--------------------------
खरं तर हे प्रोव्हर्ब खूप वर्षं ऐकत आलोय आणि टीव्ही, सिनेमांसाठीच्या एक्केक सेकंदाच्या जाहिरातीचे रेट्स ऐकल्यावर निदान त्यानुषंगाने हे खरंही आहे! पण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात हे misnomerच वाटतं!
म्हंजे बघा ना - मी कित्येकदा खूप सारे 'पैसे' खर्च करतो 'वेळ' वाचवण्यासाठी. पण "वेळ (time) = पैसा (money)" असेल तर याचा अर्थ होतो मी पैसे 'खर्च करुन' पैसा 'वाचवत' असतो? कमालच की! म्हणजे "पैसे खर्च करा आणि पैसे वाचवा!" गंमतीचं वाक्य ना हे??😉
बरं याच्या उलट तरी बघा - एखाद्या लांबच्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल आणि तिथे बस, रेल्वे आणि विमान तीनही प्रकारे जाता येत असेल तर कदाचित काहीजण पैसे वाचवण्यासाठी वेगवान विमानाऐवजी वेळखाऊ साधनं म्हणजे रेल्वे किंवा बसने रोडचा प्रवास निवडतील. म्हणजे पैसे (money) वाचवण्यासाठी वेळ (time) खर्च करतील; पण time is money या प्रोव्हर्बनुसार आपण पैसे (म्हणजेच वेळ) वाचवण्यासाठी वेळ (म्हणजेच पैसे) खर्च करतो! आयला, म्हणजे "वेळ खर्च करा आणि वेळ वाचवा? म्हणजे पुन्हा कमालच की! हेही गंमतीदारच!🙃
पण ही सर्व गंमत जाऊ दे - मला सिरियसली प्रश्न पडतो की खरंच कित्येकांना वेळेची किंमत time (=money)ची value का कळत नाही? आणि माझं दुर्दैव असं की माझ्या नशिबाने मला बऱ्याचदा दिलेली वेळ न पाळणारेच भेटलेत. मी अत्यंत थर्डक्लास नवरा, बेक्कार बाप आणि टुक्कार मित्र असण्याचं कारण म्हणजे मी बायको, मुली आणि मित्रमैत्रिणींशी वेळ न पाळण्यावरून वादावादी करतो..कचाकचा भांडतोसुद्धा! ते म्हणतात तसं विचार केला तर कितीही झालं तरी घरचे आपल्या प्रचंड हक्काचे आणि बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा इतर ओळखीचे नाही म्हटलं तरी तसे परकेच - मग होतं काय की मित्रमैत्रिणींना त्यांनी दिलेली वेळ न पाळल्यामुळे मला झालेला मनःस्ताप त्या मानाने रागाचा स्फोट न होता व्यक्त केला जातो पण तेच बायको आणि मुलींवर मी भयंकर चिडून बोलत असतो अगदी त्यांनीं माझ्याशी काही वेळ अबोला धरेपर्यंत! (म्हणूनच मी थर्ड क्लास नवरा आणि बेक्कार बाप आहे!) ...गेली लाख्खो वर्षं माझे मित्र (मैत्रिणी जास्त!) ठरलेली वेळ न पाळून माझी कवटी सटकवत असतात.
आणि झालंय काय आधीच मी चित्पावन कोब्रा त्यामुळे वेळ पाळण्यात (किंबहुना खूप आधीच रेडी असण्यात माहीर!), तशात मी आयुष्यत काही वर्षं जॅपनीज आणि इटालियन कंपनीत काढून ती मंडळी वेळेची किती भोक्ती असतात ते पाह्यल्याने मला बुवा दिलेली वेळ पाळायला प्रचंड आवडतं! (आम्ही इंडियन नेहेमी मीटिंगला उशिरा जायचो तेव्हा कळलं की त्यांच्या देशात "मिटिंगची वेळ" ही मिटिंग-रूममध्ये शिरायची वेळ नसून, त्याआधी १० मिनिटं तिथे हजर राहून शार्प 'त्या वेळी मिटिंग "सुरु करण्याची" असते म्हणून! ....... ती सवय झाल्यामुळे वेळ न पाळण्यांवर मी कायच्या क्काय चिडत असतो!
