Monday, 14 June 2021

द मॕन इन ग्रे फ्लॕनल सूट

लाडक्या ग्रेगरीचा गेल्यावर्षी पाहिलेला...

"द मॕन इन द ग्रे फ्लॕनल सूट"
----------------------
फ्लॕनल म्हणजे वुलनचं मऊ मऊ कापड आणि त्याचा सूट घालणा-या माणसाची ही कथा! रोज मॕनहॕटनच्या ग्रँण्ड सेंट्रल स्टेशनवरुन ट्रेन पकडून नोकरीवर जाणारा टाॕम रॕथ चं (ग्रेगरी पेक) रुटीन आयुष्य सामान्यच पण काहीसं काँम्प्लीकेटेड! 

टाॕमला जेमतेम 7000 डाॕलर्सच्या अॕन्युअल सॕलरीत मनासारखं जगता येत नाहीये. बायको बेट्सी (जेनिफर जोन्स) आणि तीन मुलांबरोबर अत्यंत मध्यमवर्गीय आयुष्य तो ढकलतोय. आज्जीचा वारश्याने चालत आलेला बंगला आणि काही संपत्ती मिळेल या भरवश्यावर त्याचं रुटीन सुरु आहे. तश्यात आज्जीने फक्त घरच मागे ठेवलंय, पैसे काहीच नाहीत ही बातमी ऐकून तो खचतो.  

बायकोची भूणभूण वाढते आणि कंटाळूनच तो अनिच्छेनंच दुसरा एका ब्राॕडकास्टींग नेटवर्कवर लेखनाचा जाॕब पकडतो पण तिथेही फार काही पगारात घसघशीत वाढ झालेली नसतेच. 

टाॕमला एक भूतकाळ आहे. दहा वर्षांआधी दुस-या महायुद्धादरम्यान इटलीमध्ये कॕप्टन म्हणून पोस्टींग असताना, त्याचे जवळपास पाच-सहा आठवडे मारियाशी (मॕरीस्सा पॕव्हन) संबंध आलेले असतात. त्यांचा रोमँन्स फुललेला असतो... पोस्टींगच्याच काळात थंडीत ओव्हरकोटासाठी त्याने एका जर्मन सैनिकाची हत्या केलेली असते आणि युद्धादरम्यान त्याच्या हातून नकळतच त्याच्या सहका-याचा ग्रेनेडच्या स्फोटात मृत्यू झालेला असतो....नकळत मात्र त्याची बोच त्याला असते...आणि ही भूतकाळातली सारी शल्य मनात ठेवून काहीशा अपराधी भावनेनंच तो वर्तमानातलं रुटीन जगत असतो..

नवीन नोकरीतल्याएका टप्प्यावर त्याला त्याचा सैन्यातला सहकारी भेटतो (ज्याने मारियाच्याच चुलत बहिणीशी लग्न केलंय). तो टाॕमला सांगतो की मारियाने त्याच्यापासून झालेल्या मुलाला वाढवलंय पण तिची परिस्थिती वाईट आहे आणि मुलाच्या शिक्षणासाठी टाॕमनेच काही करणं भाग आहे म्हणून!

आणि मग टाॕमची मानसिक घालमेल सुरु होते. आपला लपवलेला भूतकाळ तो बेट्सीसमोर पूर्ण उलगडून सांगतो का? तिची रिअॕक्शन काय होते? आज्जीकडून मिळणा-या बंगल्याचं काय होतं? मारियापासून झालेल्या मुलाला तो मदत करु शकतो का? --- अशा भावनिक हिंदोळ्यांवर झुलत जाणारा शेवट...

काहीशी संथ चाल या सिनेमाची... पण टाॕमच्या पूर्वायुष्यातल्या इटलीमधल्या युद्धादरम्यानचा फ्लॕशबॕक बघण्यासारखा. आपलं पूर्वायुष्यातला रोमँन्स, सहका-याची हत्या आणि वर्तमानातली कौटुंबिक जबाबदारी यांमधली मानसिक घालमेल दाखवणा-या ग्रेगरी पेकचा संयत अभिनय आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढवतोच!.. 😍

No comments:

Post a Comment