Saturday, 19 June 2021

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (भाग 1)

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (1)
---------------
मी शिकलो मातृभाषेतून...त्यामुळे खरं तर १९६०-७०च्या दशकांत इंग्लिशमधल्या उत्तमोत्तम वाङ्मयाशी ओळख होण्याची शक्यता तशी कमी असणार होती; पण त्याच सुमाराला "भा.रा"नीं प्रचंड आणि अतोनात उपकार केले आम्हां बालकांवर, एकाहून एक ग्रेट इंग्लिश कादंबऱ्या त्यांच्या अत्यंत खेळकर, खुमासदार मराठीत आणून आणि आमचं आयुष्य समृद्ध करून टाकल!!!! एकीकडे रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन, आर्थर कॉनन डॉयल, हॉवर्ड पाईल, अलेक्झांड्र डयूमासारख्यांच्या कादंबऱ्यांचे सरस अनुवाद करत असतानाच "भारा"नीं ज्यूल्स व्हर्नच्या बहुतेक सगळ्याच फेमस, अफलातून आणि माईंड-बॉगलिंग नॉव्हेल्सचे धमाल अनुवाद आमच्यासमोर आणून आम्हाला खुश करून टाकलं होतं! ज्यूल्स व्हर्नची कल्पनाशक्ती अचाट दांडगी आणि सर्वसंचारी होती! त्याने समुद्रतळातल्या आणि पृथ्वीच्या पोटातल्या विश्वापासून ते पार धूमकेतूच्या शेपटावर स्वार होऊन केलेल्या प्रवासाच्या आणि थेट चंद्र-सूर्यावरच्या स्वाऱ्यांच्या गोष्टी लिहिल्या. "भा.रां"नी त्याचे फक्कड मराठी अनुवाद करून त्यांना आमच्या बालपणीच्या भावविश्वात अमरत्व दिलं होतं!!

बालपणातली आणखी एक आठवण म्हणजे सर्वात पहिल्यांदा अपोलो-११मधून चंद्रावर उतरलेल्या कमांडर नील आर्मस्ट्राँग, बझ अल्ड्रीन आणि कमांड मोड्युलमधल्या मायकेल कॉलिन्सला प्रत्यक्ष पाहिल्याची!! त्यावेळी मी माटुंगा रोडच्या लोकमान्य नगरमध्ये राहायचो! ते तिघेही चांद्रवीर मुंबईत आले होते. ऑक्टोबर १९६९!! लेडी जमशेदजी रोडवरून उघड्या टपाच्या कारमधून त्या तिघांची मिरवणूक एअरपोर्टपासून राजभवनपर्यंत निघाली होती. मी काशीविश्वेश्वरासमोरच्या सिग्नलजवळ (सिटीलाईटजवळच्या चौकातला) गर्दीत उभा राहून बाललवयातल्या मी त्यांना पाहिल्याचं लख्ख स्मरतंय...! 

आणि पुढे बोरिवलीच्या गोखले शाळेचत रुजलेली स्पेस आणि ऍस्ट्रॉनॉमीची आवड, नंतर मुंबईच्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधल्या आणि फौंटनच्या फुटपाथवरच्या पॅट्रिक मूर, कार्ल सेगन, आयझॅक ऍसिमोव्ह आणि आर्थर सी क्लार्क वगैरेंच्या पुस्तकांमुळे खगोलशास्त्राचं वेड निर्माण होण्याइतपत वाढली होती!  

एकेक वय असतं...एकेक वेड असतं..एकेक जुनून असतो..पण ते झपाटलेपण सगळ्यांना त्या त्या उद्दिष्टाच्या पूर्तीपर्यंत नेतंच असं नाही. स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी हे माझे प्रचंड लाडके विषय होते. (खरं तर अजूनही आहेत!). मला मोठेपणी थेट भारताचे दुसरे जयंत नारळीकर व्हायचं स्वप्नं होतं...(कसचं कसचं! ;-) )

