--------------------------------------
हिंदी फिल्म्समध्ये आपण नेहेमीच अतर्क्य योगायोगाच्या घटना बघतो, पण त्यावर चक्क विश्वास बसावा असंही त्या इंडस्ट्रीतल्या खूप जणांच्या बाबतीत घडत आलंय. उदाहरणार्थ - महम्म्द युसूफ सरवर खानचीच गोष्ट बघा!
पेशावरहून १९३०च्या काळात भारतात आलेल्या कुटुंबाबरोबर हासुद्धा मुंबईत आला. काही काळ कॅन्टीन स्टोअर आणि ड्रायफ्रूटचं दुकान चालवलंन, त्यादरम्यान बॉम्बे टॉकीजच्या देविकाराणीने त्याला पाहिला आणि त्याचं 'दिलीपकुमार' असं नवं नामकरण करून त्याला थेट आपल्या 'ज्वारभाटा' फिल्मचा नायकच बनवून टाकला! साल होतं १९४४!..आणि पुढच्या पाचच वर्षांत "जुगनू, शहिद आणि अंदाज" सारख्या हिट्ट फिल्म्समुळे तो त्याकाळच्या बिनीच्या अशोककुमारला मागे टाकून आघाडीचा स्टार बनला!
खरं तर म्या पामराला त्याची अॕक्टिंग माझ्या शालेय वयात, त्याचे उगाच चारदोन सिनेमे दूरदर्शनवर पाहून अतीउच्च, अशक्य ग्रेट वगैरे वाटली नव्हती आणि मी मित्राशी वादही घालायचो. तो म्हणायचा,"दिलीप म्हंजे अभिनयातला शेवटचा शब्द!"..मं मी लगेच म्हणायचो, "बरोबरच्च आहे "शेवटचा" शब्दच, पहिला नव्हे!" म्हंजे असं की ग्रेटग्रेट लोकांची उदाहरणार्थ क्रिकेटच्या ग्रेट लोकांची नावं घ्यायला सुरुवात केली तर आपण ब्रॕडमन, सोबर्स, गावस्कर .." अशीच सुरूवात करतो...किंवा ग्रेट गायक म्हटलं की लता, रफी, आशा.." अशीच सुरुवात करतो..आणि "शेवटी शेवटी (शेवटचा शब्द)" म्हणून उरल्यासुरल्यांची नावं घेतो!! ;-) 🤣 तर माझा मित्र भडकलाच मी दिलीपला 'शेवटच्या' रांगेत ढकलला म्हणून! पण..येस्स.पुढच्या काळात जसजसे त्याचे अफलातून सिनेमे पाहात गेलो तेव्हा त्याची डायलाॕगची स्टाईल आणि धनुष्याकृती भिवयांचा वापर आवडत गेला. अगदी शाळामास्तरप्रमाणे समोरच्याच्या चेह-याच्या दिशेने बोट रोखत बोलणंही!
सुरुवातीला तलत आणि नंतर रफीसाबच्या आवाजात त्याला अफलातून गाणी मिळत गेली. उत्तरोत्तर त्याची नॅचरल ऍक्टिंग स्टाईल लोकांना भावत गेली..ट्रॅजिक फिल्म्स मधला त्याचा अभिनय आवडत गेला आणि पाहतापाहता तो 'ट्रॅजेडी किंग' आणि लिव्हिंग लिजंड बनला!
त्याचे समकालीन मोतीलाल, बलराज साहनी, अशोककुमारसुद्धा सहजसुंदर अभिनय करून जातच होते की!! पण yess, "अंदाज, मुसाफिर, देवदास, आझाद, गंगा जमना, नया दौर, राम और श्याम" ते अलीकडच्या "मशाल, शक्ती"सारख्या अनेक फिल्म्समधली त्याची ऍक्टिंगमधली कमालीची सहजता भुरळ पाडून गेली हे मान्य करावंच लागेल! विशेषतः 'देवदास'मधला त्याच्या खास अंदाजात अजरामर झालेला डायलॉग,"कौन कम्बख्त है जो बरदाश्त करने के लिये पिता है, मै तो पिता हूं के बस सांस ले सकू!"..
कुणीसं मागे खवचटपणे म्हटलं होतं की -"देवदास तीनवेळा मेला. पहिल्यांदा शरदबाबू चॅटर्जी गेले तेव्हा त्यांच्याचबरोबर त्यांच्या लेखणीतून उतरलेला मानसपुत्र गेला, दुसऱ्यांदा त्याला रुपेरी पडद्यावर अमर करणारे के एल सैगल गेले तेव्हा देवदास गेला आणि तिसऱ्यांदा दिलीपकुमारने त्याला पडद्यावर 'साकार केला' तेव्हा!" ??....यातला विखारी विनोद बाजूला ठेवू. दिलीपकुमार मला आवडत नसला तरी त्याने देवदास अप्रतिम साकारला होता हे मान्य करावं लागेल!! त्याच्या देवदासला नावं ठेवणाऱ्या त्या समीक्षकाने, शाहरुखचा देवदास पाहिला असता तर तो धाय मोकलून रडून मेला असता! ;-) ).
त्याने सर्वच भूमिका समरसून केल्या आणि संयत अभिनयाची एक शैली निर्माण केली जी पुढे अनेक ऍक्टर्सना कॉपी करावीशी वाटली (नावं घयायची गरज आहे?)...
करिअरच्या सुरुवातीच्या काळात कामिनी कौशलच्या आणि नंतर पुढच्या काळात मधुबालाच्या प्रेमात पडलेल्या दिलीपकुमारने पंचेचाळीशी गाठल्यावर मात्र सर्वांना धक्काच दिलान!! त्याने वयाच्या पंचेचाळिशीत आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या देखण्या सायराला गटवून तिच्याशी निकाह केला. तो मोठाच चर्चेचा विषय बनला होता त्याकाळी! (आजकालच्या मिलींद सोमण, अनुप जलोटा आणि झी मराठीतल्या 'तुपारे'फेम विक्रम संरंजामे ने बहुदा त्याच्याकडूनच इन्स्पिरेशन घेतलं असावं! ;-) )
११ डिसेंबरच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त मला आवडणाऱ्या त्याच्या अनेक गाण्यांतलं हे गाणं. रफीसाबचा कमाल आवाज!!!...
https://youtu.be/XisFzdMbGGY

No comments:
Post a Comment