-------------------------
कलेच्या प्रांतात साधारणपणे १४ व्या ते १८व्या शतकामध्ये झालेल्या प्रबोधनाच्या क्रांतीनंतर (रेनेसाँ), गेल्या दोन शतकांत जे प्रमुख प्रवाह (इझम) आले आणि गाजले, त्यातले माझ्यासारख्या सामान्याला ऐकिवात असणारे आणि थोड्याफार माहितीतले म्हणजे पोस्ट इम्प्रेशनीझम (ब्रशचे छोटे स्ट्रोक्स आणि ब्राईट रंगसंगती / व्हॅन गॉफ्ग), क्युबिझम ( मानवी शरीराचे भाग, वाद्यं, बाटल्यांसारख्या वस्तू वगैरे/पाब्लो पिकासो), फ्युचरीझम (वेग आणि हालचाल दर्शवणारं मानवी शरीर, मशिन्स वगैरे) आणि अर्थातच सर्रिऍलिझम (रोजच्या जीवनातल्या घटना आणि फँटसी, स्वप्नांचा मिलाफ/साल्व्हादॉर दाली)!! आणि त्याच काळात अर्नेस्ट हेमिंग्वे, स्कॉट फिट्झजेराल्ड, गर्टर्यूड स्टाईन, व्हर्जिनिया वूल्फ, जेम्स जॉईस, ऑस्कर वाईल्डसारखे अफलातून साहित्यिक या सर्वांमुळे तो काळ विलक्षण मंतरलेला होता. विशेषतः "युरोपमध्ये त्याकाळात ज्यांना जगायला मिळालं असेल आणि 'याची देही याची डोळा' ते सर्व अद्भुत आविष्कार पाहायला मिळाले असतील, ते किती भाग्यवान?" असं वाटून जातं! आणि मग ते सर्व जुनं आठवून पाहताना येणारा नॉस्टेल्जीयाचा फील किती भारी असेल नै?
मी स्वतः नॉस्टॅलजियात रमणारा! जुन्या काळातले सिनेमे, ती ग्रेट माणसं, आणि त्या काळाविषयी वाचून, ऐकून एक विलक्षण ओढ वाटत असते. तो "गुजरा हुआ जमाना आणि त्यावेळची माणसं" इतकी भावत असतात की प्रसंगी मी हळहळतो की जेव्हा आपल्याकडच्याही अशाच सगळ्या दिग्गज कवी, शायर, गायक, संगीतकार, लेखक, साहित्यिक, चित्रपट कलाकार, दिग्दर्शक अशा साऱ्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार जगासमोर प्रकट होत होता तेव्हा मी कुठे होतो म्हणून?!! मी हळहळतो त्या १९४०-७० मधल्या त्या ३० वर्षांचा प्रत्यक्ष साक्षीदार का नाही होऊ शकलो जेव्हा मराठीच नव्हे तर हिंदी, बंगाली.. किंबहुना बहुतेक भाषांमधली रंगभूमी, साहित्यक्षेत्र, संगीतक्षेत्र, चित्रपटक्षेत्र, कलाक्षेत्र समृद्धतेच्या शिखरावर होतं! मराठी हिंदीतले सगळी आवडती माणसं - राजाभाऊ परांजपे, शांताराम, बाबूजी, गदिमा, तीनही वसंत, पुलं, दळवी, अत्रे, गाडगीळ, भावे, तांबे, विंदा, बापट, पाडगावकर, मर्ढेकर, खानोलकर, शांताबाई, हिंदीमध्ये लता, रफीसाब, अशा, किशोर, हेमन्तदा, मुकेश, तलत, सुमन, साहिर,शैलेंद्र, शकील, हसरत, राजेंद्रकृष्ण, कैफी, गुरुदत्त, बिमल रॉय, राज कपूर, असित सेन, चक्रवर्ती, सलीलदा, सचिनदादा, मदनमोहन, अण्णा, एसजे, ओपी त्यांच्या अफलातून आणि अचाट कलाकृतींमधून धुमाकूळ घालत होते तो काळ त्यांच्या निकट सान्निध्यात किंवा समोरून बघायला नाही मिळाला याची रुखरुख आहेच!
