--------------------
मला एक कळलंय. समाजासाठी आणि देशासाठी काहीही काम न केलेल्या माझ्यासारख्या सामान्य पापी माणसाने, गेल्या जन्मी नक्कीच आसामान्य पुण्ण्याचं काम केलं असणार म्हणून मला काल रात्री हा अफाट, अचाट, अफलातून, अलौकिक आणि जबरदस्त सिनेमा पाहण्याची बुद्धी झाली!!!!!!
1941 साली, "सिटीझन केन"सारखा आॕल टाईम ग्रेट सिनेमा समोर स्पर्धेत असताना, या सिनेमाला दहा अकॕडमी अवाॕर्डसाठी नाॕमिनेशन्स मिळून याने सहा आॕस्कर्स जिंकली देखील होती! अर्थातच 'बेस्ट फिल्म''चं आॕस्कर होतंच त्यात!!! ;-)
कोळशाच्या खाणीत काम करणा-या एका वेल्श कुटुंबाची ही अत्यंत हृदयंगम कथा! माॕर्गन कुटुंब खूपच मोठं आहे. आईवडील आपल्या पाच मुलं आणि एका मुलीबरोबर कोळशाच्या खाणीकडे जाणा-या डोंगर उतारावर ओळीनं असणा-या अनेक घरांपैकी एका घरात राहतायत. कुटुंबातलं शेंडेफळ असणा-या ह्यू माॕर्गनच्या नजरेतून हा संपूर्ण सिनेमा उलगडतो! प्रौढ ह्यू माॕर्गन आता ते गाव सोडून निघालाय, त्याला बालपणापासूनचं सगळं आठवतं आणि फ्लॕशबॕकने ही कथा उलगडते...
सिनेमात उभी केलेली डोंगरमाथ्यावरची कोळशाची खाण, उतारावर वसलेलं वेल्श लोकांचं गाव. गावात गुण्यागोविंदानं राहणारी वेल्श माणसं..त्यांची वेगळ्या धाटणीची गाणी...जीवनपद्धती..शिफ्टची वेळ झाल्यावर आपापले जेवणाचे डबे घेऊन खाणीकडे निघणारं सर्व गाव... शिफ्ट संपल्यावर आपापली रोजंदारी हातात पडल्यावर घरी परतणारे काळेकुट्ट कामगार..त्यातच मिस्टर माॕर्गन आणि त्यांचे चार हट्टेकट्टे मुलगे...आणि मग अंगावरची कोळशाची पूटं जाईपर्यंत अक्षरशः खरारा करत आंघोळी करुन छानपैकी स्वच्छ होऊन मग एकत्र जेवायला जमलेलं कुटुंब! आई (सेरा आॕलगुड) आणि वडिल (डाॕनल्ड क्रिस्प) यांच्या प्रेमळ धाकात असणारी तगडी भावंडं...त्यातच लुडबुड करणारा सर्वात छोटा ह्यू (राॕडी मॕकडोवाल) आणि त्यांची कमालीची गोड बहिण अँगहॕरॕड (माॕरीन ओ'हारा)!!
घरातल्या सर्वात मोठ्या मुलाचं लग्न. छोट्या ह्यू ला आपली सुंदर वहिनी खूपच आवडल्येय. त्या लग्नात चर्चमधला तरणाबांड उपदेशक ग्रीफीडला (वाॕल्टर पिजन) अँगहॕरॕड बघते आणि ते एकमेकांकडे आकर्षित होतात. पण लग्न होणं तर शक्य नसतं...त्यांची घुसमट...
कोळशाच्या खाणीत आधी कामगारांच्या पगारात आणि मग संख्येत कपात...त्यातनं गावात आणि माॕर्गन कुटुंबात उठलेलं वादळ... अँगहॕरॕडचं मनाविरुद्ध खाणमालकाच्या मुलाशी झालेलं लग्न...छोट्या ह्यू ला गावापासून दूरवर पायपीट करत शाळेत शिकायला जायला लागल्यावर तिथल्या शिक्षकाकडून आणि मुलांकडनं खाणकामगाराचा मुलगा म्हणून झालेली हेटाळणी...त्यावर ह्यू कशी मात करतो...खाणीतल्या अपघातात मुलाचा झालेला मृत्यू...इतर तिघा मुलांनी वेगळं राहायचा घेतलेला निर्णय...यातनं पुढे सरकत जाणा-या कथेत आपण कम्मालीचे एकरुप होत गुंतत जातो!
गावातल्या एक्कुणेक सर्वच व्यक्तिरेखा कमालीच्या भिडतात आपल्याला आणि प्रत्येकच कलाकाराने जिवंत केल्येय आपापली भूमिका! तरीही कथेतली महत्त्वाची पात्र असणा-या माॕर्गन कुटुंबातल्या प्रेमळ आईवडिलांच्या भूमिकेतले डाॕनल्ड क्रिस्प आणि सेरा आलगुड, चर्चमधल्या प्रीचरच्या भूमिकेतला वाॕल्टर पिजन, छोट्या ह्यू च्या मध्यवर्ती भूमिकेतला राॕडी मॕकडोवाल आणि बहिणीच्या भूमिकेतली माॕरीन ओ'हारा आपल्या मनात घर करतात! !! (माझ्या लाडक्या वुडहाउसची मैत्रिण म्हणून माॕरीन ओ'हारा ला कधीचं पाहायचं होतंच मला!😍)
यातली कोळशाच्या खाणीच्या आतली दृश्य पाहताना माझ्या शशीच्या "मोहब्बत इसको कहते है"चा शेवटचा भाग आठवत होता...यश चोपडांना 1979च्या "काला पत्थर"मधेसुद्धा न जमलेला खाणीतला यथार्थपणा 1965 सालच्या "मोहब्बत इस को कहते है"मधून आख्तर मिर्झा ने सुरेखच दाखवला होता!)...
दिग्दर्शक जाॕन फोर्डने अत्यंत हृदयापासून बनवलेला हा भावनोत्कट सिनेमा! तशी सिम्पल स्टोरी पण दिग्दर्शक जाॕन फोर्डने काय कमाल केल्ये ती वेळ काढून बघा...बघा...बघाच्च!!! आज सगळी कामं बाजूला ठेवा..पण ह्या रसरशीत जिवंत सिनेमाची आनुभूती घ्या च्च!! मोठंच पुण्ण्याचं काम असेल ते!! ;-)
No comments:
Post a Comment