Thursday, 17 June 2021

पाऊस..!!!

मेमरी...

पावसाच्या काही आठवणी!! 
--------------
लग्नाआधी मी आणि मंजू तस्से भरपूर फिरलो असलो तरी एका खास मित्राकडे जायचं राहिलं होतं. ऐन पावसाळ्याचे दिवस आणि तरीही पक्के मुंबैकर असल्याने आम्ही दोघं छत्री नं घेताच बाहेर पडलो होतो! माझा हा पत्रकार मित्र दिलीप जोशी राहतो विद्याविहार स्टेशनच्या अगदी जवळच्या कॉलनीत! त्याकाळी मोबाईल नव्हते आणि आम्ही फोनबीन न करताच निघालेलो!  विद्याविहार स्टेशनबाहेर पडलो आणि पावसाने गाठलं. पण त्याचं घर तसं जवळ म्हणून नं थांबता आम्ही दोघं तस्सेच निघालो. भिजत...पण पावसाचा जोर वाढला. अक्षरशः ताडताड शेकायला लागले थेंब! पाण्याने निथळतच दिलीपच्या घरी पोचलो तर कळलं की तो जवळच्याच बंगल्यात मित्राकडे गेलाय.आम्ही पत्ता विचारत त्या मित्राच्या बंगल्याकडे..त्या मरणाच्या पावसात रस्त्यावर कुण्णी नव्हतं...दिलीपच्या मित्राच्या बंगल्याची बेल दाबली. दिलीपची ओळख सांगितल्यावर त्याच्या मित्राने प्रसन्न हसून आत बोलावलं. आत गेलो तर तिथे त्यांचे काही मित्र जमलेले आणि काहींच्या बायका. आम्ही फक्त दिलीपला ओळखणारे. पण सर्वानी आमचं मस्त स्वागत केलं आणि बघतो तर काय? तिथे सर्वजण मिळून VCR वर “इजाजत” बघत होते...पहिलाच सीन सुरु होत होता..धुवांधार पावसात रेल्वेच्या वेटिंग रूममध्ये रेखा आणि नसीरची भेट..आणि इथे आम्हीही बाहेर तुफान पावसात चिंब भिजून आलेलो...मग इजाजत चा पाउस बघत, भिजून आलेलों आम्ही स्वतःला वाळवलं. आमचे कपडे वाळवत ठेवून, त्यांनी दिलेले कपडे घालून कडक चहा पीत थंडी पळवत, मग इजाजत एन्जॉय केला त्या छान ग्रुपबरोबर!..लक्षात राहिलाय "इजाजत"..पडद्यावरचा पाऊस..शेवटची माझ्या शशीची प्रसन्न एंट्री...धुवांधार पावसात निथळत गेलेले आम्ही!!