व्हॉल्वोने प्रवास करायची वेळ आली की माझी त्या व्हॉल्वो बस ड्रायव्हरशी नेहेमीच वादावादी होत असते. ते साले मॉलला थांबताना सांगतात अमूकएक मिनिटं (१० किंवा १५ जे काय) बस थांबेल आणि प्रत्यक्षात मात्र शेवटचा माणूस आरामात हादडून हलेडुले येईपर्यंत थांबतात आणि माझी सटकते. माझं म्हणणं असतं की त्या ड्रायव्हरने दिलेली वेळ संपली की सरळ बस सुरु करून निघून जायचं तर ते तो करत नाही आणि त्यावर कडेलोट म्हणजे हलेडुले येणारा ते लेट लतीफ (पुरुष, बायका दोघं) आपल्याच बापाची बस समजून असल्यामुळे आपल्यामुळे बाकीच्यांचा खोळंबा झालाय तर किमान कर्टसी म्हणून सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करतील तर ते हरामखोर भारतीय कसले?!!! मग माझी धूसफूस चालू होते.... बीपीचा त्रास नसल्यामुळे ते अजून वाढलेलं जाणवलं नाही कधी, पण चिडल्यामुळे भडकून कुठेतरी डोक्यात दहाबारा बारीक रक्तवाहिन्या नक्कीच बर्स्ट होत असणार....!! (नशीब अजून भारतीय रेल्वे आणि विमान-कंपन्या तरी प्रवाशांसाठी असं उगाच वाट बघत थांबून राहत नाहीत!)
मराठी नाटकवाल्यांची पण तशीच बोंब! दिलेल्या वेळी कध्धीच नाटक सुरु करत नाहीत! त्यामुळे मराठी नाटकाचे प्रेक्षकसुद्धा जग्गातले आळशी आणि लेट लतीफ झालेत! त्यांचीही धारणा झाल्ये की नाटक हे दिलेल्या वेळेवर जन्मात सुरु करणार नाहीत म्हणून! असले भिकार मनोवृत्तीचे आपण! लेको करा ना नाटक वेळेवर सुरु - लागू देत शिस्त प्रेक्षकांनाही!! पण हम नही सुधरेंगे! (नशीब - सिनेमाथेट्रात सिनेमा तरी अजूनतरी दिलेल्या वेळेत सुरु होतो! तिथे शेवटचा प्रेक्षक येईपर्यंत थांबत नाहीत!!)
तसंच काही मित्रमैत्रिणींच्या बाबतीत! कित्येक मित्रमैत्रिणींना (विशेषतः मैत्रिणींनाच!!) वेळेचं गणितच जमत नाही. त्यांचं "काळ-काम-वेग"वगैरे गणिताची भयंकर बोंब असते! भूगोल (कुठून कुठे जायचंय), जनरल नॉलेज (वाटेत साधारण कुठे किती ट्राफिक आणि अडथळे असू शकतात) आणि फिजिक्स (किती किलोमीटर पर सेकंडने जायला हवं) - या सगळ्याचं ज्ञान ज्यामच गंडलेलं असतं! त्यामुळे दिलेल्या/ ठरलेल्या ठिकाणी मी आपला (चित्पावन कोब्राच्या) वेळपाळू स्वभावानुसार मस्तपैकी आधीच हजर असतो आणि या खुशाल अर्धातास किंवा कितीही उशिरा येतात! तोपर्यंत माझी वाट पाहून सटकलेली असते त्यात प्रचंड घामट असल्याने (ते "sweating like pig की dog" बदलून 'स्वेटिंग लाईक प्रसन्न' करायला हरकत नाही!) माझ्या त्या ठिकाणी प्रचंड वेळ माझा पुतळा होऊन तोपर्यंत पाठीच्या पन्हळीतून घामाची नदी खालती प्यांटीपर्यंत शिरायला लागलेली असते! 😠
तर सांगायचं तात्पर्य म्हणजे time is money वगैरे मरूच दे - पण दिलेली वेळ न पाळणारी आणि काही अपरिहार्य कारणाने त्यांची चूक नसताना समजा उशीर होत असेल तर तसं वेळीच न कळवणारी माणसं डोस्क्यात जातात! माझी घरीदारी सर्वात जास्त चिडचिड आणि टोकाचे वाद आणि भांडणं वेळ न पाळण्यावरून होतात. आणि मग क्वचित माझ्या काटकटीमुळे कावलेली, वैतागलेली आणि संतापलेली बायको आम्ही लवकर जाऊन पोहोचल्यावर तो समारंभ काही कारणाने वेळेत सुरु न झाल्यास, मला "जा जा अजून झाडू मारायला लवकर जाऊन बसू!!" वगैरे ऐकवते तरीही मी माझ्या वेळ पाळण्यावर ठाम असतो (तो समारंभ वेळेत सुरु न करणाऱ्यांना मनोमन शिव्यांची लाख्खोली वाहत!)