शाळेपासूनच अफाट गोडी होती. आधी ना. वा. कोगेकर आणि निरंजन घाट्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी सायन्सची आणि अंतराळशास्त्राची गोडी लावली आणि मग चर्चगेटच्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने तर आयझॅक ऍझिमॉव्ह, आर्थर क्लार्क, पॅट्रिक मूर आणि कार्ल सेगनसारख्यांच्या पुस्तकांचा खजिनाच समोर उभा केला होता! आमच्या शाळेची लायब्ररीसुद्धा चांगलीच समृद्ध होती आणि अगदी नववी-दहावीच्या वयात आम्हाला टाइम लाईफच्या पुस्तकांबरोबरच जॉर्ज गॅमॉव्हच्या "वन, टू, थ्री ...इन्फिनिटी" चा मराठी अनुवाद "एक, दोन, तीन...अनंत" सुद्धा वाचायला मिळाला होता. त्यातली रिलेटिव्हिटीची संकल्पना सोप्पी करून सांगणारी कविता अजूनही विसरलो नाही-

"There was a Lady named Miss Bright

Who could travel much faster than Light

She departed one day

in a Relative way

And came back on the previous night..." ;-) 

काॕलेजवयात दादरच्या शारदाश्रम शाळेत संध्याकाळी कल्याणच्या हेमंत मोने सरांच्या मार्गदर्शनाखाली "अवकाश दर्शन छंद वर्ग" अटेंड केला. मोनेसर खूप सुंदर शिकवायचे. आठवठाभर चाललेल्या त्या छंदवर्गाचा भाग म्हणून, आम्ही छोट्या टीम्स करुन त्यावेळी नेहरु सायन्स सेंटरला जाऊन न्युटोनियन पद्धतीची दूर्बिणही बनवली होती-अगदी जाड गोलाकार काच घासून, लेड आॕक्साईड लावून वगैरे! खूप मझा आला होता. ही गोष्ट साधारण 1980 ची!

तिथेच माझी, पत्रकार दिलीप जोशी आणि बीएआरसीतला शास्त्रज्ञ राजीव चिटणीसशी छान ओळख आणि मैत्री झाली. बोरिवलीहून ऊठून त्यांच्या विद्याविहारच्या सोसायटीत जाणं व्हायचं. पुढे मग त्यांनी स्थापन केलेल्या "खगोल मंडळाचा" अर्थातच सभासद झालो होतो. सायनच्या साधना विद्यालयात एक खोली आणि कपाट मिळालं होतं "खगोल मंडळाला"! आणि मग पाहतापाहता पसारा वाढून वांगणीला हज्जारो विद्यार्थ्यांना, पालकांना, जिज्ञासू आबालवृद्धांसाठी मोकळ्या शेतात रात्रभर आकाशदर्शन घडवण्याचं आणि खगोलशास्त्राकडे लोकांना आकृष्ट करण्याचं फार मोठं काम "खगोल मंडळा"ने केलं होतं. खगोलमंडळाच्या खात्यात उत्तम टेलिस्कोप्स होते...प्रदीप नायकसारखा उत्साही मार्गदर्शक होता असं आठवतंय...

त्या सगळ्याचा मला झालेला वैयक्तिक प्रचंड फायदा म्हणजे आधीच आवडीच्या असलेल्या स्पेस आणि अॕस्ट्राॕनाॕमी सारख्या विषयांतल्या अवकाशातल्या ग्रहतार्यांचं, नक्षत्रांचं, आकाशगंगांचं, दीर्घिकांचं ठोस ज्ञान मिळालं.