एक प्रकाराची आत्मीयता असते त्या नॉस्टॅलजियाची! तर नेमकं तसंच काहीसं होतं ‘मिडनाइट इन पॅरिस’ या सिनेमाच्या हिरोच्या बाबतीत! या फिल्मचा हिरो हॉलिवूडचा धडपड्या पटकथाकार गिल पेंडर्स! त्याला कायम आकर्षण वाटत असतं, ते शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९२०च्या दशकाचं! आणि त्याची १९२०च्या दशकात जगण्याची स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतरतात याची अत्यंत मनोरंजक आणि रोमँटिक कथा "मिडनाईट इन पॅरिस" मधून आपल्या हातखंडा धमाल स्टाइलमध्ये मांडल्ये लेखक, दिग्दर्शक वूडी अॅलने!
त्याचा हा सिनेमा त्याच्या नेहमीच्या चाकोरीपेक्षा वेगळा ठरला तो त्याच्या अफलातून ट्रीटमेंटमुळे! याची कथा काहीशी नव्वदच्या दशकात ‘बीबीसी’वर दाखवल्या गेलेल्या ‘गुडनाइट स्वीटहार्ट’ नावाच्या सीरिजवरून प्रेरणा घेतलेली. त्या सीरिजमधला गॅरी स्पॅरो हा नव्वदच्या दशकातला टीव्ही रिपेअरमन एका टाइम-पोर्टलमुळे उलटा कालप्रवास करून दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या लंडनमध्ये जातो आणि कायकाय गंमती घडतात ते त्यात दाखवलं होतं – वूडी अॅलनने कालप्रवासाची ही कल्पना वापरताना आपलं सुपीक डोकं चालवून अशी काही भन्नाट पटकथा तयार केली, की ते पाहताना आपण त्या कथानायकाच्या नॉस्टॅल्जियाचाच एक भाग होऊन जातो!
सिनेमा सुरू होतो तो सिडनी बश्येच्या सॅक्सोफोनच्या जादुई जॅझ ट्यूनच्या साथीनं पॅरिस शहरातल्या एकामागोमाग एक उलगडणाऱ्या अप्रतिम देखाव्यांनी! पॅरिसच्या वेगवेगळ्या भागातली ती दृश्य आपण डोळ्यांत साठवेपर्यंत टायटल्स सुरू होतात ती गिल आणि इनेझच्या संवादांच्या पार्श्वभूमीवर! गिल पेंडर्स (ओवेन विल्सन) हा आपली प्रेयसी इनेझबरोबर (रॅशेल मॅकअॅडम्स) बागेत फिरतोय. तो पॅरिसच्या अशक्य प्रेमात आहे. "हाच माहौल पावसाच्या वर्षावात कसला रोमँटिक असेल आणि १९२० सालचं पॅरिस तर कित्ती सुंदर असेल" हे त्याचं म्हणणं इनेझला बिलकुलच पटत नाहीये. तो भयंकर स्वप्नाळू, तर ती अगदीच प्रॅक्टिकल! तो प्रचंड भारला गेलाय पॅरिसच्या सौंदर्याने. त्याचे आवडते सर्वच लेखक आणि संगीतकार, गायक हे १९२०च्या दशकात पॅरिसमध्ये राहिले होते, त्याविषयी वाचलेलं सर्व त्याला आठवतंय आणि त्यात हरवून जात, त्या जादुई वातावरणात राहण्यासाठी तो त्याच्या हॉलिवूडच्या स्क्रिप्ट रायटिंगच्या जॉबला लाथ मारून आणि तिथल्या घराचा त्याग करून अगदी एका सेकंदात इथे कायमचा राहायला एका पायावर तयार असल्याचं तिला सांगतोय... पण इनेझला न्यूयॉर्क सोडून जाण्याची कल्पनाच सहन न