माल्टीज फाॕल्कन
-----------
काल रात्री मी पाहिलेला बोगी उर्फ हंफ्रे बोगार्टचा हा केवळ दुसराच मूव्ही!..त्याआधी ७-८ वेळा "कॕसाब्लांका" पाहिला होता. पण तो अर्थातच माझ्या डार्लिंग 'इंग्रीड बर्गमन'साठी! ..म्हंजे त्यात हंफ्रे बोगार्टच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी मला चाललंच असतं! (किंबहुना हंफ्रेच्या ऐवजी माझ्या आवडत्या 'ग्रेगरी पेक, कॕरी ग्रँट किंवा जेम्स स्ट्युअर्ट'पैकी कुणी असतं तर मी इंग्रीडबरोबरच त्यांच्यासाठी म्हणूनही आणखी पाचवेळा एव्हाना नक्कीच बघितला असता! ;-) )
हंफ्रे बोगार्ट दिसायला खास नसला तरी करडा आवाज, भेदक नजर, डोक्यावर हॕट ठेवण्याची खास पद्धत, हातातली सिगारेट आणि डायलाॕगची विशिष्ट लकब याने त्याची छाप पडतेच बाकी!!
दिग्दर्शक जाॕन ह्युस्टनचा हा पहिलाच सिनेमा, पण त्याचं बोगार्टबरोबर ट्युनिंग इतकं झकास जमलं की पुढे त्याने आणखी एकापेका एक सरस पाच मूव्हीज बोगार्टला घेऊन केले..!!
डॕशिल हॕमेटच्या याच नावाच्या डिटेक्टीव्ह कादंबरीवर आधारित हा १९४१ सालचा मूव्ही सॕम स्पेड (हंफ्रे बोगार्ट) या डिटेक्टिव्हकडे ब्रिजीड ओ'शाॕनेसी (मेरी अॕस्टर) या सुंदरीने आणलेल्या एका प्राचीन हिरेजडीत सोन्याच्या बहिरी ससाण्याच्या शोधाची कथा मांडतो. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला माल्टा बेटावरच्या राज्यकर्त्यांनी स्पेनच्या राजाला भेट देण्यासाठी हिरेमाणकं जडवलेली ती बहिरी ससाण्याची मूर्ती समुद्री मार्गानं पाठवलेली असते, पण ती त्या ताफ्यावर हल्ला करुन समुद्री चाच्यांनी पळवलेली असते...आणि पुढची तीनशे वर्षं अनेक हातांतनं जातजात शेवटी तो माल्टाचा ससाणा (हिरेजडीत सोन्याची मूर्ती) अमेरिकेत कुठेतरी पोहोचला असण्याची शक्यता असते..गूढरम्य पार्श्वसंगीताच्या साथीनं हे वेगवान कथानक पुढे सरकत जातं..
सुरुवातीलाच स्पेडच्या डिटेक्टिव्ह एजन्सीचा पार्टनर आसणा-या आर्चरची (जेरोम कोवॕन) हत्या होते. आर्चरच्या बायकोशी इव्हाशी (ग्लॕडीस जाॕर्ज) सॕमचे प्रेमसंबंध असल्यामुळे त्याच्यावरच संशय घेतला जातो. पाठोपाठ ओ'शाॕनेसी ज्याच्या मार्गावर असते त्या थर्स्बीलाही कुणीतरी गोळ्या घालून ठार करतं. आणि इथनं कथानकाला वेगवान वळण लागतं. ओ'शाॕनेसी प्रत्यक्षात त्या हिरेजडीत माल्टीज फाॕल्कनच्या शोधात आहे हे समोर येतं. आता कथेमधे आणखी तीन रहस्यमय मंडळींचा प्रवेश होतो - हिरेजडीत माल्टीज फाॕल्कन मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजायला तयार असणा-या लोकांमधले "जोएल कैयरो (पीटर लाॕरे), कॕस्पर गटमन (सिडानी ग्रीनस्ट्रीट) आणि त्याचा हिटमॕन विल्मर कूक (एलीशा कूक)" ...एका टप्प्यावर सॕम स्पेडपर्यंत माल्टीज फाॕल्कन पोहोचतोही पण पोहोचवणा-याला मारलं जातं...आता सॕमला त्या मूर्तीच्या बदल्यात आपली किंमत गटमनकडून वसूल करण्याची संधी चालून येते...
No comments:
Post a Comment