Thursday, 17 June 2021

द अँडव्हेचर्स आॕफ राॕबिन हूड

आलिव्हिया डि' हॕविलँड गेली! १०४ वर्षांची होऊन गेली!!..तिच्या स्मृतीत ...
---------
ज्या कॅरॅक्टरने मी लहानपणापास्नं खऱ्या अर्थाने 'झपाटलो' गेलो आणि आजतागायत जो माझा आयडॉल आहे तो म्हणजे रॉबिनहूड! नॉटींगमच्या उत्तरेला बार्न्सडेलपर्यंत पसरलेल्या शेरवूडच्या जंगलात घडलेली त्याची दंतकथा!! विजेच्या वेगात बाण काढून तो धनुष्याला लावून, अचूक लक्ष्यावर मारणारा रॉबीन, उर्मट श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करणारा रॉबिन, जंगलात राहून हरणाचं आणि इतर मांस आणि तत्सम पदार्थ खाऊन आपली टोळी बनवून झुडूपात, झाडावर घरं बांधून राहणारे त्याचे सवंगडी मला प्रिय होते आणि आहेत! "लिटल जॉन, मेड मरिअन, फ्रायर टक, विल स्कार्लेट, एलन अ डेल, मच" अश्या आपल्या दिलदार, धाडसी आणि नॉटिङ्गमच्या दुष्ट शेरीफच्या शिपुर्ड्यांबरोबर कधीही दोन हात करायला तय्यार असणाऱ्या आपल्या जिवलग साथीदारांबरोबर शेरवूड आणि बार्न्सडेलच्या दाट जंगलात राहणारा रॉबिन मला भलताच प्रिय होता आणि अजूनही आहे!! त्याच्या स्टोरीवरचे बरेच पिक्चर्स मी बघितलेत. अगदी बीबीसीची सिरियलसुद्धा! पण आजतागायत सर्वात भावला आणि ठसला तो ‘एरॉल फ्लिन’चाच रॉबिन!! डग्लस फ़ेअरबँक्स, जॉन हॉल, शॉन कॉनरी, केव्हिन कोस्नर आणि रसेल क्रोचे रॉबिनसुद्धा मी पाहिले! पण फक्त आणि फक्त एरॉल फ्लिनच्याच रॉबिनमध्ये हवं दंतकथेला साजेस रगेल आणि रंगेलपणाचं परफेक्ट मिश्रण होतं (जसं इयान फ्लेमिंगने जन्म दिलेल्या जेम्स बॉण्डच्या रगेल आणि रंगेल वर्णनात केवळ आणि केवळ शॉन कॉनरीच फिट्ट बसतो! 😜 )

काही वर्षांपूर्वी स्टार टीव्ही (इंग्लिश असताना) त्यावर शॉन कॉनरीच्या मुलाने, जेसन कॉनरीनेसुद्धा रॉबिन साकारला होता. ती ही सिरीयल मस्तच होती! रसेल क्रोच्या सिनेमात रॉबिनहूडला "आउटलॉ" म्हणून घोषित करेपर्यंतची कथा होती. तोसुद्धा मला आवडला. रॉबिनवर कोणीही कितीही पिक्चर्स काढोत! आपण तो प्रत्येक पिक्चर बघायचा आणि त्या जुन्या स्मृतीत हरवून जायचं!.... (जवळजवळ १२-१३ वर्षांपूर्वी कंपनीच्या कामानिमित्तानं मला इंग्लंडच्या इस्ट मिडलंड भागात दीड महिना काढायचा योग आला होता. तेंव्हासुद्धा रॉबीनच्या प्रेमापोटी मी एका रविवारी धावतपळत नॉटीन्गमला जाउन, नॉटीन्गम कासलला भेट दिली होती!! कासलच्या बाजूच्या डेन्स वूड्समधून संध्याकाळच्या गार हवेत फेरफटका मारला होता. तिथल्या जवळच्या "रॉबिन्स डेन"मध्ये २-३ तास घालवले होते. त्या "डेन"च्या पहिल्या मजल्यावर, त्यावेळी रॉबिनच्या शेरवूडमधल्या घरासारख्या- ओंडक्यांनी बनवलेल्या सेटवर - रॉबिनच्या काळातले ड्रेसेस, टोप्या, बेल्ट घालून आपल्याला ड्रिंक्स, कॉफी, ब्रेडऑम्लेट्स वगैरे सर्व्ह करणाऱ्या तरुणतरुणीबरोबर त्या २ तासात, धमाल खाता-पिताना आयुष्यात "काहीतरी विलक्षण" गवसल्याची भावना झाली होती!! (तिथनं सुवनिअर म्हणून आणलेलं फ्रिज मॅग्नेट अजून मिरवतोय आमचा फ्रिज! (फोटो बघा) 😉 .... 

