे) आणि कुलुपं फोडण्यात माहिर ज्यूल्स (पीटर युस्टिनाॕव्ह) पळ काढतात आणि बंदरासमोरच्या ब्रँन्डन गावातल्या धक्क्याजवळ येऊन, बेटावरुन सटकून फ्रान्सला जाणा-या बोटीवर जाण्याची संधी हेरत दबा धरुन बसतात. 

बोटीवरनं काही कामासाठी तिथे आलेल्या एका तरुण आॕफिसरच्या खिशावर डल्ला मारल्यावर त्यांना कागदपत्र मिळतात आणि त्या कागदपत्रांच्य सहरय्यानं ते तिथल्याच वसाहतीतल्या एका डिपार्टमेंटल स्टोअरला लागूनच असणा-या घराच्या मालकाकडे, फेलीक्स ड्युकाॕटेलकडे (लिओ कॕराॕल) पोहोचतात. तो त्यांना छप्पर- दुरुस्तीचं काम देतो..

छपरावरुन त्यांना खालचं स्टोअरमधलं आणि फेलीक्सच्या घरातलं सर्व दिसत असतं आणि ऐकूही येत असतं. त्यावरुन त्यांना कळतं की त्या घरात फेलिक्स, आपली पत्नी अमेली आणि तरुण मुलगी इसाबेलबरोबर राहातोय आणि ते स्टोअर त्याच्या चुलतभावाचं आंद्रेचं असून ते त्याने चालवायला घेतलंय पण त्याला ते धड चालवता येत नाहीये आणि म्हणून चिडलेला आंद्रे पॕरीसहून सर्व हिशेब करण्यासाठी आपल्या पुतण्या पाॕलला येऊन तिथे पोहोचतोय. इसाबेलला पाॕल आवडतोय पण आंद्रेने त्यचं लग्न कुणा श्रीमंताच्या मुलीशी आधीच ठरवलंय..आणि पाॕल त्याच्या शब्दाबाहेर नाही!

त्या घरात शिरलेले जोसेफ, अल्बर्ट आणि ज्यूल्स खरं तर मिळेल तेवढे पैसे चोरुन आणि वेळ पडली तर फेलीक्सच्या कुटुंबाचा काटा काढून तिथनं रातोरात पळून जाणार असतात. त्यावेळी जोसेफ अत्यंत थंड डोक्याने म्हणतो -"We came here to rob them and that's what we're gonna do - beat their heads in, gouge their eyes out, slash their throats."

पण त्यांच्या दिवसभरातल्या मदतीवर खूष झालेला फेलीक्स आणि पत्नी आमेली त्यांना क्रिसमससाठी तिथेच राहण्याचं प्रेमळ निमंत्रण देतात. मग तिघे गुन्हेगार (आणि त्यातही अल्बर्टने पाळलेल्या विषारी सापासह) तिथेच मुक्काम करतात...

दुस-या दिवशी तिथे पोहोचलेला आंद्रे आणि पाॕलचं ते तिघे कसं स्वागत करतात? आंद्रेच्या दहशतीखाली पाॕल इसाबेलचं प्रेम अव्हेरतो तेव्हा काय होतं? आंद्रे आणि पाॕलच्या अरेरावीपणावर त्या तिघांकडे काय उत्तर असतं? अल्बर्टचा पेट साप काय कामगिरी करतो? ...तिघे दुकानातनं पळ काढून जहाजामार्गे बेट सोडण्यात यशस्वी होतात का? ....अश्या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा १९५५ सालचा मूव्ही अवश्य बघा!..पुढे १९६८ साली मराठीत ह्याच कथेशी साम्य असलेला "आम्ही जातो अमुच्या गावा" आला होता त्याची आठवण झाल्याशिवाय राहात नाही..!!

ह्या सिनेमात तिन्ही गुन्हेगारांच्या तोंडचे चुरचुरीत डायलाॕग्ज मजा आणतात. म्होरक्या जोसेफच्या भूमिकेत हंफ्रे बोगार्टचा वेगळा मिश्कील अंदाज बघायला मजा येते..पीटर युस्टिनाॕव्हचा ज्यूल्स आणि साप पाळणा-या, माऊथ आॕर्गन वाजवणा-या अल्बर्टच्या भूमिकेत तगडा आल्डो रे नं सुद्धा धमाल केल्येय!!

No comments:

Post a Comment