हेवन कॕन वेट!
----------
काल लागोपाठ दुस-या रात्री असा सिनेमा पाहिला की ज्यात सिनेमाचा कथानायक मेल्यानंतर त्याच्या आत्म्याचा पुढचा प्रवास 'स्वर्गात की नरकात होणार' या फैसल्यापासूनच सिनेमाला सुरुवात होते!
१९४३ सालचा हा धमाल सिनेमा उलगडतो फ्लॕशबॕक तंत्रानं! मला खरंच प्रचंड प्रेम..नव्हे वेडच्च आहे त्या १९३० ते १९६० मधल्या हाॕलीवुडच्या सिनेमांचं!!...क्काय एकेक प्लाॕट असायचे...क्काय एकेक दिग्दर्शक...आणि ते सारे कलाकार!!!
अर्न्स्ट लुबीश हा जर्मन-अमेरिकन कम्माल दिग्दर्शक! ४० च्या दशकातलं अमेरिकन लब्धप्रतिष्ठीत कुटुंब, त्यावेळची लाईफस्टाईल, श्रीमंतांच्या घरी आढळणारा नोकरवर्ग आणि त्यांची मालकांप्रती निष्ठा, त्यावेळचे शिष्टाचार...या सर्वांमधून उलगडणारी कथानायकाची धमाल प्रेमकहाणी लुबीशने फार सुंदर खुलवत नेल्ये...
अल्फ्रेड न्यूमनच्या गूढरम्य संगीताच्या पार्श्वभूमीवर टायटल्स येतानाच काहीतरी वेगळं बघायला मिळणार याची जाणीव होते.. सिनेमा सुरु होतो तो म्हाता-या हेन्री व्हॕन क्लीफच्या (डाॕन अॕमेश) आत्म्याच्या चित्रगुप्ताच्या माॕडर्न भव्य आॕफिसमधल्या आगमनानं!...पार्श्वसंगीत इतकं भारुन टाकणारं की तिथेच आपल्याला कळतं की हे काहीतरी विलक्षण आहे..वेगळ्या जगातलं...व्हॕन क्लीफला एकंदरित कल्पना आहे की तिथनं त्याची रवानगी नरकात होईल याची! तिथला चित्रगुप्त "हिज एक्सलन्सी (लेअर्ड क्रेगर) त्याचं स्वागत करतो आणि व्हॕन क्लीफच्या आत्म्याला पुढच्या प्रवासाचा फैसला करण्याआधी त्याची "केस" नीट माहित नसल्यानं, त्याला एकवार त्याच्या बाजूनं त्याची कहाणी ऐकवायला सांगतो. त्यावेळचे त्यांचे डायलाॕग्ज मजेशीरच!
"या...स्वागत. कसे आहात मिस्टर व्हॕन क्लीफ?"
"धन्यवाद युअर एक्सलन्सी!"
"बसा नं बसा. आजकाल आम्ही इतके बिझी असतोय..असं वाटतंय अख्खं जगच नरकाकडे येतंय बहुदा..!..मला तुमची केस वाचायला वेळ नाही मिळाला..जरा सांगता का तुमच्याविषयी?.कधी घडलं हे?"
"मंगळवारी! रात्री ९:३६ ला!"
"ओह..मला वाटतं जास्त त्रास झाला नसावा तुम्हाला?"
"छे..छे! अजिबात नाही. मी जेवण उरकलं आणि .."
"मस्त रुचकर जेवण?"
"हो..एक्सलंट चवीचं..मस्तच जेवण. डाॕक्टरांनी खायला मना केलेलं सग्गळं खाल्लं मी!..आणि मग मला झोप लागली. शांत झोप!..आणि मी उठलो तेव्हा बघतो तर माझ्याभोवती सगळे नातेवाईक जमले होते..आणि माझ्याबद्दल कुजबुजत होते..छान छान बोलत होते..तेव्हा मला जाणवलं - मी मेलोय!"
"तुमचं फ्युनरल व्यवस्थित पार पडलं?"
"हो. हो..अं..फक्त एकच मला अज्जिबात न आवडणा-या मिसेस कूपर-कूपर त्यांच्या किरट्या आवाजात गायल्या...मी आयुष्यभर टाळत होतो त्यांना..पण त्यांनी शेवटी संधी साधलीच!"
"मिस्टर व्हॕन क्लीफ, खालती पाताळातही तुम्हाला चांगलं काही ऐकायला मिळणार नाही. बाख, मोझार्ट, बिथोव्हेन..ते सगळे वरती..तिथे स्वर्गात!..मला तुमचं रेकाॕर्ड बघू दे..मग ठरवू आम्ही तुम्हाला इथे स्वीकारु शकतो की कसं ते?..तुम्ही तुमच्या मते केलेला सर्वात भारी गुन्हा सांगा बरं..."
असल्या धम्माल संवादानंतर सुरु होतो फ्लॕशबॕक.. व्हॕन क्लीफच्या न्यूयाॕर्कमधल्या बालपणापास्नं!...
आणि मग आपण व्हॕन क्लीफचं कुटुंब..त्याचे आईवडिल...त्याची बालपणीची मैत्रिण...घरची फ्रेंच दाई...त्याचा चुलत भाऊ अल्बर्ट..आणि या वातावरणात मोठा होत गेलेला व्हॕन क्लीफ यांच्याबरोबरीनं ती धमाल बघण्यात गुंग होत जातो..!
त्याच्या चुलत भावाचं अल्बर्टचं लग्न जिच्याशी ठरलंय त्या मार्थाला (जीन टिअर्नी) तो आधी भेटलाय आणि त्याला ती आवडून गेल्येय...घरी मोठी पार्टी आहे...अल्बर्ट आणि मार्थाचा साखरपुडा ठरतोय..त्या धामधुमीत शिंकांनी बेजार झालेली मार्था शांत होण्यासाठी दिवाणखान्याबाजूच्या भव्य लायब्ररी-रुममधे शिरते. व्हॕन क्लीफ तिथेच बसलाय...त्याला राहवत नाही...तो तिला जवळ घेतो..एक कचकचीत चुंबन...आणि मग?..तो तिला दोन्ही हातांत उचलून सर्वांदेखत घरातनं पळ काढतो...सर्वजण हैराण आणि चिडलेले...फक्त त्याचे आजोबा ह्युगो (चार्ल्स कोबर्न) सोडून!..ते नोकराकरवी त्याला हनीमूनसाठी गुपचुप पैसे पाठवून मदत करतात...
आणि इथनं सुरु होतो व्हॕन क्लीफ आणि मार्थाचा संसार आणि गंमतीजंमती...त्याची काही छोटीछोटी लग्नाबाहेरची मैत्रिणींबरोबरची प्रकरणं...मग नवराबायकोत बेबनाव.. मार्थाचं चिडून आपल्या माहेरी जाणं...आणि पुन्हा एकदा इरसाल आजोबांच्या मदतीनं व्हॕन क्लीफनं तिथे रात्री प्रवेश करुन तिला घरच्यांसमोर उचलून आजोबांच्या मदतीनं तिथनं बग्गीतून पळवणं...धमालच!
असं होत...होत..."जगाला प्रेम अर्पावे" वृत्तीच्या व्हॕन क्लीफची कहाणी शेवटाकडे येते...पत्नी, आईवडिल, आजोबा ..सर्व लाडक्यांना गमावलेला आणि वृद्ध झालेला व्हॕन क्लीफ कहाणी संपवतो...आता पाताळातल्या नरकात जायला तो तयार ...पण त्याच्यासाठी एक सरप्राईझ आहे...ते कोणतं?....
No comments:
Post a Comment