सिगारेट आणि बॕरीटोन व्हाॕईस?
--------------
पह्यलेछूट सांगतो - 'सिगारेट पिणं/ ओढणं' वाईटच्च! त्याने शरीराला घंटा काही फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं हे अगदीच मान्य!!!!
पण तरी- आज मीसुद्धा तरुणपणात केलेला सिगारेट पिण्याचा मूर्खपणा आठवला आणि तोही 'आवाजातल्या खर्जाच्या संदर्भा'तल्या गप्पा निघाल्या त्यावरुन --
एका ठराविक वयात बहुतेक सगळ्याच मुलांचे आवाज फुटतात...पण कालांतराने आपली एक ओळख, पेहचान असणारा आपल्या आवाजाचा एक 'टिंबर' ज्यालात्याला मिळतो, तसाच मलाही मिळाला होता...पण विशीत प्रवेश केल्यावर उगाचच असं डोस्क्यात शिरलं की बॕरीटोन व्हाॕईस, आवाजात एक दमदारपणा किंबहूना एक खर्ज मिळवण्यासाठी सिगारेट प्यायला हवी! ..त्याआधी मित्रांच्या आग्रहाने कधीतरी सिगारेट पिणं (ओढणं!) झालं होतं..पण ते गंमत म्हणून!..त्याकाळात जनरली विल्स नेव्ही कट, फोर स्क्वेअर असे ब्रँन्ड्स पाॕप्युलर असायचे...चार्म्स, पनामा, कॕप्स्टन पिणारी माणसं वेगळी असायची...आणि स्टार अँण्ड स्टाईलसारख्या फिल्मी मॕगझिन्समधे ब्रिस्टाॕल आणि बार्कलेच्या जाहिरातीत राजेश खन्ना, संजीवकुमार झळकलेले पाहिले होते... पण पडद्यावरचे हिरो सिगारेट पितात म्हणून आपण प्यायला हवी इतका भाबडा बुद्दुपणा अंगात आला नव्हता...तसं तर माझ्या जन्माच्या वीसेक वर्षं आधीपास्नं, दादामुनी तर प्रत्येक सिनेमाच्या बहुतेक सीन्समधे, भुमिकेनुसार हातात सिगारेट किंवा चिरुटाशिवाय पडद्यावर दिसतच नसत!..मला वाटतं दादामुनींना अॕक्टींग करताना हाताचं काय करायचं हा प्राॕब्लेम असावा आणि तो त्यांनी सिगारेट धरुन कायमचा सोडवला होता! ;-) ) ..पण सिगारेट पडद्यावर स्टाईलमधे प्यावी तर प्राणसाबनीच!! एकेक भन्नाट स्टाईल..बिडी असो, सिगारेट असो, सिगार असो, पाईप (चिरुट) असो वा हुक्का!..प्राणसाबची एक्केक अदा खास असायची!...तसं मला क्लिंट ईस्टवूड आणि त्याची ओठाच्या कडेला घोळवत ठेवण्याची स्टाईल आवडायची..पण तशी स्टाईल मारायची तर डोक्यावर तिरकी हॕट आणि बसायला घोडा असला तर मजा..आणि ते बोरिवलीतच काय पण जुहू बीचवरही जमणं कठीण होतं त्याकाळी.. 😆
पण मला सिगारेट प्यावीशी वाटली ती मात्र नाटकातले काही कलावंत पाहून...पहिलं म्हणजे आमचे सोसायटीत राहणारे आमचे नाट्यगुरु आणि मतकरी ग्रुपचे मोठे कलावंत वसंतभाऊ सोमण ह्यांना कायम सिगारेट हातात धरलेलेच पाह्यलं लहानपणापास्नं! त्यांचा आवाजही खास होता...आणि मग विनय आपटे, रमेश भाटकरसारख्या दमदार, भारदस्त आवाजाच्या अभिनेत्यांनाही सिगारेट पिताना पाहून माझ्या डोस्क्यात अस्सा किडा वळवळला की बहुदा "सिगारेट पिणा-यांचा आवाज दमदार, खर्जातला होतोच" म्हणून! 😳🤔
मग मीसुद्धा सिगारेट प्यायला सुरुवात केली! सुरुवातीला 'विल्स'...मग 'फोर स्क्वेअर' करत करत...'गोल्डफ्लेक हनीड्यू किंग्ज' वर सेटल झालो!..तब्येतीत खिशात त्यावेळी स्वस्तात मिळणारा ट्रान्स्परंट पिवळ्या, निळ्या, हिरव्या, लाल रंगात मिळणारा लायटर बाळगायला लागलो!..अर्थात घरी मात्र कळू न देता...कारण आई बोरिवलीच्या शाळेत शिक्षिका तर वडिल अंधेरीच्या परारांजपेचे प्रिन्सिपाॕल. त्यांना आपला हा गद्धेपंचविशीतला गधडा सिगारेट प्यायला शिकलाय हे कळून कल्चरल शाॕक नव्हता द्यायचा की त्यांचा अपमान नव्हता करायचा मला!..सिगारेट प्यायला सरावलो तरी खिशात पाकीट बाळगण्याइतका अट्टल झालो नव्हतो आणि कुठल्याश्या सिनेमात प्राणसाब जशी एकामागोमाग एक धुराची सर्कल्स हवेत सोडत ती मोठी होत जाताना त्यांच्या आरपार एक धुराची रेषा सोडतात, ती ट्रिक मात्र जमत नव्हती! (प्रॕक्टिस करण्याइतक्या सिगारेट्स पीत नसल्यामुळे कदाचित! ;-) )
वयाच्या बाविशीत एका एकांकिकेत मंजू भेटली...मग २४व्या वर्षीच मंजूबरोबर बालविवाह करण्याआधी, आम्ही एकत्रा तीन एकांकिका केल्या आणि त्यांपैकी "फुलपाखरु"मधे घटस्फोट होऊ घातलेल्या जोडप्याच्या भूमिकेत मी आणि मंजू,. त्यात त्या नव-याची अस्वस्थ, विमनस्क अवस्था दाखवायला एकांकिकाभर मी सारखा सिगारेट पितो असं होतं...मं काय..रिहर्सलदरम्यान सुटलोच्च होतो...(मंजूलाही मी सिगारेट पिऊन धूर सोडायचो त्या धूराचा वास आवडायचा चक्क! मं तर काय विचारता....?!!)
