Thursday, 17 June 2021

जोजो रॕबिट्

जोजो रॕबिट्
-----------
काल रात्री मी दोन्ही लेकींबरोबर हा मूव्ही एंजाॕय केला!..वस्सूलच! 

दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर, नाझींचा ज्यू-द्वेष एका दहा वर्षांच्या लहान जर्मन मुलाच्या भावविश्वातून पण विनोदी/ उपहासात्मक / सटायरिकल अंगाने धमाल प्रकारे मांडलाय! गोड कथानायक, चुरचुरीत मजेशीर डायलाॕग्ज आणि उत्कंठावर्धक प्लाॕट त्यामुळे हा जेमतेम दोन तासांचा मूव्ही आपल्याला खिळवून ठेवतो!....काही डायलाॕग्ज गालांतल्या गालांत तर काही मोठ्याने हंसायला लावणारे!! ;-) 

'ताईका डेव्हिड कोहेन उर्फ ताईका वाईटिटी' या न्युझीलंडच्या लेखक/दिग्दर्शकाने हा धमाल सिनेमा बनवलाय आणि स्वतः लहानग्या जोजोच्या भावविश्वातल्या मजेशीर हिटलरची भूमिकासुद्धा साकारल्येय!

दुसरं महायुद्ध संपत आल्याचा तो काळ! नाझी अधिका-यांकडून लहान लहान मुलामुलींना "हिटलर यूथ ट्रेनिंग कँम्प"मध्ये मिलिटरी ट्रेनिंग दिलं जातंय!..सुरा बाळगून तो चालवायला शिकणं, ग्रेनेड फेकायला शिकणं..असे प्रकार लहान लहान मुलं शिकतायत...सुरुवातीला मुलांना मेंटली टफ बनवण्याचा सीन -- ज्यात जोजोच्या (रोमन डेव्हीस) हातात एक छोटा ससा दिला जातो आणि त्याला एका झटक्यात त्यांची मुंडी मुरगाळून त्याला ठार करायला सांगितलं जातं! अंगचं धैर्य/बेदरकारपणा/ निडरपणा सिद्ध करण्याचा तो एक मार्ग!..पण जोजोची हिंमत होत नाही आणि तो त्या सशाला न मारताच खाली ठेवतो..पण दुस-याच क्षणी त्यांच्या सिनीयर बॕचचा मुलगा (ट्रेनिंग आॕफिसर) त्या सशाला उचलून काड्कन त्याची मान मोडून, ठार करुन त्याला रानात भिरकावून देतो...जोजोआपली फजिती असह्य होऊन तिथनं पळ काढतो..आयत्यावेळी कच खाणा-या जोहान्स बेट्झ्लरला "जोजो रॕबिट" म्हणून हिणवणं सुरु होतं...पण उत्तम नाझी सैनिक बनण्याच्या इर्षेने आपली फजिती विसरुन, आणि त्याच्या भावविश्वातल्या हिटलरने दिलेल्या प्रोत्साहनाने 'चार्ज' होऊन तो झोकात कॕम्पमधे परततो...नेमानं पडेल ती कामं करायला सुरुवात करतो. अशातच एक दिवस ----

जोजोच्या भावविश्वातल्या, फक्त त्यालाच दिसू शकणा-या आणि त्याच्याशीच बोलणा-या हिटलरशी गप्पा मारत, भावी उत्तम नाझी सैनिक होण्याची स्वप्नं बघणा-या जोजोला धक्का बसतो जेव्हा त्याला त्याच्या आईने, रोझीने(स्कार्लैट जोहान्सन) वरच्या मजल्यावरच्या अॕटिक्कमध्ये चक्क एका ज्यू मुलीला, एल्साला (थोमासिन मॕकेन्झी) लपवून आसरा दिल्याचा शोध लागतो!

अर्थातच पहिल्या भेटीत ती ज्यू आहे कळल्यावर जोजोचं मत तिच्याविषयी प्रतिकूलच बनलेलं असतं...पण हळुहळू तिच्याबरोबरच्या रोजच्या गप्पांमधून त्यां दोघांत एक वेगळाच बंध तयार होतो..एल्सा ही त्याच्या मरण पावलेल्या बहिणीची, इंग ची मैत्रिण हे त्याला कळतं. तिच्याशी बोलताना त्याचं कट्टर नाझी बनण्याचं स्वप्न कुठेतरी बाजूला पडत जातं...

पण दरम्यान जोजोच्या आईलाही नाझींच्या रोषाला बळी पडून फासावर लटकवलं जातं! जोजो आता एकटाच आहे! नाही म्हणायला वरच्या मजल्यावर अॕटिकमधे लपलेली एल्सा त्याचा आधार...

गेस्टापोंची गँग त्याच्या घराची झडती घ्यायला आल्यावर एल्सा पकडली जाणार ही त्याच्या मनातली भिती त्याच्या चेहे-यावर लख्ख दिसत असताना, खुद्द एल्साच सर्वांसमोर येते त्याची मरण पावलेली बहिण इंगं बनुन आणि...आणि?.....

हा सीन चक्रावुन टाकणारा आणि सर्वांनी मिळून एकमेकांना सतत "हाईल् हिटलर" केल्यावर त्या टेन्स सीनमध्येही आपल्या चेहे-यावर हंसू उमटतं! इथे दिग्दर्शकाने निर्माण केलेला उपरोध भिडतोच!

एव्हाना हिटलरचा पाडाव सुरु झालाय...दोस्त राष्ट्रांचं सैन्य विशेषतः रशियन्स मुसंडी मारतायत! इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया (आणि चक्क भारताचाही उल्लेख!!) एकत्रितपणे जर्मनी आणि जपानची दाणादाण उडवतायत...

सिनेमा शेवटाकडे येतो...जर्मनांचा पाडाव...दोस्त राष्ट्रांचं सैन्य शहरात घुसलंय...तुंबळ धुमश्चक्री सुरु झाल्येय....बाॕब वर्षाव...बिल्डींग्ज पडतायत...गोळीबार....मरणारे सैनिक आणि माणसं...जोजोच्या हिटलर यूथ ट्रेनिंग कॕम्पचा आॕफिसर पकडला गेलाय...पण जोजोची "ज्यू" म्हणून निर्भत्सना करत तो त्याला मुद्दामच वाचवतोय...त्या पळापळीत जोजोला त्याचा नाझी शिबिरातला मित्र याॕर्की (आर्ची येट्स) भेटलाय...त्या धामधुमीतही त्यांच्या तोंडचे संवाद धमालच...

शेवट?..जोजो आणि याॕर्की वाचतात का? एल्साचं काय होतं?....हा सिनेमा बघाच सगळ्यांनी!!...अगदी "मस्ट-सी" कॕटॕगरीतला झालाय बाकी!! :-D

No comments:

Post a Comment