Saturday, 19 June 2021

स्पेस आणि अॕस्ट्राॕनाॕमी (भाग २)

स्पेस आणि अॕस्ट्राॕनाॕमी (भाग 2)
-------------------------------
‌देवाने आपणा माणसांना बाकी अजब जीव बनवलाय! म्हंजे मेंदू, बुद्धी जरी सगळ्या सजीवांना दिली असली तरी कुतूहल, औत्सुक्य, जिज्ञासा, तर्कशक्ती आणि विचार करुन त्यानुसार काही निष्कर्षाप्रत पोहोचण्याची जी क्षमता आपल्याला लाभल्ये ती इतर सजीवांकडे नाहीच!
‌आता हेच बघा ना! सूर्य मावळून अंधार पडल्यावर कित्येक सजीवांची हालचाल सुरु असते. मिट्ट काळोखात दूर बघण्याची, दिसण्याची शक्ती आपल्यापेक्षा कित्येक पक्ष्याप्राण्यांना आपल्या कित्येक पट जास्त असते. जसं आपण मुंडी वर करुन रात्रीच्या आकाशातले तारे, नक्षत्रं बघू शकतो, तसं तेही बघू शकतातच की! पण म्हणून त्यांना माणसासारखे प्रश्न पडत नाहीत की बुवा थोड्याथोड्या वेळाने त्या सर्व ता-यांची नक्षत्रांची स्थिती बदलत्येय ती का? काही मंद प्रकाशतायत ते का? काही चमचम करतायत ते का? आणि मग त्यांच्यापैकी कुणी माणसांकडे असणा-या कुतूहलाप्रमाणे मांडी ठोकून तासंतास आकाशाच्या स्थितीचा अभ्यास करुन त्यांच्या मनांत आलेलं पंजाच्या नख्याने किंवा चोचीने कुठे दगडामाती-झाडाच्या सालीवर कोरुनही नाही ठेवत नं?!!! तसं करण्याची किमया आणि बुद्धीची तेव्हढी झेप माणसाकडेच तर आहे फक्त!
‌आणि म्हणून त्या बुद्धीचा वापर करुन माणसाने रात्रीच्या त्या नयनरम्य (तारे, ग्रह, नक्षत्रं) आणि क्वचित भितीदायक (धुमकेतू, उल्का) अवकाशस्थ गोष्टींचा हजारो वर्षं अभ्यास चालवलाय आणि त्यातूनच आजचं खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र आणि त्यातल्या काही प्रचंड सोप्या आणि काही भलत्याच क्लिष्ट गोष्टी, संज्ञा जन्माला आल्यात!
‌यातली खूप सोपी आणि सहज जाणवणारी गोष्ट म्हणजे माणसाच्या ज्ञात इतिहासापासून ते आजपर्यंत आकाशातल्या ता-यांची, ग्रहांची, नक्षत्रांची स्थानं, एकमेकांपासूनची अंतर, पातळ्या यात बदल झालेला जाणवत नसल्यामुळे,एकदा का रात्रीचं आकाश बघायची सवय लागली आणि आवड निर्माण झाली की खूप काही सोप्पं होऊन जातं...ठोकताळे लक्षांत यायला लागतात. एखाद्या विशिष्ट ता-याच्या आकाशातल्या स्थानावरुन इतर अनेक ता-यांची, नक्षत्रांची स्थानं निश्चित करता येतात आणि मग रात्रीचं आकाश न्याहाळण्यात नुसती गंमत नाही तर वाटत तर त्याच्यात एक मझा आहे हे लक्षांत यायला लागतं. 
‌मी स्वतः ती मझा, तो कैफ अनुभवलाय. इतका की माझ्या निद्रीतावस्थेतही बहुदा माझ्या सूक्ष्म देहाने घेतलेले वेगळ्याच दुनियेतले अनुभव मी स्वप्नावस्थेत जगलोय. (पूर्वी मला एक सवय होती - आदल्या रात्री पडलेल्या स्वप्नाचं सकाळी उठल्यावर मी स्केच काढून ठेवायचो (ड्राॕइंग बरं आहे माझं)...(आणि तुमचा विश्वास बसणार नाही अशी कित्येक अतर्क्य दृश्य मी माझ्या स्वप्नावस्थेत पाहात आलोय आणि दुस-या दिवशी त्यांचं स्केच काढताना थरारलोय. ज्या काळात मी कुठलाच sci-fi मूव्ही पाहिलेला नव्हता, या विषयावरची फँन्टसी पुस्तकं वाचली नव्हती अशाही वयात मी काही अद्भूत स्पेस शटल्स, यानं निद्रीस्त स्थितीत पाहिली होती,..अद्भूत आणि भयकारी आॕब्जेक्टसचं, रंगांचं तांडव..ता-यांची/ नक्षत्रांमधला विलक्षण स्थितीबदल..अनुभवलं होतं...कुठल्या मितीत?..कुठल्या काळांत जाऊन?...)
‌असो. तर आपल्या विषयाकडे वळूया. तर हे जे प्रचंड इंटरेस्टिंग अवकाश आणि त्यात अब्जावधी वर्षांपासून मुक्कामाला असणारी ग्रह, तारे, नक्षत्रं, धुमकेतू, उल्का, आकाशगंगा, दीर्घिका, वगैरे जी मंडळी आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आणि त्यांच्याशी दोस्ती करायची तर सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्टं म्हणजे गावाशहरापासून दूर, लोकवस्तीपासून, दिव्यांच्या झगमगाटापास्नं दूर असा मिट्ट काळोखी प्रदेश हवा! कारण आपण मनुष्यवस्ती असणा-या एखाद्या गावात, शहरात भले रात्रीबेरात्री तारे नक्षत्रं पाहण्यासाठी उंच बिल्डींगच्या गच्चीत जरी गेलो, तरी मानवी वस्तीत असणारा दिव्यांचा उजेड हा आसमंतात पसरलेलाच असतो आणि त्यामुळे क्षितीजालगतचे तारे, नक्षत्रं तर दिसत नाहीतच शिवाय त्या उजेडामुळे आगदी डोक्यावर असणारे काही ठळक, प्रखर दीप्तीचे तारे सोडले तर महत्त्वाचे कितीतरी तारे, ग्रह नाहीच दिसू शकत आणि अपेक्षित असणारा ता-यांचा सडा नाहीच पाहायला मिळत! पण एकदा का असं ठिकाण मिळालं की संध्याकाळी लवकर जेवण आटोपून पश्चिम क्षितिजाकडून नजर लावून उलटं वर ख-स्वस्तिकापर्यंत येऊन पूर्वेकडे यायचं...कारण पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे पश्चिम क्षितीजावरची मंडळी पटापट दिसेनाशी होतात त्यांना miss करायला नको नै का?..
‌काही नेहेमीच्या टीपिकल संज्ञा आणि या सा-या अवकाशस्थ मंडळींची ओळख करुन घेऊ!..पण त्याआधी थोडं "यूफो"विषयी बोलू!! 

No comments:

Post a Comment