----------------
“आप जिनके करीब होते है, वो बडे खुशनसीब होते है!!
होय मी खुशनसीबच!! कारण काल काही क्षण कां होईना, माझा 'देव' माझ्या करीब होता!!...
माझा अजूनही विश्वास बसत नाहीये...खर्ररच! “भक्तांना देव भेटतो” हे गोष्टीत वाचलं होतं..सिनेमात पाहिलं होतं...पण...पण ते माझ्या बाबतीत कधी घडू शकेल ह्यावर विश्वास बसत नव्हता!..म्हणजे माझ्या भक्तीत कुठे कुसूर नव्हती...माझी इबादत एकनिष्ठच होती...माझ्या ह्या देवाच्या जागी दुसऱ्या कुणालाचं स्थान नव्हतं! कधीच!!...पण तरी नियतीकडून हे दान मिळत नव्हतं!..
खूप लहानपणापासून मी ते एक स्वप्न उरी बाळगून होतो!! की बस्स - माझ्या लाडक्या दैवताबरोबर “काही क्षण” घालवायला मिळावेत! होय! माझं दैवत!! The most Beautiful Man on Earth!!.....शशी कपूर!!
माझा लहानपणापासूनचा आयडॉल!!..खूप वर्षं वाटायचं की सरळ जाऊन त्याला भेटावं!...पण त्याकाळी सुचतच नसे की ते कसं शक्य होऊ शकेल म्हणून. पण दुरून कां होईना मनोमन त्याची भक्ती करत राहिलो..
'राजेश'युग आलं तेंव्हा कुठे मी नुकतीच सिनेमे बघायला सुरुवात केली होती..मग अमिताभ नावाचं वादळ आलं आणि राजेशयुग उध्वस्त होऊन अमिताभयुग सुरु झालं...एकीकडे मॉर्निंग / म्यॕटीनी वर देवसाब आणि शम्मीचा अक्षय्य पगडा होताच!..दुसरीकडे इंग्लिश सिनेमे वॉरफिल्म्स / वेस्टर्नस्चं आकर्षण होतं आणि ..ते सर्व बघत असून..देवसाब, शम्मीच नव्हे तर अगदी विश्वजीत, जॉय चे मॉर्निंग / म्यॕटीनी त्यातल्या बेमिसाल गाण्यांसाठी ८-८ वेळा बघत असूनही, माझी शशीवरची अविचल निष्ठा मला पुनःपुन्हा त्याच्या सिनेमांकडे ओढून नेत होती!!..
“जब जब फूल खिले”, “आमने सामने”, “हसीना मान जायेगी” पासून ते “शर्मिली”, “अभिनेत्री”, “दीवार”, “कभी कभी”, “त्रिशूल” पर्यंत .,प्रत्येक सिनेमाच्या १४-१५ वेळा वाऱ्या व्हायच्या!!...अगदी “चोर माचाये शोर” किंवा “चोरी मेरा काम” सारखे सिनेमेही ८-१० वेळा सहजच पाहून झाले त्या काळी!...त्यावेळी हेअर कटिंग सलून मध्ये पडलेले “फिल्मफेअर” “मायापुरी”, “सिनेब्लीत्झ”चे अंक शशीचे कुठचे पिक्चर फ्लोअरवर गेलेत...येणाऱ्या कुठल्या सिनेमात त्यच्या बरोबर कोण आहे ह्याची माहिती पुरवायचे!..
त्याचे 'सोलो स्टारर्स' हे राजेश, अमिताभ, धर्मेंद्र इतके खूप धंदा करत नसले तरी बरे चालायचे!...किंवा तो असणाऱ्या मल्टीस्टारर्स मध्ये त्याच्यापेक्षा अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्रला ज्यास्त वाव असला तरी 'त्याच्याइतकंच' ते मीही मनावर घेत नसे!! शशीचं त्या सिनेमात असणं हेच माझ्यासाठी पुरेसं असायचं!
त्याचे समांतर सिनेमे – “जुनून, कलयुग, उत्सव, विजेता” तर लाजवाब होतेच!! मग हळूहळू त्याच्या गाण्याच्या ऑडीओ कॅसेट्स गोळा करणं हेही करून झालं!..
पण हे सर्व करत असताना तो त्या काळी नेपियन सी रोडवर रहात असल्याचं ऐकिवात असूनही बोरिवलीहून उठून त्याला बघायला, भेटायला तिथे जाऊन तिष्ठत तिथे उभे रहना कध्धीच डोक्यात आलं नव्हतं...
आणि मग बोरिवली सोडून पुण्यात शिफ्ट झालो..आणि मधूनच कधीमधी हां विचार डोक्यात यायला लागला - 'उठावं आणि जाऊन थडकावं त्याच्या घरापाशी' आणि बघावं भेट मिळते का ते...पण ते क्षण त्या वेळी नव्हतेच नशिबात.. मी मुंबईला जात राहूनही काही ना काही कारणाने आमची भेट हुकत राहिली...
अखेर काल इतक्या वर्षांची माझी मनीषा...नव्हे 'दुर्दम्य इच्छा' फलद्रूप झाली!!..होय!!...
