Thursday, 17 June 2021

मीट जाॕन डो

"Meet John Doe"
----------
आपण सगळ्यांनीच अर्नेस्ट हेमिंग्वेची स्पॕनिश वाॕरवरची "फाॕर हूम द बेल टोल्स" कादंबरी वाचलेली असते आणि मग ज्यांच्याकडे TCM चॕनल होता अश्यांनी तो मूव्हीसुद्धा पाहिलेला असतो. फारा वर्षांपूर्वी मी तो मूव्ही माझ्या लाडक्या इंग्रीडसाठी पाहिला होता, पण त्यातला हिरो 'गॕरी कूपर' आवडला होता. त्याचे काऊबाॕय वेस्टर्न्स टाईपचे मूव्हीज बघणं झालं नव्हतं (फक्त आपला फिरोझ खान कुठल्याही रोलमधे (शहरातसुद्धा!) त्याच्यासारखी हॕट घालून स्वतःला इंडियन गॕरी कूपर म्हणवून घ्यायचा ते आठवतंय! ;-) )

काल गॕरी कूपरचा अफ्फलातून मूव्ही पाहिला "मीट जाॕन डो"!! हा त्याचा, दिग्दर्शक फ्रँक काप्राबरोबरचा दुसरा मूव्ही, १९४१ सालचा!! त्याआधी कूपरने काप्राबरोबर "मिस्टर डीड्स गोझ टू टाऊन" केला होता आणि तेव्हाच दोघांचं ट्युनिंग छान जमल्यामुळे, त्याने हा मूव्ही स्क्रीप्टही न वाचताच स्विकारला होता (शिवाय त्याला बार्बरा स्टॕनविकबरोबर काम करायची इच्छा होतीच की!). दिग्दर्शक फ्रँक काप्राने १९३०-४० च्या दोन दशकात धमाल उडवून दिली होती. एक्काहून एक अफाट मूव्हीज -"इट हॕपन्ड वन नाईट, मिस्टर डीड्स गोझ टू टाऊन, मिस्टर स्मिथ गोझ टू वाॕशिंग्टन, इट्स अ वंडरफुल लाईफ वगैरे..आणि त्यातच हा "मीट मिस्टर जाॕन डो!"..

प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवत, सामान्य जनतेच्या सद्सदविवेकबुद्धीला हात घालत, भावनिक आवाहन करत अमेरिकेत सर्वदूर खळबळ उठवून देणा-या हिरोची ही कथा! हिरो हा मुळात साधासुधा बेसबाॕल प्लेयर, परिस्थितीनं गांजलेला पण एका क्षणी नशिबच पालटलेला...

या सिनेमात गॕरी कूपरला झक्कास साथ दिल्ये ती बार्बरा स्टॕनविक, एडवर्ड आर्नल्ड, वाॕल्टर ब्रेन्नन आणि जेम्स ग्लीसनसारख्यांनी! 

सिनेमाला सुरुवात होते तीच एका गंभीर दृश्यानं. "द न्यू बुलेटिन" न्यूजपेपरच्या आॕफिसमधनं धडाध्धड एकेकाला ले-आॕफ मिळतोय. आणि त्यांच्यातच तडफदार रिपोर्टर अॕन मिशेलपण (बार्बरा स्टॕनविक) आहे! घरी दोन लहान बहिणी आणि आईची जबाबदारी म्हणून ती एडिटर काॕनेलच्या (जेम्स ग्लीसन) विनवण्या करत्येय, कमी पगारात काम करायला तयार असल्याचंही सांगत्येय पण तो खडूस बधत नाही उलट वर तिला जाताजाता शेवटची काहीतरी चटकदार, "firework" असलेली एक बातमी करुन द्यायला सांगतो.

संतापानं धुमसणारी अॕन मग एक काल्पनिक बातमी देते छापायला की तिच्याकडे आलेल्या एका पत्रानुसार -"देशातल्या एकूण सामाजिक अन्याय्य परिस्थितीला कंटाळून, गांजलेला, वैतागलेला कुणी एक "जाॕन डो" नामक इसम त्याच्या निषेधार्थ, येत्या क्रिसमसच्या पूर्वसंध्येला सिटी हाॕलच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या करणार"..म्हणून!

