"प्रिटी पॉली"
----------
सर नोएल कॉवर्ड हा १९२० ते १९६० मधली चाळीस वर्षं गाजवलेला ब्रिटिश नाटककार, कथाकार, अभिनेता आणि दिग्दर्शक! "प्रिटी पॉली बार्लो अँड अदर स्टोरीज" या त्याच्या कथासंग्रहातल्या एका कथेवर कॅमेरामन/ दिग्दर्शक गाय ग्रीन ने १९६७ साली "प्रिटी पॉली" हा सिनेमा बनवला. हॅले मिल्स आणि ट्रेव्हर हॉवर्ड या ब्रिटिश कलाकारांबरोबर माझ्या शशीचा यात महत्त्वाचा रोल होता. १९६२ सालच्या "द हाऊसहोल्डर" आणि १९६५ सालच्या "शेक्सपियरवाला" या सिनेमांपाठोपाठ १९६७ सालचा शशीचा हा तिसरा इंग्लिश सिनेमा! अमेरिकेत हाच सिनेमा "अ मॅटर ऑफ इनोसन्स" या नावाने रिलीज झाला होता
-------------------
सिंगापूर हे मलेशियापासून वेगळं होऊन कॉमनवेल्थचा भाग झाल्याचा तो काळ! तिथे जगाच्या इतर देशातले लोक नशीब आजमावायला येत असत आणि त्याचबरोबर टुरिस्टांचीही गर्दी असे. ब्रिटिशांची कॉलनी असल्यामुळे तिथे ब्रिटिशांची बऱ्यापैकी वर्दळ!
सिनेमाची कहाणी म्हणजे सिंगापूरमध्ये आपल्या इव्हा (ब्रेंडा ब्रँझी) या श्रीमंत मावशीबरोबर आलेल्या पॉली (हॅले मिल्स) या षोडशेच्या आयुष्यात अवघ्या तीनचार दिवसांत घडणारी कथा! पॉलीचा मामा बॉब (ट्रेव्हर हॉवर्ड) हा तिथेच एका मळ्याचा मालक आहे आणि मजा मारत आयुष्य घालवतोय! अमाझ (शशी कपूर) हा टूरिस्ट्ससाठी गाईड म्हणून काम करणारा पण त्याचबरोबर वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर मजा मारणारा देखणा गुलछबू तरुण!
सिनेमा सुरु होतो तेव्हा कळतं की श्रीमंत, तोर्रेबाज इव्हामावशी सिंगापूरच्या क्रूझवर निघाल्ये आणि तिच्याबरोबर सोबत म्हणून ती आपल्या भाचीला, पॉलीला घेऊन निघत्येय. पॉली अगदी साधी सिम्पल चष्मिष्ट मुलगी! दोघी बोटीनं सिंगापूरला पोहोचतात. त्यांना न्यायला त्यांनीं अंकल बॉबला बोलावलंय, पण तो पठ्ठा एका स्थानिक चायनीज तरुणीबरोबर, लॉरे ली बरोबर(कॅलेन लिऊ) मजा मारतोय आणि म्हणून त्याने मलेरिया झाल्याची थाप मारून, अमाझ गाईडवर त्या दोघींचं स्वागत करून त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेण्याची जबाबदारी सोपवल्ये. त्याप्रमाणे अमाझ दोघींना रिसिव्ह करतो आणि हॉटेलमध्ये नेतो. पण नेमकं ते टॅक्सीने जात असताना मैत्रिणीबरोबर त्याच रस्त्याने सायकल रिक्षाने जाणारा अंकल बॉब त्यांच्याच कार शेजारी येतो आणि त्याला इव्हामावशी आणि पॉलीने बघू नये म्हणून त्याची आणि अमाझची तारांबळ! वाहनांची टक्कर... फळवाल्याची गाडी आपटून फळं रस्त्यावर... पोलिसांच्या शिट्ट्या..लोकांचा आरडाओरडा...दरम्यान पॉली ला अंकल बॉंब मैत्रिणीबरोबर दिसतोच आणि ती चक्रावते!! हा सीन मजेशीर! आणि त्यावेळचे सिंगापूर शहरातली दृश्यही मस्तच!
