Monday, 14 June 2021

मिलियन पाऊंड नोट

Prasanna_katta_प्रसन्न_कट्टा पेजवरुन -

"द मिलियन पाऊंड नोट"
-------------------
मला हाॕलीवुडमधला सगळ्यात आवडणारा नट म्हणजे ग्रेगरी पेक! त्याचे चिक्कार सिनेमे मी पाहिलेत. म्हणजे अगदी  सुरुवातीच्या "स्पेलबाउंड, यर्लींग, द स्नोज आॕफ किलीमांजारो, रोमन हाॕलीडे"पासून ते "गन्स आॕफ नॕव्हरोन, द बाॕईझ फ्राॕम ब्राझील, मॕकेन्नाज गोल्ड, ओमेन" पर्यंत अनेक!..पण रात्री पाहिलेल्या "द मिलीयन पाऊंड नोट"मधल्याइतका तो देखणा, चिकणा, तरणाबांड, हँडसम, क्यूट कधी दिसला नसेल! या सिनेमात तो कॕयच्यॕक्यॕय रुबाबदार आणि समोरच्यावर छाप पाडणारा दिसून गेलाय आणि जोडीला त्याचा सहजसुंदर,एफर्टलेस अभिनय!!

या सिनेमात तो आहे अमेरिकन हेन्री अॕडम्सच्या भूमिकेत जो एका अपघाताने इंग्लंडमधे येऊन अडकलाय. अत्यंत कफल्लक झालाय. धड काही खायलाही पैसे शिल्लक नाहीत. भुकेकंगाल अवस्थेत रस्त्याने जाताना एका लहान मुलीने अर्धवट खाऊन फेकलेलं उचलायला तो जाणार तेव्हढ्यात जवळच्या बिल्डींगमधनं त्याला दोघंजण हाक मारुन बोलावतात. तो जातो.

ते दोघं धनाढ्य पण विक्षिप्त भाऊ त्याला एक विचित्र आॕफर देतात. त्यांनी एकमेकाशी लावलेल्या पैजेनुसार ते त्याला जाॕब देऊ करतात पण तो एका अटीवर..त्यांनी देऊ केलेले पैसे ज्या पाकीटात आहेत ते त्याने दुपारी 2 वाजताच उघडायचं. ग्रेगरी पेक ते पाकीट घेऊन आधी एका रेस्टाॕरंटमध्ये जातो आणि 2 वाजेपर्यंत यथेच्छ खातो पितो...त्याचा अवतार बघून रेस्टाॕरंटची मालकीण आणि वेटर त्याच्याकडे पैसे नसणार हे जाणून त्याला ताबडतोब बिल देण्याचं  फर्मान सोडतात..त्यांच्यासमोर तो त्या दोन भावांनी दिलेलं पाकीट उघडतो मात्र....

त्या हाॕटेलमधले सगळेच गपगार!!! कारण त्यात असते तब्बल दहा लाख पौंडाची बँक नोट (1952 सालचे!)..हा कुणी विक्षिप्त लक्षाधीश आहे असं समजून त्याला सन्मानपूर्वक पुन्हा येण्यासाठी निमंत्रण देतात...आणि हा असाच प्रकार पुढे सूटच्या दुकानातही घडतो...

आणि मग एकाहून एक धमाल प्रसंगांची मालिकाच सुरु होते..दरम्यान त्याला एक निष्ठावान अबोल सेवकही मिळतो आणि त्याची उंची हाॕटेलमध्ये राहाण्याची सोय होते...त्याला या सगळ्या भानगडीत प्रत्यक्ष पैसे दे असं सांगण्याची कुणाचीच हिंमत नसते कारण दहा लाख पौंडाचे सुटे च्यामारी कुणाकडे असायला?..

मग त्याची इंग्लंडच्या लब्धप्रतिष्ठितांमधे, अमीरउमरावांमधे ऊठबस सुरु होते. त्याला पोर्शा लॕन्सडाऊन (जेन ग्रिफिथ्स) ही एका डचेसची पुतणीही मिळते. मग एका सोन्याच्या खाणीमधे गुंतवणुकीचा प्रस्ताव घेऊन एकजण येतो..आणि सिनेमा एक धमाल वळण घेतो, कारण तो हाॕटेलच्या ज्या स्वीटमध्ये राहात असतो तो न मिळाल्यामुळे हैराण झालेला, एक ड्युक एका नोकराणीकरवी ती दहा लाख पौंडाची नोट लंपास करतो...

आणि मग एकच अभूतपूर्व गोंधळ उडतो.. हेन्री अॕडम्सला नोट परत मिळते का?..त्या दोन भावांच्या पैजेचं काय होतं?..हेन्रीला पोर्शा मिळते का?..सोन्याच्या खाणीच्या शेअर्सचं काय होतं...वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी जरुर जरुर बघाच्च - "द मिलीयन पाऊंड नोट"..मूळ कथा मार्क ट्वेनची!..आणि सिनेमात छा गया है आपल्या सर्वांचा लाडका,.अमाप चिकणा ग्रेगरी पेक!..यूट्युबवरुन गायब होण्याच्या आत हा धम्माल सिनेमा बघा!!

No comments:

Post a Comment