झालं! बातमी छापली जाते आणि एकच खळबळ उडते. त्या वर्तमानपत्राच्या प्रतिस्पर्धी असणा-या पेपरला "क्राॕनिकल"ला त्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येतो..आणि ते तसं बोलूनही दाखवतात..मग लोकांमधली चाळवलेली उत्सुकता आणि त्यामुळे "द न्यू बुलेटिन" पेपरचा वाढलेला खप बघून अॕनला परत बोलावलं जातं...ती एक भन्नाट आयडिया सांगते की -"पेपरचा खप चढता ठेवण्यासाठी क्रिसमसपर्यंत "जाॕन डो"विषयी सतत बातम्या द्यायच्या आणि ते पत्र लिहिणारा "जाॕन डो" लोकांसमोर आणायचा!"..मग आॕफिसमधे आपणच 'जाॕन डो' म्हणून सांगणा-या दरिद्री लोकांची रांग लागते त्यातनं बेसबाॕल पिचर जाॕन विलोबीला (गॕरी कूपर) निवडलं जातं. त्याच्याबरोबर त्याचा एकनिष्ठ पार्टनर कर्नल (वाॕल्टर ब्रेन्नन) आहे. पैशांसाठी जाॕन विलोबी "जाॕन डो" बनतो आणि आपल्य मित्राबरोबर कर्नलबरोबर त्याची हाॕटेलमधे चंगळ सुरु होते...

पेपरचा मालक डी.बी.नाॕर्टन (एडवर्ड आर्नल्ड) मग एक चाल खेळतो. अॕनला जास्ती पगार देत "जाॕन डो" साठी भाषण लिहून देऊन, ते त्याला ब्राॕडकास्ट करायला लावण्याचं!!...काय लिहावं या विचारात पडलेल्या अॕनला, तिची आई तिच्या बाबांची डायरी देत -"त्यांनी बघितलेली स्वप्नं...सामान्य माणसाच्या समाधानी आयुष्याविषयी..." वगैरे तेच लिहायला सांगते..दरम्यान न्यू बुलेटिनच्या प्रतिस्पर्धी पेपर "क्राॕनिकल"ने घसघशीत आमिष ठेवलेलं असतं जाॕन डो समोर त्यांनी लिहिलेलं वाचण्यासाठी!..पण  जाॕन अर्थातच अॕनने लिहून दिलेलं वाचतो आणि त्या एका भाषणाने अवघी अमेरिका खडबडून जागी होते!...

हा प्रसंग खूप्पच सुरेख!..गॕरी कूपरने कमाल रंगवलाय!..एक सामान्य बेसबाॕलपटू...हलाखीच्या परिस्थितीतनं आलेला..खायची भ्रांत...आणि अचानक लाईमलाईटमधे आल्यावर त्याचं जनसमुदायासमोर लाईव्ह भाषण...त्याला आलेल टेन्शन...कधी भाषण वाचायची सवयच नसल्यानं आलेलं अवघडलेपण...समोरुन घसघशीत लाच देणारी मंडळी..ती धुत्कारुन अॕनने लिहून दिलेलं वाचताना तिच्या चेहे-यावरचा आनंद बघून सुखावलेलं मन...अनेक संमिश्र भावनांचा कल्लोळ...फारच छान झालाय हा सात मिनिटांच्या भाषणाचा सीन...!

त्या भाषणाने जाॕन डो ची लोकप्रियता शिगेला पोहोचते आणि देशभर "जाॕन डो क्लब" सुरु होऊन सामान्य लोकांमधे "शेजा-यावर प्रेम करा" वाढीला लागतं.

आणि...आता आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पुरी करुन घेण्यासाठी डी.बी.नाॕर्टन एक डाव टाकतो - जाॕन डो च्या प्रचंड लोकप्रियतेचा फायदा उठवत एक महाप्रचंड "जाॕन डो कन्वेन्शन" सभा आयोजित करायची आणि त्यात जाॕन डो ने 'जनतेसाठी काम करणा-या' एका राजकीय पक्षाची घोषणा करायची आणि त्याचा अध्यक्ष म्हणून नाॕर्टनला घोषित करायचं, जेणेकरुन नाॕर्टनला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरता येईल! (अण्णा हजारेंचं दिल्लीतलं आंदोलन आठवलं नं? ;-) )