होणारी! लग्नानंतर पॅरिसला कायमचं शिफ्ट होण्याची गिलची कल्पना ती सपशेल धुडकावून लावते. दोघांचे काहीसे खटकेही उडतात. दरम्यान पॉल बेट्स (मायकेल शीन) आपल्या प्रेयसीला कॅरोलला (नीना अरिआन्दा) घेऊन तिथे येतो. आपल्या या जुन्या इन्टलेक्च्युअल मित्राला अचानक तिथे आलेला पाहून इनेझ भलतीच खूश होते. पॉल त्या दोघांना डान्सला चलण्याविषयी आग्रह करतो. गिलला पॅरिसच्या रस्त्यावरून चालण्याचा आनंद घ्यायचाय आणि पॉलची कटकटही नकोच आहे. त्यामुळे इनेझला, पॉल आणि कॅरोलबरोबर सोडून तो एकटाच पॅरिसच्या अनोळखी गल्लीबोळांतून फिरत जातो आणि रस्ता चुकतो. एव्हांना रात्र झालीय. एका आडगल्लीतल्या एका चर्चच्या पायरीवर तो बसलाय. काय करावं याचा विचार करत. तेवढ्यात जवळच्या क्लॉकटॉवरमध्ये रात्रीचे बाराचे ठोके पडतात आणि त्या आडगल्लीच्या दुसऱ्या टोकाकडून त्या निर्जन बोळामध्ये एक व्हिंटेज प्युजो कार येताना दिसते. ती कार येऊन बरोबर त्याच्यासमोरच थांबते आणि दरवाजा उघडून आतली मंडळी त्याला हाक मारतात. त्याला वाटतं चुकून त्याला दुसराच कुणी समजून ते बोलावतायत; पण ते त्यालाच आग्रह करतात पार्टीला चलण्याचा! तो आत शिरून त्यांच्यात बसतो. कार निघते आणि सुरू होतो एक अद्भुत चमत्कारिक सिलसिला...
कारमधल्या मंडळींबरोबर तो एका क्लबमध्ये शिरतो. क्लबच्या एका कोपऱ्यातून कुणीतरी त्याच्या ओळखीचं जुनं गाणं ‘लेट्स डू इट..लेट्स फॉल इन लव्ह’ पियानोवर म्हणतोय! त्याला ते सूर ओळखीचे वाटतात. पार्टीत त्याच्यासमोर आलेली अमेरिकन तरुणी त्याची चौकशी करते. स्वतःची ओळख ‘झेल्डा’ अशी करून देते आणि गिल लेखक आहे ऐकल्यावर आपल्या पार्टनरला हाक मारून जवळ बोलावते. तो आपली ओळख ‘स्कॉट फित्झेराल्ड’ अशी करून देतो. त्या दोघांची नावं पूर्वीच्याच प्रसिद्ध लेखक पती-पत्नींची असल्याचा योगायोग गिलला विशेष वाटतो. दरम्यान ते पियानोवर वाजणारं गाणं आणि ती चाल, ते सूर कधीतरी ऐकलेत हे जाणवून गिल हैराण आहे... ‘मी कुठे आलोय?’ तो त्यांना विचारतो. ‘जां कॉक्तूसाठी पार्टी आहे ही!’स्कॉटचे ते उद्गार त्याला दचकवतात. काहीतरी विचित्र घडतंय अशी जाणीव होतेय त्याला हळूहळू.... दरम्यान ते पती-पत्नी त्याची मनःस्थिती ठीक करण्यासाठी ती पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत जाऊ म्हणत त्याला खेचून नेतात, तर तिथे गिल पाहतो जोसेफाइन बेकर या एके काळच्या प्रसिद्ध डान्सरला... तिथून निघून फित्झेराल्ड पती-पत्नी त्याला नेतात आणखी एका क्लबमध्ये. आणि तिथे स्कॉट गिलची ओळख करून देतो अर्नेस्ट हेमिंग्वेशी!!! आता