दुसरा प्रसंग असाच कायम लक्षात राहिलेला - ९२-९३ साल! असाच तुफानी पाऊस पडत होता. संध्याकाळची वेळ! ढगांचा प्रचंड गडगडाट सुरु होता. मधेच विजा लक्कन चमकत होत्या. एव्हढ्यात प्रचंड कानठळ्या बसेल असा आवाज करत वीज कडाडली. नव्हे जवळपास कुठेतरी कोसळलीच!!! असाच अर्धाएक तास गेला असेल..आणि अचानक सोसायटीत शिरताना कुणीतरी सांगत आलं की बोरिवली-कांदिवलीच्या मधल्या यार्डात "लेडीज स्पेशल ट्रेन"मधून काहीतरी होऊन, खूप साऱ्या बायका रेल्वे रुळावर पडल्या आणि अंधारात समोरून येणाऱ्या ट्रेनखाली ब-याचजणी कापल्या गेल्यात म्हणून! बापरे!! ते ऐकलं आणि दोनच दिवसांपूर्वी माझं मैत्रिणींशी झालेलं बोलणं आठवलं. लेडीज स्पेशल झाल्य्पास्नं ती नेहेमी ह्याच ट्रेनने यायची..ही राहायची रावळपाड्यला. म्हंजे बोरिवली दहिसरच्या मध्ये. बापरे! ती सुखरूप असेल ना.? ती पडली नसेल ना? ..असे काय काय विचार मनांत यायला लागले...काय करावं सुचेना..तेव्हढ्यात एकजण सांगत आला की सग्गळ्यांना भगवती हॉस्पिटलमध्ये नेलंय...मग मी नं राहवून मंजूला सांगितलं की निदान भगवतीत जाऊन पाहून येतो..पण पावसाचा जोर कमी व्हायची चिह्न नव्हतीच..माझ्याकडे त्यावेळी Kawasaki Bike होती. किक् मारली आणि तसाच भिजत निघालो. भगवतीशी पोचलो तर समोरच राजन चेऊलकर उभा. त्याला विचारलं, “काय परिस्थिती आहे?”..तो म्हणाला, ”तुला बघवणार नाही...” मग त्यानेच सांगितलं की “कांदिवलीहून गाडी निघाली तोपर्यंत मिट्ट काळोख झाला होता..तुफान पाउस आणि तेव्हढ्यात प्रचंड कडाडून वीज कोसळली...त्या ट्रेन मधल्या कित्येकींना वाटलं की ट्रेन वरच वीज पडल्ये..मग एकच हलकल्लोळ!..आणि मग स्वतःच्या बचावासाठी काहीं जणींनी त्या पावसात बाहेर रुळांवर उड्या मारल्या...पण दुर्दैवाने समोरून चर्चगेटकडे जाणारी फास्ट ट्रेन येत होती आणि काहीजणी त्यां ट्रेनखाली कापल्या गेल्या..इथेच आणलाय सर्वांना...काहींची नावं आहेत बोर्डावर. बघ तू.”..ते ऐकून चर्र झालं काळजात! मी थरथरत कसाबसा बोर्डसमोर उभा राहिलो. भिजलेल्या अवस्थेत डोळ्यांवरून ओघळणाऱ्या पाण्यातून ती अक्षर ज्यास्तच अस्पष्ट होत गेली..मितालीचं नाव नव्हतं त्यात...पण आत जाऊन बघण्याची हिम्मत नव्हती माझ्यात...काय करु सुचेना. शेवटी मितालीच्या घरी जाऊन बघायचा निर्णय घेतला...बसडेपोच्या साईडच्या फाटकातून बाईक घातली आणि रूळ क्रॉस करुन बोरिवली ईस्टला आलो...पाऊस वाढतच होता..बाईक तशीच हाणली. डोळे मिचमिचे करून कशीबशी बाईक नॕन्सीकॉलनीच्या बाजूने रावळपाड्यात घातली. भिजत भिजत आशंकेने थरथरत मितालीच्या पाचव्या मजल्यावरच्या घरी गेलो. बेल दाबली. मनात प्रचंड टेन्शन!!..दार उघडलं...ते...ते..मितालीनेच!! पण ती वादळी पावसाची रात्रही लक्षात राहून गेलेली!..

