----------------------
शहराबाहेर दूर एखाद्या पठारावर, माळरानावर किंवा एखाद्या गडावरच्या मोकळ्या जागेत, अंधारात बसून आकाशाकडे नजर टाकल्यावरचा पहिला क्षण खरं तर मनांत प्रचंड कल्लोळ निर्माण करणारा असतो!! चहूबाजूंनी क्षितिजापर्यंत टेकणारा तो काळ्याकभिन्न अवकाशाचा अवाढव्य Dome आणि त्यावरचा कोट्यावधी चमचमणाऱ्या ताऱ्यांचा अंगावर येणार सडा, पहिलेछूट मनांत धडकीच भरवून जातो! एरवीच्या आयुष्यात उगाचच इगो बाळगून टिवटिव करणारे, शहाणपणा मिरवणारे आपण मानव, त्या ब्रह्माण्डाच्या अफाट पसाऱ्यापुढे किती क्षुद्र ठिपक्यासारखे आहोत याची जाणीव होते! मला तर वाटतं ज्या ज्या माणसांना (बिझिनेसमन असोत की राजकीय पुढारी, मोठे बिल्डर असोत की गुंठामंत्री, शिक्षणसम्राट असोत की सेलिब्रिटीज) - ज्यांना ज्यांना मनात स्वतःच्या कर्तृत्त्वाचा, कमाईचा, लोकप्रियतेचा अहंभाव किंवा अहंगंड निर्माण झाला असेल त्यांनीं एकदा असं शहराबाहेर दूर एखाद्या पठारावर, माळरानावर मिट्ट काळोखात बसून सातआठ तास आकाशदर्शन करावं - मग आपल्या या नश्वर जीवनातला, बेगडी सुखातला, ऐश्वर्यातला, प्रसिद्धीच्या हव्यासातला वैय्यर्थ्य उमगेल! आकळेल!! अब्जावधी सजीवांनी भरलेल्या पृथ्वीवरच्या, एका भारतनामे देशातल्या, अमुकेक शहरातल्या, कोट्यवधी माणसांमधले आपण त्या नजरेच्या टप्प्यात न मावणाऱ्या कोट्यवधी तारे, लक्षावधी सूर्यमाला, इतकी सारी नक्षत्रं, शेकडो धूमकेतू, हजारो उल्का आणि कित्येक कृष्ण विवरांनी बनलेल्या त्या अफाट आणि अचाट ब्रह्माण्डात किती नगण्य आहोत याची जाणीव होईल!
हे अथांग, अनंत ब्रह्माण्ड आणि ते सर्व निर्माण करणारा आणि तोलून धरणारा तो कोण आहे? कुठे आहे? हे सारं का निर्माण झालंय? त्याचा लय कधी होणार? आधी काय होतं? पुढे काय होणार? अशी उत्तरं न सापडणाऱ्या प्रश्नांची रांगच लागते मग मनात आणि आपण जगन्नियंत्यापुढे, नियतीपुढे नस्तमस्तक कधी होऊन जातो ते आपलं आपल्यालाही समजत नाही...
तर आता ज्यांना आपण इतक्या प्रेमळ नजरेने, तासंतास टक लावून बघणारोत त्यांची धावती ओळख करून घेऊ!
स्पेस म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेलं 'अवकाश किंवा अंतराळ' आणि त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र (अॕस्ट्रॉनॉमी) हे तर आपल्याला माहितीच आहे! आता, हे अंतराळ इतकं अफाट आणि कल्पनेपलीकडे अथांग आहे की त्यांबद्दल बोलताना, आपली पृथ्वीवरची नेहेमीची मैल, किलोमीटर वगैरे अंतरांची मापं चालतच नाहीत! आपल्या सूर्यमालेतली अंतरं सांगताना पृथ्वी आणि सूर्यामधल्या अंतराचा आधार घेतला जातो. ते अंतर आहे जवळपास १५ कोटी किलोमीटर आणि त्याला म्हणतात एक अॕस्ट्रॉनॉमिकल युनिट! पण डोळ्यांसमोर चमचमणारा एखादा तारा किंवा तारकासमूह (नक्षत्र) किंवा टेलिस्कोपमधून दिसणारी आकाशगंगा प्रत्यक्षात इsssतकीsss कॕयच्यॕ कॕय दूर आहे की त्यासाठी हे अॕस्ट्रॉनॉमिकल युनिटच्या भाषेतही नाही सांगता येत! मग त्यासाठी अजून एक एकक (युनिट) वापरतात. त्याला म्हणतात प्रकाशवर्षं!