रॅफल्स या पॉश हॉटेलात त्या दोघी उतरल्यात. चौकस पॉलीला तेव्हढ्यात तिथेही अमाझचं स्त्रियांबरोबरचं जरा वेगळं वागणं जाणवलंय. च्यालू अमाझ इव्हामावशीवर इम्प्रेशन मारताना "I am the most excellent guide in Singapore" असं सांगत त्यांना आपलं कार्ड देत "I am entirely at your service day or (पॉलीकडे बघत) night!" म्हणतो! तिथून निघताना पॉली अमाझकडे बघत बघतच जात्येय ( अमाझचं पॉलीवर डोरे डालणं इथूनच सुरु...) :-)
इव्हामावशी पूलसाईड ब्रेकफास्ट करत्येय. पॉली काही सामान घेऊन आल्ये. तिला पाहून अमाझ तिच्याजवळ येतो. तिला सिंगापूरमध्ये साईटसिईंगसाठी चलण्याचा आग्रह करतो पण मावशीच्या धाकापुढे तिला शक्य नसतं. ब्रेकफास्ट करणारी खाष्ट मावशी तिला अमाझशी जास्त बोलू देत नाही आणि तिला आपल्याजवळ बोलावून घेते, पण ब्रेकफास्ट करून स्विमिंगपूलमध्ये उतरल्या उतरल्या हार्ट अटॅकने पाण्यातच कोसळते सगळ्यांची धावाधाव. हॉस्पिटलमध्ये नेलं जात. काही मिनिटांतच अमाझ तिथे पोहोचतो आणि पॉलीला धीर देतो! पण इव्हामावशी त्या मॅस्सीव्ह हार्ट अटॅकमधून वाचत नाही. अमाझ अंकल बॉबला फोन करून ती वाईट बातमी कळवतो.
पॉलीला तिच्या रूममध्ये सोडायला आलेला अमाझ तिला धीर देताना तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवतो ..मावशी गेल्यापासूनच्या तिच्या धीरोदात्त वागण्याचं कौतुक करून निघतो. पॉली त्याला तासाभरात पुन्हा येण्याविषयी सांगते आणि तो रूमबाहेर निघताना स्वतःहून आपला हात पुढे करते. पण अमाझ यावेळी मात्र हातावर ओठ न टेकवता निघतो.. अमाझ काहीसा वेगळाच भासतो.
पॉलीही आता बदलल्ये. ती मावशीची पर्स चेक करते. त्यातले महागडे दागिने घालून बघते. खूप साऱ्या नोटा मिळाल्यात त्यात तिला. हॉटेल असिस्टंटला बोलावून ती स्वतःच्या छोट्या रूममधून मावशीच्या प्रशस्त स्वीटमध्ये शिफ्ट होते. आणि मग छान तयार होऊन अमाझबरोबर बाहेर फिरायला निघते. वाटेत त्यांच्या गप्पा रंगतात. अमाझ तिला अंकल बॉबविषयी सांगतो.. तिच्याशी सांत्वनपर बोलायला जातो आणि त्याला धक्काच बसतो जेव्हा पॉली त्याला आपली खाष्ट मावशी गेल्याचं आज्जीबातच दु:ख्ख झालं नसल्याचं सांगते तेव्हा! :-)
अमाझ तिला घेऊन एका जॅपनीज हॉटेलमध्ये जातो. बोलता बोलता तिचा चष्मा काढून तिच्या डोळ्यांत बघत तिच्या डोळ्यांचं कौतुक करतो. तिच्या अगदी निकट जात नजरेत नजर मिळवत तिला चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुचवतो. तिने हेअरस्टाईल बदलावी असंही सुचवतो. ती सुखावते. अख्ख्या सिंगापूरमध्ये तोच एक ओळखीचा असल्याचं सांगते आणि मावशी गेल्यापासून त्याची कित्ती मदत झाल्ये याबद्दल त्याचे आभार मानते. दोघं खूप जवळ आल्येत. तिला कुठेतरी त्याच्याबद्दल एक अनामिक आकर्षण वाटतंय एव्हाना!
"तू कित्ती चांगला आहेस अमाझ! का इतका चांगला आहेस तू?"
"काय माहित? काहीतरी कारण असावं एखादं.किंवा अनेक छोटी छोटी कारणं असावीत आणि छोट्या छोट्या कारणांचं मिळून एक मोठ्ठ कारण असावं"
"तू कित्ती मदत करतोयस मला..." असं म्हणताना ती रडवेली होते..
अमाझ तिला कुशीत घेत चक्क लहान मुलाला उगी उगी करतात तसं करतो. "रॉकअबाय बेबीss रॉकअबाय बेबीs .." वगैरे गातो. हा प्रसंग खूपच गोड!..
"तू कित्ती गोड मुग्गी आहेस!"
"मी? नाही...तूच कित्ती गोड आहेस.." म्हणत ती त्याच्या गालावर ओठ टेकवते... बस्स...तो प्रेमाचा क्षण! दोघांचे ओठाला ओठ टेकतात... आणि दीर्घ चुंबनसमाधी!