असाच एक भयानक अनुभव घेतला तो ९३-९४ साली! आम्ही तिघा मित्रांनी बायकांबरोबर हिमाचलचा प्रोग्राम आखलेला..सर्व बुकिंग्ज “अनुभव”च्या अरुण भटांकडून करून घेतलेलं. पण आयत्यावेळी दोघाही मित्रांच्या बायकांना काही अडचणी आल्या..आणि त्यांचं कॅन्सल झालं..मी तसाच मनाचा हिय्या करून मंजू आणि दीड वर्षांच्या निकिताला घेऊन निघालो. आधी पश्चिम हिमाचल करून मग पूर्वेकडे जाणार होतो. त्याप्रमाणे डलहौसी, खज्जीयारचा मुक्काम वस्स्सूल झाला! तिथून धर्मशालाकडे निघालो आणि वाटेतच मंजूची तब्येत एकदमच्च बिघडली. लहान दीड वर्षांची निकिता माझ्या कडेवर. एकच क्षण विचार करून पुढचं सगळं कॅन्सल ठरवून लगोलग धरमशालाच्या अर्ध्या रस्त्यावरनं उलटे फिरलो आणि आधी पठाणकोटला आलो..तिथे एक दिवस मुकाम करायचा ठरवला..आणि तिथल्या स्टेशनपासून दूर असलेल्या PTDCच्या हॉटेलवर आलो...तो दिवस आणि रात्र काढून दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या ट्रेनने दिल्ली गाठणार होतो...तो दिवस ठीक गेला. मंजूची तब्येत जरा सुधारली. निकिता माझ्याकडे छान राहत होती...दुसऱ्या दिवशी दुपारी निघायचं होतं...त्या ठिकाणाहून पठाणकोट स्टेशनवर जायला सायकलरिक्षाच फक्त उपलब्ध होती त्या दिवशी!!..आभाळ भरून यायला सुरुवात होत होती..आम्ही काहीसे घाबरूनच पटापट आवरून निघालो..तिथल्या विस्तीर्ण माळरानाच्या एकाकी वाटेवरनं सायकल रिक्षावाल्याने सायकल सुरु केली..आम्ही काही मीटर अंतर पार केलं असेल नसेल..अचानक अंधार दाटून आला आणि गडगडाटी पाऊस सुरु झाला..आमची बसल्या जागी तारांबळ!! कारण छत्री नव्हतीच..आणि त्या सायकलरिक्षावर डोक्यावर हूड पण नव्हतं...मग मंजूने डोक्यावर ओढणी घेतली आणि मी निकिताला घट्ट पोटात लपवून आमच्यावरून त्यातल्या त्यात जाडसर टर्किश टॉवेल घेतला..पावसाचा जोर वाढला...काळोखी आसमंत..भरीत भर विजांचं तांडव!!...जगात दोन गोष्टींना मी प्र-चं-ड घाबरतो त्यां म्हणजे भूकंप आणि अतिप्रचंड कडकडाट करत डोळे दीपवत नागमोडी रेषा उमटवत थेट जमिनीकडे धाव घेणाऱ्या कडकडाटी विजा!!...आणि नेमकं विजांचा तसाच खेळ सुरु झाला होता...एव्हाना त्या सायकल रिक्षावाल्याचे पायही थकायला लागून आमचा स्टेशनकडे जायचा वेग कमी होत होता..अंधारी वाट..आम्ही त्या प्रचंड मोकळ्या विस्तीर्ण माळरानावर एकटेच...माळरान कसलं...विशाल पठारच ते!..नजर पोचेस्तो क्षितीज...आसपास एक्कही घर नाही की बिल्डिंग नाही...नुस्तं काळोखी माळरान...आणि आम्हला जाणवलं की आम्ही जणू एका महाकाय डोमखाली आहोत आणि धीर करून वर त्यां भव्य डोमकडे बघावं तर आम्हाला दरदरून घाम फोडणाऱ्या कडकडाटी विजांचा सैतानी नाच!!..आम्ही घाबरून दातखीळ बसल्यागत गप्प...माझ्या पोटाला बिलगून जेमतेम दीड वर्षाची निकिता चुपचाप...बाजूला मंजू भिजून थरथरत बसलेली...सायकल रिक्षा हिंदकळत चालल्ये...आणि अचानक महाभयानक आवाज करत एक वीज लखलखून कडाडली...दचकून नजर गेली तर आभाळाचा अर्धगोल व्यापून ती वीज आपले अजस्र बाहू पसारून जमिनीला भेटायला नव्हे भेदायला आल्यागत कोसळली कुठेतरी!!...पार डोक्यावरच्या ख-स्वस्तीकापासून ते थेट क्षितिजापर्यंत अर्धा हेमिस्फियर तिच्या त्या आग ओकणारया नागमोडी रेषा सरसरत गेल्याs...मी आयुष्यात इतका कधी टरकलो नसेन...सुदैवाने तो सायकलरिक्षावाला माझ्याइतका फाटू नव्हता...त्याने गुमान मान खाली घालून पॕडल मारणं सुरु ठेवलं होतं...आणि मग असंच बर्राच वेळ गेल्यावर पोचलो आम्ही एकदाचे पठाणकोट रेल्वे स्टेशनवर...आत वेटिंग रूममध्ये गेल्यावर हायसं वाटलं...पण तो तुफानी पाऊस आणि आकाशाचा अर्धगोल व्यापलेली कडकडाटी वीज आठवली तरी अजूनही अंगावर शहारे येतात....