हे जे दूरवर चमकणारे तारे दिसतात तर त्यासंदर्भात, मानवाला सोडाच पण मानवाला ज्ञात असणाऱ्या सर्वात वेगवान प्रकाराला, म्हणजे प्रकाशालाही तिथे पोहचायला किंवा त्या ताऱ्यापासून किंवा आकाशगंगेपासून निघालेल्या प्रकाशाला आपल्यालापर्यंत पोहोचायला "कित्येक वर्षं" लागत असतात!!!! आता गंमत बघा-
मुळात प्रकाशाचा वेगच जर "सेकंदाला ३ लाख किलोमीटर्स" इतका महाप्रचंड आहे, तर एका वर्षात म्हणजेच ( ३६५ दिवस x २४ तास x ६० मिनिटं x ६० सेकंद) म्हणजेच ३ कोटी १५ लाख ३६ हजार सेकंदात प्रकाश कित्ती दूर अंतरापर्यंत जाईल??? अबबबब!!!!! आकड्याची व्याप्ती डोळे फिरवणारी आणि आपल्याला जेव्हा कळतं की एखादा तारा आपल्यापासून अमुकेक 'प्रकाशवर्ष दूर अंतरावर' आहे म्हणजेच प्रकाश एका वर्षात जितकं अंतर प्रवास करेल त्यानुसार तमुकेक वर्षं प्रवास करून त्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचून तो तारा आपल्याला दिसतोय!! (म्हणजे कल्पना करा की एखादा तारा पृथ्वीपासून ३४६ प्रकाशवर्ष दूर असेल तर ३४६ वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन निघालेला प्रकाश तिथे आत्ता पोहोचत असेल.. म्हणजेच तिथे असणा-या माणसांना ३४६ वर्षांपूर्वीची पृथ्वी आत्ता दिसत असेल ...म्हणजेच तिथली मंडळी आत्ता ३४६ वर्षांपूर्वीचा महाराजांचा राज्याभिषेक आत्ता बघत असतील! :-D ...
आणि असे अब्जावधी तारे आणि लक्षावधी आकाशगंगा असणारं अंतराळ आपल्या डोळ्यांसमोर वर डोक्यावर आहे..जिथले तारे लक्षावधी प्रकाशवर्षं दूर आहेत ..म्हणजेच आपण त्यांना आत्ता जे बघतोय तो त्यांचा तितक्या वर्षांपूर्वीचा भूतकाळ बघतोय!...फार कशाला आपला 'मित्र' सूर्यनारायण आपल्यापासून ज्या अंतरावर आहे तिथून त्याचा प्रकाशआपल्यापर्यंत पोहोचायला ८ मिनिटं लागतात..म्हणजेच आपणा रोज जो सूर्य ज्या क्षणी बघतो तो आठ मिनिटांपूर्वीचा त्याचा भूतकाळ असतो...(म्हणजेच जर आपल्याला पृथ्वीवर फिरणारे डायनाॕसाॕर्स खर्रेखुर्रे फिरताना बघायचे असतील तर आपल्याला पृथ्वीपासून ६.५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरच्या ठिकाणी आत्ता असायला हवं जिथे त्याकाळी पृथ्वीवरुन निघालेला प्रकाश आत्ता पोहोचत असेल.)..