पण हळुहळू भ्रमनिरास होत गेला...आय मीन सिगारेटचं पुढचं टोक जरी पेटलेलं असलं तरी तोंडातल्या सिगारेटच्या मागच्या फिल्टर्ड-टिपच्या टोकाच्या भागातनं घशात शिरणारा धूर काही गरम, उष्ण भाजणारा नसतो- "जेणेकरुन घसा भाजून निघून, धूराने शेकून, तिथले स्वरतंतू विशिष्ट प्रकारे फाॕर्म होऊन, आवाजात कायमस्वरुपी खर्ज येईल" - ही माझी भाबडी समजूत फोल ठरत गेली ..
आणि मग केवळ "बॕरीटोन व्हाॕईस/ आवाजात दमदार खर्ज हवा ह्या उदात्त हेतुनं मी सिगारेट प्यायचो"- तो हेतूच संपला!...तरीही पुढची काही वर्षं मित्रांबरोबरच्या मैफलीत..आणि कंपन्यांच्या ड्रिंक्स पार्ट्यांमधे..विशेषतः तीन वर्ष मार्केटींग डिपार्टमेंटमधे काढली तेव्हा सगळ्या सेल्स इंजिनियर्सच्या पार्ट्यांमधे ..सिगारेट पिणं होत राहिलं...(मार्केटिंग/ सेल्स इंजिनियर्सचं व्यवच्छेदक लक्षण असतं ते हातात सिगारेट, व्हिस्कीचा ग्लास! (आणि ज्या शहरात असाल तिथे जेवताना डाल फ्राय आणि तंदूरी रोटी! ;-) )...पुढे तेही कमी होत गेलं...
नंतरनंतर फक्त काही खास मित्र भेटायला आले की मग त्यांच्याबरोबर, त्यांना गप्पांच्या दरम्यान (चहा किंवा व्हिस्की जे काय असेल) तेव्हा कंपनी देण्यासाठी इतकीच सिगारेट हातात धरणं उरलं...
कारण एक नक्कीच डोस्क्यात घुसलं - त्या 'कश'मधे मला कशीश वाटेनाशी झाली..त्या 'दम' मधे दम नाही - हे स्वच्छ पटलं!!...आजकालतर मुलांच्याबरोबरीनं गल्लीबोळात किंवा कंपनीच्या पार्ट्यांमधे मुली सिगारेट्स पिताना बघून त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते..अत्यंत उथळ, पुचाट प्रकार आणि बिल्कूलच न शोभणारा!..(म्हणजे मुलं जशी "मुलींसारखी स्टाईल" मारायला कानात डूल घालून डुलेश बनतात ते जितकं हास्यास्पद, तसंच "मुलांसारखं स्टाईल" मारायला मुलींचं हातात सिगारेट धरणंही हास्यास्पद!)
आणि आतातर मी -"दहा रुपयाच्या दहा सिगारेट्स पिण्यापेक्षा शंभर रुपयाचं एक डार्क चाॕकलेट खाणं जास्त आनंददायी आणि हेल्दी"- असंच इतरांना सांगत असतो!! सिगारेट पिणं हा शुद्ध मूर्खपणा आहे त्यापेक्षा रोज दहा सिगारेट्स (एक पाकीट) पिणा-यांनी सात दिवस सिगारेट्स न पिता आठवड्याच्या शेवटी सात दिवसांत वाचवलेल्या ७०० रुपयांची दर रविवारी पुस्तकं विकत घ्यावीत असंच मी सुचवेन!!
बाकी "बॕरीटोन व्हाॕईस न झाल्यानं" फार टोकाचं काही गंडलं नाही म्हणा आयुष्य!!!!! 😄😍😍
No comments:
Post a Comment