तिसरी आठवण --> खंडाळा म्हटलं की "ड्युक्स नोज"च्या वेगवेगळ्या सिझनमधल्या असंख्य भेटी आठवतात. अर्थात पावसातल्या विशेष. अशीच एक ९०-९१ सालची जुनी आठवण! मी आणि मंजू ऐन श्रावणात मित्रांबरोबर टाटाच्या हॉलिडेहोममध्ये २-३ दिवस ऐश करत होतो. तर त्या दिवशी सकाळी जरा लवकरच स्लुईस-गेट मागे टाकून, हिरव्यागार टेकड्यामधून जाणाऱ्या त्या लालबुंद मातीच्या रोडवरून निघालो. आसमंतात सर्वत्र सुखद गारवा..मखमली हिरवळ..आजूबाजूचे छोटे डोंगर धुक्यात लपलेले...त्या पायवाटेवर अनवाणी चालताना तळव्याला गुदगुल्या करणारं गवत...एका बाजूला गर्द हिरव्या झालेल्या टेकड्या तर दुसऱ्या बाजूला छोटे छोटे बांध घातलेली खाचरं...मधूनच रस्त्यात आडवा येणारा खळाळता ओढा, त्याच्या गारेगार पाण्याचा सुखद स्पर्श. हास्यविनोदाबरोबरच साथीला विजय आणि मंजू असल्याने त्यांच्या गाण्यांचा मझा...ह्या सर्व पार्श्वभूमीवर 'ड्युक्स नोज (नागफणी)'ची चढण कधी सुरु झाली ते कळलंच नाही. अर्धअधिक चढून झाल्यावर त्या नागमोडी पण उभ्या छातीवर येणाऱ्या चढणीपाशी आलो. तिथे एक मोठासा कातळ बघून सगळीजण विसावलो. सभोवतालची सीनरी वेड लावणारी!! दूरपर्यंत धुक्याची दुलई ओढून बसलेले डोंगर...अंगाला झोंबणारा गार वारा...नजर पोचेस्तो सर्वत्र हिरवाईची मुक्त उधळण...आणि आसमंतात एक अद्भुत शांतता...स्तब्ध निसर्ग...मग आम्हीही एक्कही शब्द न बोलता मूकपणे निसर्गाशी तादात्म्य पावलो...धुक्यामुळे पायथ्याचं काहीही दिसत नव्हतं...मात्र खालून एक कातकरी काठी आपटत वर येत होता त्याच्या काठीचा "ठक..ठक..." आवाज त्या शांत वातावरणात एक अनोखी रंगत आणत होता...काही क्षण असेच गेले....निसर्ग स्तब्ध...आम्हीही निःशब्द...काठीची 'ठकठक' हळूहळू वर येताना जाणवत होती...सहजच मी विजयला म्हटलं," विजय "पाउस कधीचा" म्हण ना..."..विजयने लगेच ग्रेसांची "पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने...." सुरु केलं.....विजय तल्लीन होऊन गात होता...आम्ही सारे आणि निसर्ग शांत होऊन ते ऐकत होतो...काठीची "ठकठक.." आणि विजयचा गोड आवाज...ओल्या अंगाला स्पर्शून जाणारा गार वारा...धुकं...असेच आणखीन काही क्षण गेले...विजयचं गाणं संपत आलं....कातकऱ्याच्या काठीची "ठकठक" जवळ येत गेली...विजयचं गाणं संपलं आणि पुढच्याच क्षणी कातकरी आमच्याजवळ पोचून ती "ठकठक" थांबली मात्र!! त्याच क्षणी एकापाठोपाठ एक मोठ्ठाले थेंब अंगावर येत एकाएकी श्रावणसरी सुरु झाल्या..आईशप्पथ!! त्या विलक्षण अनुभूतीने आम्ही त्या कातळावर थिजलोच होतो!!..

आता पाऊस सुरु झालाय...बाहेर आणि आत मनातही!!... ;-)

No comments:

Post a Comment