तर गिल पडायच्या बेतात. हे सगळं काय चाललंय?... हेमिंग्वेचा मोठा फॅन असलेला गिल बोलता बोलता त्याला आपलं पुस्तक वाचण्याची विनंती करतो. पण हेमिंग्वे त्याला सांगतो, की त्याच्या कादंबरीचं बाड त्याने गर्त्र्युड स्टाइनला दाखवावं, त्याच्या मते ती नक्कीच चांगलं मार्गदर्शन करेल गिलला! हर्षभरीत झालेला गिल ‘मी आलोच माझं हस्तलिखित घेऊन’ म्हणत तिथून पळतच बाहेर पडतो.... प्रचंड खूश होऊन तो स्वतःशीच बडबडत निघालाय हॉटेलकडे.... ‘हे जे काही चाललंय ते विलक्षण आहे... कोण कोण भेटलेत मघापर्यंत? फित्झेराल्ड्स, हेमिंग्वे, पापा... अरे हो, पण मी कुठे भेटू शकतो हे हेमिंग्वेला विचारायचं राहिलंच की..’ पुटपुटत तो पुन्हा उलटा वळून त्या क्लबपाशी येतो....तर....तर काय?....त्या रस्त्यावरून तो क्लब गायबच झालेला असतो.. तिकडे २०१० सालचं नवीनच दुकान उभं असतं... गिल वेडा!... तो पुनःपुन्हा ती बिल्डिंग आणि तिथली शॉप्स शोधतोय; पण त्या क्लबचा नामोनिशाणा नाहीये कुठे... गोंधळलेला गिल हॉटेलवर परत आलाय... इनेझला तो त्याने अनुभवलेले विलक्षण क्षण आणि फित्झेराल्ड, हेमिंग्वे, कोल पोर्टरविषयी सांगू पाहतो; पण ती अर्थातच त्याच्या मनाचे सारे खेळ म्हणून त्याला उडवून लावते...
दुसऱ्या दिवशी "एक अफलातून सरप्राइज देतो" असं सांगत तो तिला कसंबसं आपल्याबरोबर यायला तयार करून त्या आदल्या रात्रीच्या बोळात शिरतो आणि त्याच पायऱ्यांशी येतो... इनेझची टकळी चालू होते... "कशाला आणलंयस या बोळात? ..आणि ते हस्तलिखिताचं बाड बरोबर घेऊन का फिरतोयस?" वगैरे... गिल बिचारा तिला "तू थांब..थोडी थांब...आणि मग बघ...तू वेडी होणारेस आश्चर्याने.. तू म्हणत होतीस ना, की मी जरा वेगळाच का वागतोय दिवसभर वगैरे...मग बघच आता.. तुझं तुलाच कळून जाईल..." वगैरे सांगत राहतो... पण काही मिनिटांतच ती कंटाळते... आणि गिलला तिथेच सोडून कॅब करून निघूनही जाते.... गिल बिचारा "काय चुकलं माझं?" म्हणत असतानाच रात्रीचे बारा वाजतात...टोले थांबताना बोळाच्या टोकाकडून आदल्या रात्री त्याला घेऊन गेलेली व्हिंटेज कार पुन्हा येते... या वेळी कारमध्ये अर्नेस्ट हेमिंग्वे स्वतः असतो!... गिलला घेऊन तो गर्त्र्युड स्टाइनच्या घरी जातो. तिथे गिलला आणखी एक मोठा धक्का मिळतो, जेव्हा त्याची ओळख तिथे असणाऱ्या पाब्लो पिकासोशी आणि त्याची मैत्रीण एड्रिआनाशी होते.... तिच्या अप्रतिम लावण्याने गिल भारून जातो... पिकासोने तिचं एक चित्रं काढलेलं असतं, ज्यावर तिथे बरीच चर्चा घडते.... इथून पुढे कथेला एक वेगळंच वळण मिळतं...