म्हणजेच काय अफाट पसारा आहे नैय विश्वाचा?अमावास्येच्या रात्री, काळोखात त्या भव्यतेची आपल्याला कल्पना येते! निसर्गाच्या, जगन्नियंत्याच्या त्या कमाल निर्मितीपुढे भान हरपून, स्तिमित होत्साते मग आपण आकाशदर्शनाचा मझा लुटतो!
काय काय बघू शकतो आपण? - नुसत्या डोळ्यांनी (naked eyes) ग्रह, तारे, नक्षत्र तर बघूच शकतो पण काही कापसाच्या पुंजक्यांसदृश्य असणाऱ्या नेब्युला म्हणजे दीर्घिकासुद्धा पाहू शकतो फक्त त्या कुठे असतात ते एकदा माहित झालं की बस्स! आणि मग टेलीस्कोपचा वापर करून ग्रहांचे उपग्रह, शनीची कडी, चंद्राचा पृष्ठभाग आणि अशा खूप साऱ्या अद्भुत गोष्टी आपल्याला रात्रभर बघायच्या बघायच्या आहेत!
आधी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय --
शाळेत असताना "सूर्य आणि सर्व ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का" वगैरेंची माहिती आपल्याला अगदी तोंडपाठ असते, पैकीच्यापैकी मार्क्स मिळवलेले असतात. रात्रीचं आकाश पाहताना ते तर डोक्यात असतंच पण मजा येते ती दूरवरचे तारे, नक्षत्र यांच्या कहाण्या जाणून घेतल्या तर!! गॅलॅक्सी, नेब्युला, ब्लॅक होल, मॅगलोनिक क्लाउड यांविषयी जुजबी माहिती मिळवली तर!
आकाशगंगा -> अंतराळाच्या अवाढव्य, महाप्रचंड पोकळीत हजारो आकाशगंगांचे (गॕलक्सीज) समूह आहेत. प्रत्येक आकाशगंगेमधे शेकडो तारे, सूर्यमाला, धुळीचे आणि वायूचे ढग, धूमकेतू अशा अनेक गोष्टी असतात. टेलिस्कोपमधून दिसणाऱ्या आकाशगंगा आकाशगंगा प्रत्यक्षात सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार किंवा अनियमित आकाराच्या असू शकतात.
नेब्युला -> अंतराळ पोकळीतला दोन आकाशगंगांमधला किंवा दोन ताऱ्यांमधला हायड्रोजन, हेलियमसारख्या वायूंनी आणि धूलिकणांनी बनलेला पुंजका! हे पुंजके कित्येक प्रकाशवर्षं अंतरापर्यंत पसरलेले असू शकतात. असं मानलं जातं की अशा नेब्यूलांमधून काही प्रक्रिया घडून ताऱ्यांचा आणि सूर्यमालांचा जन्म होतो.
ब्लॅक होल -> असं मानतात की एखादा तारा मृत होताना त्याच्यातला किरणोत्सर्ग थांबतो आणि गुरुत्वशक्ती प्रचंड वाढून अंतराळात तो जणू दिसेनासा होतो आणि त्या अचाट गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे कोणतीही वस्तू किंवा पदार्थ त्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. अर्थात हा प्रकार काही आपल्याला आकाशदर्शनादरम्यान कधी दिसत नाही.
नक्षत्रं -> काही असे तारकासमूह आकाशात हज्जारो वर्षं दिसत आलेत ज्यांना काल्पनिक रेषांनी जोडल्यावर काही आकृत्या तयार होतात आणि मग त्या आकृत्या वेगवेगळ्या संस्कृतींनुसार काही कथांशी जोडल्या गेल्याहेत. आपण काही ठळक नक्षत्र आणि त्यांच्या भारतीय आणि ग्रीक पुराणांतल्या इंटरेस्टिंग कथा बघू...!
मलाही हा विश्वाचा पसारा फार भुरळ घालतो. पण अभ्यास म्हणाल तर शून्य. नुसतीच आवड.
ReplyDelete