आपल्या मालकाच्या ह्या कपटी डावामुळे वैतागलेला एडिटर काॕनेल, जाॕनला सगळं सांगतो..जाॕनते ऐकून हादरतो..त्याच्या सद्सदविवेकबुद्धीला ते पटत नाही आणिमग चिडलेला जाॕन, नाॕर्टनने त्याचे प्लॕन्स आखण्यासाठी बोलावलेल्या मिटींगमधे घुसतो आणि नाॕर्टन आणि मंडळींना खडे बोल सुनावतो -

“You sit there back with your big cigars and think of deliberately killing an idea that’s made millions of people a little bit happier...may be the one thing capable of saving this cockeyed world, yet you sit back there on your fat hulks and tell me you’ll kill it if you can’t use it. Well you go ahead and try! You couldn’t do it in a million years with all your radio stations and all your power, because it’s bigger than whether I’m a fake, it’s bigger than your ambitions and it’s bigger than all the bracelets and fur coats in the world. And that’s exactly what I’m going down there to tell those people.”

सगळेच स्तब्ध! जाॕन तावातावाने निघून गेल्यावर नाॕर्टनची लाहीलाही होते..

आणि संतापलेला नाॕर्टन, आपली यंत्रणा कामाला लावून, त्या हजारोंच्या जनसमुदायासमोर जाॕन डो तोतया असल्याचं सिद्ध करतो...'आपल्याला फसवलं गेल्याच्या'- भावनेने त्या भर पावसात सभेसाठी जमलेले हज्जारो लोक जाॕन डो ची छी थू करायला सुरुवात करतात...माईकवरुन आपली बाजू मांडू पाहण्याचा क्षीण प्रयत्न करणा-या जाॕनला कळतंच नाही की आपला आवाज का पोहोचत नाहीये सभेतल्या गर्दीपर्यंत? (कारण नाॕर्टनच्या माणसांनी सर्व वायर्स कापून टाकलेल्या असतात!)...खचलेला, लोकांकडून अचानकपणे मिळणा-या तिरस्काराने उध्वस्त झालेला जाॕन आपल्या दोस्ताबरोबर, कर्नलबरोबर विमनस्क होत्साता भटकतो...लोकांचा आता त्याच्याकडे बघण्याचा बदललेला नजरिया त्याला अस्वस्थ करतोय...

इकडे नाॕर्टनच्या पैशांसाठी काम करणा-या अॕनलाही तिचं मन खातं..साध्यासुध्या सच्च्या जाॕनबद्दल आपल्याला केवळ सहानूभूतीच नाही तर प्रेमही वाटतंय हे तिला जाणवतं...ती त्याला शोधायला बाहेर पडते...

हतबल जाॕन लोकांनी आपल्यावर चिडून ही चळवळ थांबवू नये यासाठी टोकाचा निर्णय घेतो - पेपरातनं जाहीर झाल्यानुसार आपण नावापुरता धारण केलेला "जाॕन डो" खरंचच बनून, क्रिसमसच्या आदल्या रात्री सिटी हाॕलच्या टेरेसवरुन खरोखरच जीव देण्याचा!..

इकडे जाॕनवर पाळत ठेवलेली नाॕर्टन आणि मंडळी त्याच्या मागावर असतात..तेही टेरेसपर्यंत पोहोचलेत..आणि कशीबशी धापा टाकत १४ जिने चढून आलेली अॕनसुद्धा!...

जाॕन टेरेसच्या कठड्यापाशी पोहोचलाय...लोकांचा विश्वास गमावल्यावर जगण्याला तरी काय अर्थ हेच त्याच्या मनात..तो आता उडी घ्यायला कठड्यावर चढणार....??

शेवट काय होतो??

भ्रष्ट धनदांडगे सामान्य लोकांच्या भावनांशी कसे खेळतात यावर भाष्य करणारा हा खिळवून ठेवणारा सिनेमा! 

काप्राने अमेरिकेच्या चार कोप-यांत, चार वेगवेगळे शेवट असलेला हा सिनेमा रिलीज केला होता...लोकांना नक्की कुठला शेवट भावतो ते पाहण्यासाठी...आणि शेवटी एकाने सुचवल्याप्रमाणे एक भलताच पाचवा शेवट शूट करुन हा सव्वा दोन तासांचा उत्कंठावर्धक सिनेमा १९४१ साली रिलीज केला गेला आणि अर्थातच रसिकांनी डोक्यावर घेतला!!

गॕरी कूपर इतकीच बार्बरा स्टॕनविकही आवडून जाईल बघा तुम्हाला! मस्त सिनेमा!!

No comments:

Post a Comment