त्याकाळी पाॕप्युलर असणा-या मोठ्या आकाराच्या "एव्हरेडी कमांडर टाॕर्च"चा आकाशदर्शनासाठी मस्त उपयोग व्हायचा. अंधार पडल्यावर पश्चिम क्षितीजाकडून उगवणा-या नक्षत्रमंडळांकडे, ता-यांकडे नेम धरुन त्या पाॕवरफूल कमांडर टाॕर्चचा झोत टाकला की एखाद्या पाॕइंटरसारखी प्रकाशाची लखलखीत रेघ आकाशात जाऊन जणू त्या ता-याला मिळे! मग तिथनं एका ता-यावरुन दुस-या ता-याचा...त्यावरुन तिस-याचा वेध घेण्याची हातखंडा सवयच झाली होती. मी लीलया महत्त्वाचे सगळे तारे, नक्षत्रं दाखवू शकत होतो. (आजही जरा ब्रश अप करुन कुठेतरी शहराबाहेर मिट्ट काळोख्या ठिकाणी जाऊन ते करायला आवडेल!) गेल्या दिवाळीतच आम्ही कर्नाटकात होतो. 'पहाटे साडेचार'ला दांडेली अभयारण्याच्या प्रवेशदारावर टिकिटविंडोवर लायनीत राहण्यासाठी पोहोचलो तेव्हा वर आकाशात जो ता-यांचा सडा पाहिला होता त्याने डोळ्याचं पारणं फिटलं होतं. आपल्या आकाशगंगेला "मिल्की वे" का म्हणतात ते तिथ्थे पुन्हा अनुभवलं होतं..आपले शेतकरीमंडळी जेव्हा दूधाचे हंडे रस्त्यांवर बदाबदा ओतून दूध वाया घालवतात, तेव्हा जी दूधाची नदी दिसते नं टीव्हीत - तश्शी दूध ओतल्याचा फील देणारा ता-याचा अंगावर येणारा सडा! त्यातही मी निकिता, गार्गीला पटापट चारपाच नक्षत्रं आणि ता-यांची माहिती दिलीच! ;-) ).....

माझ्या त्या तरुणपणी झपाटलेल्या अवस्थेत, संदर्भासाठी गो.रा.परांजप्यांचं पुस्तक "आकाशदर्शन अथवा हा तारा कोणता?" याची मोठीच मदत व्हायची! रोहिणी, मृगशीर्ष, सप्तर्षी, कृत्तिका यांच्या अफलातून अवकाशस्थ प्रतिमा तर कित्ती सुंदर दिसतात...मृगशीर्ष आणि व्याधाची आपल्याकडची कहाणी ग्रीकांच्या शिकारी योद्ध्याशी तुलना करुन टाॕर्चच्या सहाय्याने रात्रीच्या आकाशात दाखवताना खूप भारी वाटायचं! मृगाच्या पोटात घुसलेल्या बाणाजवळची (ग्रीकांच्या शिकार्याच्या बेल्टजवळची) लपलेली M42 उर्फ ओरायन नेब्युला दुर्बीणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसू शकते आणि ती दाखवताना लोकांच्या प्रतिक्रिया मजा आणायच्या.

एक्केका नक्षत्राची आपल्याकडची कहाणी आणि पाश्चात्यांची कहाणी ऐकताना लोकं तल्लीन होत असत! (मला आठवतंय..लग्नाआधी कधीतरी मी आणि मंजू गच्चीवर अंधारात असताना, मी तिला सप्तर्षीतले वसिष्ठ आणि अरुंधती दाखवायचा प्रयत्न केल्यावर, तिला "बापरे, हा यडा तारेबिरे कसले दाखवतोय...कसं होणार या अरसिक माणसाबरोबर?.." असा प्रश्नच पडला होता! 🤣

पण खूप मझा यायचा स्पेस, अॕस्ट्राॕनाॕमीचा अभ्यास करताना...त्याविषयी वाचन करताना.... ड्वार्फ स्टार्स, बायनरी स्टार्स, न्यूट्राॕन स्टार्स, ब्लॕक होल्स, जायंट स्टार्स, नोव्हा, सुपर नोव्हा, गॕलक्सी, नेब्युला असं सगळं तेव्हा प्रचंड प्यारं होतं. आणि कसं कोण जाणे आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा ती आवड उफाळून आल्येय!

परवा एका मैत्रिणीशी बोलताना हा विषय निघाल्यावर तर थोडंसं यासंबंधी लिहावं असंही वाटतंय. शिवाय फेसबुकवर चकटफू लिहिता येतं आणि गेलाबाजार वीसपंचवीस चकटफू वाचकही मिळतील या खात्रीने चालू करतोय लिहायला.

चलेंगा? 

No comments:

Post a Comment