तिथून दोघं समुद्रकिनाऱ्यावर जातात. अंधार पडायला सुरुवात झाल्ये. किनाऱ्यावरच्या वाळूत ठेवलेल्या बोटीत बसून दोघांच्या गप्पा. बोलता बोलता नकळतच त्यांना जाणवणारी एकमेकांची ओढ..ना राहवून माझ अमाझ तिला बाहुपाशात घेतो आणि .....आणि....
दुसऱ्या दिवशी अमाझबरोबर फिरत पॉलीचा मेकओव्हर!... चष्मा जाऊन कॉन्टॅक्ट लेन्सेस येतात. केसांची स्टाईल बदलते. कपडेही एकदम स्टायलिश! कालची पॉली आणि आजची पॉली दोन ध्रुवांवरच्याच जणू!... पॉली झटपट डिसिजन घेते. धक्क्यावर असलेल्या बोटीवरून ती आपल्या मावशीचं सगळं सामानही हॉटेलवर हलवते. चर्चमध्ये मावशीच्या फ्युनरलच्या संस्कारावेळी अंकल बॉब तिथे येतो. बदलेलली पॉली त्यालाही आश्चर्यचकित करून जाते आणि त्याचबरोबर अमाझविषयी तिचं प्रेमाने बोलणंसुद्धा!!
हॉटेलमध्ये पॉलीला तिच्या बाजूच्या स्वीटमध्ये राहणारा प्रेस्टन (डिक पटरसन) भेटतो. बदललेल्या पॉलीला पाहून तोही इम्प्रेस झालाय. त्याचवेळी अमाझ पॉलीला भेटायला तिच्या स्वीटमध्ये येतो. पॉली आणि त्याच्यात पुन्हा जवळीक. पण नेमका अंकल बॉब आपल्या भाचीला भेटायला तिथे येतो आणि अमाझला तिथे बघून काय ते समजतो. पॉलीची खरडपट्टी काढतो. तिने अमाझसारख्या फालतू गाईडमध्ये गुंतू नये वगैरे सांगतो. अंकल तिला अमाझ हा एक रंगेल तरुण असून तिने त्यात गुंतू नये असं सांगतो, पण पॉलीसुद्धा हट्टी आहे. ती अंकलला समजावते. आणि चक्क रात्री अमाझबरोअबर डिनरला जायचं ठरतं.
दरम्यान तिच्याच बाजूच्या स्वीटमधला बिझिनेसमन प्रेस्टन तिला कॉकटेलसाठी आमंत्रण देतो. ती जाते. तिकडे आधी ठरल्याप्रमाणे अमाझ डिनरसाठी तिची वाट पाहतोय, पॉली यायला उशीर. पण बरोबर अंकल बॉब आहे आणि त्याची मैत्रीणसुद्धा. डिनर डेटचा तिथे फियास्को होतो. पण अमाझच्या प्रेमात असलेली पॉली त्याच्याबरोबर बुगी स्ट्रीटच्या रोडसाईड जॉईन्टला जाते. तिकडचा माहोल फारच धमाल घेतलाय. रस्त्यावरची टेबलं, माणसांची गर्दी, सावजं हेरणाऱ्या कॉलगर्ल्स, कस्टमर्सना गंडवणारे भामटे वगैरे... पॉली तिथ माहोल एन्जॉय करत असते. तिने घेतलेल्या ड्रिंकच अंमलही चढायला लागलेला असतो. त्यांना आणि इतर बरीच मंडळी जॉईन होतात आणि तेव्हढ्यात अमाझच्या दुर्दैवाने बिझिनेसमन प्रेस्टन तिथे येतो आणि पॉलीला कन्व्हिन्स करून अमाझच्या मर्जीविरुद्ध सगळ्या गॅंगला घेऊन दुसऱ्या ठिकाणी निघतो. अमाझला प्रेस्टनचा हेतू बरोबर नाही हे कळतं आणि पॉलीची काळजी वाटून तोहि मागोमाग निघतो.
प्रेस्टन पाॕलीला घेऊन जातो ते हाॕटेल नक्की काय आसतं? तिथे काय चालत असतं? तिथे पाॕलीवर काय प्रसंग गुदरतो? अमाझ वेळेवर पोहोचतो का? सिनेमाचा शेवट काय होतो? -- हे सर्व समजून घ्यायचं असेल तर हा 1967 सालचा माझ्या शशीचा "प्रिटी पाॕली" जरुर पाहा!
No comments:
Post a Comment