आजकाल बघितलंय की पत्रिकेत छापलेली वेळ (घटिका की काय ते!) सुद्धा उलटून गेल्यावर लग्न लागतात! मग माझी चिडचिड सुरु! जर का लग्न हा एक गंमतीदार खेळच आहे आणि मजेतच सगळं करायचं असेल तर अशी ती मंडळी लग्नपत्रिकेत वेळच का छापतात in the first place? गरजच काय? पुन्हा तेच काळ-काम-वेग याचा सुतराम संबंध नसल्यामुळे कोणकोण कितीकिती वेळ स्वरचित मंगलाष्टकं गाणारेत वगैरे अंदाजच नसतो ...आणि आपण आपले दिलेल्या लग्नघटिका पाळायची म्हणून काळ काम वेगाची गणितं, ट्रॅफिकचा अंदाज सगळं बघून भरपूर आधीच वेळेत पोहोचलेलो असतो. तर वेळ उलटून जाऊनही लग्न लागत नसल्याचं बघत बसावं लागतं आणि वर कुणातरी काकवा/मावश्यां/आत्याबाईंची चांगली २०-२० कडव्याची (आता संपतील ...आता संपतील... आतातरी संपतील... वाटायला लावणारी ) स्वरचित मंगलाष्टकं ऐकायची पाळी येते कारण ती संपल्याशिवाय भटजीबुवाचं "तारांबळं... " सुरु होणार नसतं! (गंमत म्हणजे दिलेल्या वेळेवर (तास/मिनिट) लग्न न लागून चालत असणाऱ्या त्या फॅमिलीने चक्क पत्रिका आणि ग्रह वगैरे जुळवून सून/जावई आणि लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो हा जोकच! )...
अशी ती वेळ न पाळणाऱ्यांना हे का कळत नसतं की - बायकोने घराबाहेर काढलंय म्हणून किंवा गोट्या खेळायला घरी किंवा सोसायटीत कुणी मिळालं नाही म्हणून - वेळ घालवायला आम्ही त्या ठिकाणी येऊन तिष्ठत उभे/ बसलेलो नसतो!! आम्हालाही आमच्या वेळेत करण्यासारखं बरंच काही असूच शकतं. नव्हे असतंच!!!!
म्हणून time is money या वाक्याचा अर्थबिर्थ राहूदे बाजूला पण निदान दुसऱ्यांच्या वेळेचं भान/ चाड बाळगायला शिकलो आपण बहुसंख्य लोक तरी मिळवली!🤓
You are absolutely right. ह्यावरून किस्सा आठवला. अभिनेते अनंत जोग ह्यांनी एका बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला घरी जेवायला बोलावले होते. तो दोन अडीच तास उशिरा पोहोचला. वर उशिरा येत असल्याचा फोंन् देखील केला नाही. जोगानी वेळेवर जेवण उरकून घेतले होते आणी त्यास्ला तसे सांगितले ही.
ReplyDelete