"नाईट्स इन रोडॅन्थी"....
-----------
दोन आवडत्या माणसांचा, प्रेमाचा सिनेमा!!
पहिला निकलस स्पार्क्स! एकाहून एक रोमँटिक, लोभवणाऱ्या प्रेमकथा-कादंबऱ्या लिहिणारा जबरदस्त लेखक! हा माणूस अचाट म्हणायचा. आपल्याकडे कोणे एके काळी गुलशन नंदा होते ज्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांवर सिनेमे निघायचे. तसं याच्या वीस कादंबर्यांपैकी तब्ब्ल अकरा कादंबऱ्यांवर नितांतसुंदर रोमँटिक मुव्हीज बनलेत! त्यांपैकीच "नाईट्स इन रोडॅन्थी" हा एक!!..."प्रेमाला वयाचं बंधन नसतं, ते कुठेही होतं, कधीही होतं. किंबहुना ध्यानीमनी नसताना होतं" हे मांडणारी उत्कट प्रेमाची ही कादंबरी आणि त्यावरचा सिनेमा! आपल्याकडे आपण जसं खांडेकरांच्या, वपुंच्या आणि पुलंच्या पुस्तकातली चमकदार वाक्यं टिपून ती एकमेकांना सांगत असतो तशी निकलस स्पार्क्सच्या अनेक कादंबऱ्यांमध्ये शेकडो वाक्यं आहेत. अक्षरशः काळजात घुसणारी. त्यातलीच काही सांगायची तर-
-“Sometimes you have to be apart from people you love, but that doesn’t make you love them any less. Sometimes you love them more"
-“I love you. I am who I am because of you. You are every reason, every hope, and every dream I’ve ever had, and no matter what happens to us in the future, everyday we are together is the greatest day of my life. I will always be yours.”
-“The best love is the kind that awakens the soul and makes us reach for more, that plants a fire in our hearts and brings peace to our minds. And that’s what you’ve given me. That’s what I’d hoped to give you forever”
-“They didn’t agree on much. In fact, they didn’t agree on anything. They fought all the time and challenged each other ever day. But despite their differences, they had one important thing in common. They were crazy about each other.”
-"If we'd never met, I think I would have known that my life wasn't complete. And I would have wandered the world in search of you, even if I didn't know who I was looking for."
-"Loving someone and having them love you back is the most precious thing in the world."
-"Love is love, no matter how old you are, and I knew that if I gave you enough time, you'd come back to me."
-“The greater the love, the greater the tragedy when it’s over.”
तर त्याच्याच "नाईट्स इन रोडॅन्थी" या कादंबरीवर केलेला हा सिनेमा आणि यात डायन लेनबरोबर आहे एव्हरग्रीन लव्हर "रिचर्ड गिअर"!! एक अफाट देखणा माणूस! याचं वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या वयाबरोबर हा आणखींआणखी चिकण्या बनत गेलाय! म्हणजे तो आला "अमेरिकन जिगोलो" आणि "ऍन ऑफिसर अँड जेंटलमन" मधून! तेव्हा एकदम तरणाबांड देखणा होताच. पण मग त्याचं वय वाढत गेलं तसतसे केस थोडे रुपेरी होत गेले आणि तो देखणा दिसत गेला. मग थोडा प्रौढ होताना डोळ्यांच्या कडांना किंचित सुरकुत्या येत गेल्या तर गडी आणखीच देखणा दिसत गेला. मग आणखीन वय वाढलं आणि सर्वच केस ग्रे (रुपेरी/ राखाडी) झाले तर हा आता भलताच देखणा दिसतोय! बायकांनी जीव ओवाळून टाकावा आणि पुरुषांनी हेवा करावा इतका देखणा!! त्याचे सिनेमे ऑल टाइम ग्रेट नसतील, पण त्याच्या असण्याने आणि दिसण्याने एक मस्त फील असायचा सिनेमात आणि मग घुसायचा सिनेमा मनात!