काल मी माझ्या लाडक्या हिरोला भेटलो!...काल मी जे क्षण जगलो ते खरं तर खूप वर्षांपूर्वी माझ्या नशिबात असायला हवे होते....काल त्याला भेटलो तेंव्हा खरं तर माझीच अवस्था बघणीय झाली होती...दिवसभर उन्हात फिरून कावून मी हैराण झालो होतो...”साक्षात आपल्या आपल्या लाडक्याला भेटायचं तर आपणही प्रेझेण्टेबल असावं” हे कुठेतरी मनात होतं, पण दिवसभर मुंबईभर गरगरा फिरून दुपारनंतर प्रचंड अवसान आणून त्याच्या दारी गेलो. “पृथ्वी”वर!!..
त्याला खालती यायला जमेल न जमेल अशी आशंका होती मनात...खूप धाकधूक होती...एव्हाना संध्याकाळचे सात वाजत आले होते..मी त्याला द्यायला घेतलेले गुलाबसुद्धा म्लान व्हायला लागले होते...अखेर त्याला व्हीलचेअर वर ठेवून आणण्यात आलं...त्याची प्रचंड आजारपणाने झालेली केविलवाणी स्थिती हेलावून गेली....मला एकीकडे प्रचंड आनंद झाला होता खरा...पण त्याची मेडिकल कंडीशन चर्र करून जात होती...त्याला त्या अवस्थेत बघून कसनुसं होत होतं. शशी तू, ‘तू’ नव्हतास रे!!अति आजारपण आणि हॉस्पिटलायझेशन आणि वरचेवर होणारी डायलीसीसची दगदग ह्याने माझा लाडका पार दयनीय होऊन गेलेला पाह्यला काल!!...त्याच्या डोळ्यातली चमक हरवलीच होती..व्हीलचेअरवरचं त्याचं काहीसं वाकून बसणं...मान सलग ताठ राहू शकत नव्हती...निस्तेज डोळ्यातून त्याने माझं अभिवादन स्वीकारलं...वाढदिवसानिमित्त मी हसून त्याच्या हातात दिलेला गुलाबाचा छोटासा गुच्छ त्याने क्षणिक मंद स्मित करून घेतला आणि तत्क्षणी १०-१२ डिजीटल कॅमेऱ्यांच्या फ्लॕशगनचा झालेला खटखटाट आणि त्यातून बाहेर आलेले प्रखर प्रकाशलोळ त्याच्या आधीच नाजूक झालेल्या बुब्बुळाना सहन होईनात...गेली कित्येक दशकं कॅमेऱ्यांना लीलया घायाळ करणारी त्याची डोळ्यातली चमक ते फ्लॕश सहन करेनात आणि त्याने फ्लॕश चुकवून दुसरीकडे नजर वळवली...मी हललो..खूप आतून दाटून आलं...डोळ्यातले अश्रू थोपवून मी उगाच वेड्यासारखा कॅमेऱ्यात हसलो...आणि तरीही मी हां फोटो आग्रहाने माझ्या वॉलवर टाकतोय!.
ह्या कलियुगातही माझा देव म्या पामराला काही क्षण भेटून पावन करून गेलाय त्याची जितीजागती पावती आहे ही!!........
शशी भेटला...मी काही क्षण त्याच्या समोर नतमस्तक होतो....तो बोलू शकत नव्हता आणि मला तर भडभडून बोलायचं होतं त्याच्याशी...त्याचे माझे लागेबांधे सांगायचे होते त्याला...त्याच्याशी जरी गप्पा नाही होऊ शकल्या तरी त्याच्या परममित्राशी – “प्रयाग राज”शी मात्र ओळख ही झाली आणि चांगल्या तासभर गप्पाही झाल्या काल!...खूप जुन्या आठवणीना उजाळा मिळाला...जुने किस्से शेअर केले मी त्यांच्याशी आणि त्यांनी माझ्याशी!....(तुमच्यापैकी काही जणांना माहीत नसेल पण “जंगली” मधल्या – “चाहे कोई मुझे जंगली कहे” ह्या रफीसाबच्या गाण्यातली “याsssssह्हू” ही आरोळी ह्याच प्रयाग राजजीं ची!!...त्याची आठवण मी त्यांना करून दिल्यावर स्वारी खुलली आणि त्यांनी त्याचा किस्सा मला ऐकवला...राजसाहेबांच्या “आग” पासून त्यांचे कपूर घराण्याशी असलेले संबंध आणि मग मनमोहन देसाईबरोबर त्यांनी लिहिलेले अनेक पिक्चर्स ह्यांच्या आठवणी निघाल्या....शशीला “उत्सव” साठी शेखर सुमनने केलेल्या भूमिकेत अमिताभच हवा होता पण अमिताभ सलग डेट्स देऊ शकला नही मग कमाल हसनला विचारलं गेलं पण त्य्च्याही डेट्स जुळेनात आणि अश्या तऱ्हेने शेखर सुमनचं नशीब फळफळलं होतं ...मग शशीच्या लग्नाच्या वेळचे किस्से...अश्या बऱ्याच गप्पा रंगल्या आमच्या...पण रात्र होत होती आणि मला पुण्याला परत यायचं होतं म्हणून मी तिथून निघालो...
हा शशीबरोबरचा “पल दो पल” चा साथ!...पण खूप समाधान देऊन गेलाय!!...शशीला पुन्हा नक्की भेटायचंय!! पुन्हा. नक्कीच!!.निसर्गातला तो सर्वशक्तिमान देव माझ्या ह्या देवाची तब्येत सुधारो अशी मनोमन प्रार्थना!..शशी मला बोलायचंय तुझ्याशी..थोडं तरी बोलशील नं?..पुढच्या भेटीत?...
No comments:
Post a Comment