गिल कळत नकळत एड्रिआनाकडे आकर्षित होतो... आणि मग त्याच्या पुढल्या रात्रीच्या व्हिंटेज कारमधून त्याच्या आवडीच्या १९२०च्या दशकातल्या काळातल्या भेटी, एड्रिआनाबरोबरच व्हायला लागतात. आणि त्याचा परिणाम त्याच्या २०१० सालातल्या दिवसाच्या नॉर्मल रुटीनवर व्हायला लागतो. गिलला आपलं हे दोन-दोन काळात राहणं कठीण व्हायला लागतं आणि तो, पुढच्या भेटीत साल्व्हादोर दाली, मॅन रे आणि लुइस ब्युनेलसारख्या सर्रिअलिस्ट चळवळीच्या कलावंत मंडळींना ते सांगतो; पण आश्चर्य म्हणजे त्यांना त्याचं भविष्यकाळातून त्यांच्या काळात असं कालप्रवास करत येणं अगदीच पटतं आणि परफेक्टली नॉर्मलसुद्धा वाटतं.
एव्हाना रूटीन झालेला त्याचा रात्रीचा कालप्रवास चालूच! एड्रिआनाशी प्रेमभरली गोड जवळीक! ती दोघं बोलत असताना एक बग्गी येते आणि त्यांना घेऊन जाते थेट ३० वर्षं आधीच्या १८९०च्या काळात जो काळ एड्रिआनाला आवडत असतो!.... तो माहौल बघून भारावलेली एड्रिआना उत्साहाने सांगते, ‘आपण पुन्हा १९२०च्या काळात न जाता इथेच राहू या. हेच खरं सुवर्णयुग आहे!’... गिलला आता मात्र तिला खरं काय ते सांगणं भाग पडतं. जशी ती कालप्रवास करून तिच्या आवडीच्या १८९०मध्ये आलीय, तसाच तोसुद्धा २०१० मधून १९२०मध्ये आल्याचं तो सांगतो. आणि आपापल्या आवडीच्या काळात राहण्यावरून दोघांमध्ये मतभिन्नता.... आणि त्याला साक्षात्कार होतो, की माणूस हा कायमच असंतुष्ट असतो...
माणूस कुठल्याही काळत असला, तरी त्याला त्याच्या आधीचा काळ सुवर्णयुग वाटत असतो आणि त्या जुन्या काळात असावंसं वाटतं आणि तो जेव्हा त्या काळात जातो तेव्हा त्याच्याही आधीच्या काळाची मोहिनी वाटत राहते.. थोडक्यात आयुष्यात आपण कधीच समाधानी नसतो आणि त्यामुळे हे असं घडत राहतं......(कदाचित वर्तमानातल्या समस्यांपासून काढलेली ती पळवाट?)....
हे असं आधीच्या काळासाठी झुरणं चांगलं नाही हे गिलला पटलंय...गिल आणि इनेझ हॉटेलात! त्याला पॅरिस सोडायचं नाहीये आणि तिला अमेरिका सोडायची नाहीये. मतभेद टोकाला जातायत... अखेर ब्रेकअपचा निर्णय!.... ती आई-वडिलांबरोबर निघून जाते...गिल निवांत....पॅरिस एन्जॉय करत फिरतोय.... रात्र होत आलीय..... कुठून तरी घड्याळाचे टोले पडतायत... तो विचारमग्न उभा... नदीकिनारी... दूरवर प्रकाशात झळाळणारा आयफेल टॉवर... अचानक ‘ए...हाय..’ ..हाक ऐकून तो वळतो... अँटिक शॉपवाली गॅब्रिएला समोर उभी. पॅरिसला कायमचा राहण्याचा आपला डिसिजन तो तिला सांगतो... दोघं बोलत निघतात. अचानक पाऊस सुरू होतो....
‘पावसाला सुरुवात होतेय...’
‘पण मला आवडतो पाऊस’
‘पावसातच पॅरिस खरं सुंदर दिसतं’
‘खरंय...’
‘बाय द वे मी गॅब्रिएला’..
‘मी गिल..’
‘नाइस टू मीट यू ..’
आणि दोघं त्या पावसातल्या रात्री भिजत निघालेत...त्यांच्यात खूप मोकळेपणा..!!
हा "मिडनाइट इन पॅरिस" चुकवू नये असाच!
No comments:
Post a Comment