मला आठवतंय मी लहान असताना, आमच्याकडे त्या काळी एक भली मोठी तारांची मोडकी छत्री होती. तर तिच्या तारांपासून मी आणि माझ्या आतेभावानं, धनुष्य आणि बाण  तयार केले होते. सुट्टीच्या दिवशी गिरगावातून आमच्याकडे माटुंग्याला लोकमान्य नगरमध्ये राहायला येणारा माझा आत्तेभाऊ आणि मी मिळून एका भिंतीवर आमचं रॉबिन हुडसारखं धनुर्विद्येतलं कौशल्य आजमावत असू! अर्थात त्या कामी उपयोगी पडायचं ते त्या काळी आमच्याकडे येणारं "सोव्हिएत देश" मासिकाचं कॅलेंडर!! (माझ्या आठवणीत आमच्याकडचे सगळे जनसंघीय असूनही आमच्याकडे ते कम्युनिस्टाचं रशियन मासिक आणि कॅलेंडर का यायचं कुणास ठाऊक??! :-) ) - पण त्या गुळगुळीत कॅलेंडरवर मस्त मस्त फोटो असायचे आणि मी आणि माझा आत्तेभाऊ तासनतास आमच्या धनुर्विद्येचा सराव त्या कॅलेंडरवरच्या लेनिनच्या नाकपुडीत अचूक बाण घुसवून किंवा कुण्या पुतळ्याची टोपी भेदून करत असू!! रॉबिन पुरताच भिनला होता रक्तात तेव्हापासून... 😂

तर सांगायचं म्हणजे रॉबिनहूडच्या दंतकथेवर पार १९०८ सालच्या "रॉबिन हूड अँड हिज मेरी मेन" या मूकपटापासून ते अगदी परवा परवाच्या २०१८च्या, "रॉबिनहूड"पर्यंत तब्ब्ल चाळीसेक सिनेमे येऊन गेलेत आणि मी त्यातले जेमतेम चारपाचच पहिले असले तरी मी छातीठोकपणे सांगू शकतो की १९३८ सालचा "एरॉल फ्लीन" चा "द ऍडव्हेंचर्स ऑफ रॉबिनहूड" हा टेक्निकलर मधला नितांतसुंदर सिनेमा हा सर्वात ऑथेन्टिक आहे आणि तोच रॉबीनच्या कथेवरचा सर्वश्रेष्ठ सिनेमा राहील!!!! काही वर्षांपूर्वी TCM ( टर्नर क्लासिक मुव्हीज) चॅनेल घरी असल्यामुळे त्यावर किमान १०-१२ वेळा मी हा सिनेमा पाहिला होता आणि प्रत्येकी वेळी तितक्याच भक्तीभावानं रॉबीनच्या, त्याच्या सर्व सवंगड्यांच्या आणि मेड मरीयनच्या प्रेमात पडत आलोय!

"भा.रां".च्या कृपेने आपण सर्वांनी बालपणी "रॉबिनहूड आणि त्याचे रंगेल गडी"ची पारायणं नक्कीच केली असणार त्यामुळे सर्वांनाच ष्टोरी एकदम तोंडपाठ असणार म्हणून ती काही सांगत बसायला नको - पण आवर्जून सांगायचं म्हणजे या सिनेमासाठी १९३८ साली वापरलेलं टेक्निकलर मधलं शूटिंग केवळ अद्भुत आहे. तसे रंग आजही बघायला मिळत नाहीत! रॉबिन असता तर असाच दिसला असता असं म्हणावं इतका पर्फेक्ट एरॉल फ्लीनचा रॉबिन  म्हणजे आणि मेड मरियन म्हणून त्यावेळची लावण्यवती ऑलिव्हीया डी हॅविलँड!! क्काय पेअर दिसल्ये दोघांची!! अफलातून!! मायकेल कर्टीझचं डोकेबाज दिग्दर्शन असलेला हा जवळजवळ दोन तासांचा अद्वितीय सिनेमा! बघाच्च आणि मुलांनाही दाखवा!! 😊

No comments:

Post a Comment