"नाईट्स इन रोडॅन्थी"मध्ये दोन प्रौढ प्रेमिकांची कथा आहे . दोघांची लग्न झालेली आहेत. डॉक्टर पॉल फ्लॅनर (रिचर्ड गिअर) ने संसारापेक्षा डॉक्टरी पेशाला महत्त्व दिल्याने तो मुलापासून दुरावलाय. तशात त्याच्या एका ऑपरेशन दरम्यान एका स्त्रीचा मृत्यू झाल्यामुळे एक प्रकारचं गिल्ट त्याच्या मनात आहे. ऍड्रिअन विलीसचा (डाएन लेन) नवरा दुसऱ्या बाईत गुंतल्यामुळे ती एकटीच आपल्या दोघा मुलांबरोबर आहे. तिच्या नवऱ्याला उपरती झाल्यामुळे तो पुन्हा तिच्याकडे येऊ इच्छितोय पण तिला विचार करायला वेळ हवाय. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलमध्ये येऊन राह्त्ये. ती मैत्रीण दुसरीकडे गेल्याने ऍड्रिअन एकटीच आहे. त्या हॉटेलमध्ये कुणी गिर्हाइकंही उतरलेलं नाही. अत्यंत सुंदर, डोळ्यांचं पारणं फिटेल अशा "रोडॅन्थी"च्या समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात डॉक्टर पॉल राहायला आलाय. त्याच्या ऑपरेशन टेबलवर मरण पावलेल्या बाईचा नवरा रोडॅन्थी गावात राहतोय आणि त्याने पॉलला भेटायला बोलावलंय म्हणून तो या हॉटेलमध्ये उतरलाय. अशा तऱ्हेने ऍड्रिअन आणि पॉल - दोन एकटे प्रौढ जीव आपापली दु:ख विसरायला तिथे आल्येत. ते आपापली तगमग एकमेकांशी शेअर करतात. रात्री तिथे तुफानी समुद्री वादळ येतं जे त्यांना जवळ आणतं.
दोघांमध्ये प्रेम अंकुरतं...फुलतं...एक सुंदर रोमान्स बहरतो. त्यावेळची दृश्य कमालीची सुरेख!! दोघांना एकमेकांशिवाय करमेनासं होतं! पण पॉलला इक्वेडोरमध्ये राहणाऱ्या मुलाकडे जाणं भाग असतं दोघांमधलं नातं सुधारण्यासाठी! रुळावर आणण्यासाठी! त्याला खरं तर ऍड्रिअनला सोडवत नाहीये. तो निघतो...ती त्याला टाटा करायला उतरल्ये....त्यांची एक मिठी...तो वळतो.. कारमध्ये बसतो...ती वळते..पण कार थांबल्याचा आवाज. ती पुन्हा वळून पाहते...पॉल न राहवून पुन्हा धावतच तिच्याजवळ येतो...त्यांची पुन्हा मिठी..घट्ट मिठी...हे प्रेम त्याला सोडवत नाहीये...हा प्रसंग खूपच जेन्युईन आणि सुंदर घेतलाय.
पॉल जातो खरा पण त्यांचा पत्रव्यवहार सुरु होतो.
पॉल पुन्हा भेटायला येण्याचा दिवस ठरलाय. पण तो येतच नाही. त्याचा मुलगा येतो तिला भेटायला आणि पॉल नैसर्गिक आपत्तीमध्ये गेल्याचं सांगतो. ऍड्रिअन उध्वस्त होते.
शेवट काय होतो? ऍड्रिअन सावरते का? काय होतं?
प्रेमकथा ज्यांना आवडतात त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. खूप तीव्रतेनं भेटून ...खूप रोमँटिकली जवळ येऊन एका घट्ट प्रेमबंधनात बांधलं जाणं ... आणि नंतर दूर जाणं.... पत्रांच्या साहाय्याने एकमेकांशी संवाद साधणं --- हे किती क्युट घेतलंय ते हा सिनेमा बघून कळतं! प्रेमाला वयाचं बंधन नाही आणि प्रेम किती गाढ होऊ शकतं त्याचा हा सिनेमा!! मला बाबा आवडला!! तुम्हालाही आवडावा!! 😍
No comments:
Post a Comment